Tuesday, 22 November 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 22.11.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 22 November 2022

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २२ नोव्हेंबर २०२२ दुपारी १.०० वा.

****

देशातल्या तरुणांना सरकारी नोकऱ्या देण्यासाठी सरकार मिशन मोडमध्ये काम करत असून, विविध राज्यांमध्ये रोजगार मेळावे आयोजित करण्याची मोहीम भविष्यातही सुरू राहणार असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधानांच्या हस्ते आज रोजगार मेळाव्यात देशभरातल्या ७१ हजार कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रं प्रदान करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. युवक ही देशाची सर्वात मोठी शक्ती असल्याचं सांगून पंतप्रधानांनी, युवकांमधली प्रतिभा आणि ऊर्जा वापरण्यास सरकार सर्वोच्च प्राधान्य देत असल्याचं नमूद केलं. नवीन भरती झालेल्या कर्मचाऱ्यांनी ज्ञान मिळवावं, कौशल्ये विकसित करावी आणि त्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी क्षमता वाढवण्यावर भर द्यावा, असं आवाहन त्यांनी केलं. या रोजगार मेळाव्यात पंतप्रधानांच्या हस्ते कर्मयोगी प्रारंभ मॉड्यूललाही सुरवात झाली. नवनियुक्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या या प्रशिक्षण अभ्यासक्रमात, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आचारसंहिता, नैतिकता, सत्यनिष्ठा आणि मनुष्यबळासंबंधीच्या धोरणांचा समावेश आहे.

देशभरात ४५ ठिकाणी ही नियुक्तीपत्रं कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष प्रदान करण्यात आली. नागपूर इथं सीआरपीएफ ग्रुप सेंटरचे उपमहानिरीक्षक प्रशांत जांभुळकर यांच्या हस्ते, तर पुणे इथं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते उमेदवारांना नियुक्ती पत्र वाटप करण्यात आली.

****

कोविड संकटाच्या काळात आंतरराष्ट्रीय विमानातून येणाऱ्या प्रवाशांसाठीचा हवाई सुविधा अर्ज आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं आजपासून बंद केला आहे. जागतिक स्तरावर आणि भारतातही कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण अभियानामुळे कोविड -19 चं प्रमाण कमी झाल्यामुळे सध्याच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. या सुधारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार आता सर्व प्रवाशांनी त्यांच्या देशातील कोविड विरूद्ध मान्यताप्राप्त वेळापत्रकानुसार पूर्ण लसीकरण करणं आवश्यक आहे; विमान प्रवासापूर्वी बंधनकारक असलेली आरटी - पीसीआर चाचणी मात्र बंद करण्यात आली आहे.

****

मुंबईत गोवर या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. या कालावधीत तीन हजाराहून अधिक संशयित रुग्ण आढळून आले आहेत. लहान मुलांपासून तरुणांनाही गोवर झाल्याचं समोर आलं असून, या आजारामुळे दहा मुलांचा मृत्यू झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.  

****

राज्यात लम्पी चर्मरोगामुळे मृत्यूमुखी पडलेल्या गोवंशीय पशुधनाच्या सात हजार २७४ पशुपालकांच्या खात्यांवर नुकसान भरपाई म्हणून १८ कोटी ४९ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी ही माहिती दिली. लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र शासनाचं पथक तीन दिवसीय राज्याच्या दौऱ्यावर आलं आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात गंगापूर तालुक्यातल्या बगडी इथल्या ग्रामस्थांनी आज रस्ता आणि पुलाच्या मागणीसाठी गोदावरी नदीमध्ये जलसमाधी आंदोलन सुरू केलं आहे. गोदावरी नदीला येणाऱ्या पाण्यामुळे, तसंच जायकवाडी धरणाच्या बॅक वॉटरमुळे पाणी सतत गावच्या परिसरात आणि रस्त्यावर पसरतं. त्यामुळे सध्या काढणीला आलेला कापूस आणि तोडणीला आलेला ऊस शेतकऱ्यांना गोदावरीचं पाणी पार करून न्यावा लागत आहे. ग्रामस्थांच्या या समस्येकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

****

सातव्या वेतन आयोगाप्रमाणे पडताळणी करण्यासाठी वेतन पडताळणी पथक आजपासून मराठवाडा दौऱ्यावर येत आहे. २५ तारखेपर्यंत हे पथक औरंगाबाद, जालना, बीड, जिल्ह्यात, त्यानंतर २६ ते ३० नोव्हेंबर दरम्यान लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात, जिल्हा तसंच तालुका स्तरावरील पाहणी करेल.

****

राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून परंडा इथं येत्या २७ तारखेला महाआरोग्य शिबीराचं आयोजन करण्यात आलं आहे. या महाआरोग्य शिबीरात सर्व आजारांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार असून, औषधी, वैद्यकिय साहित्य तसंच आवश्यक त्या रुग्णांच्या शस्त्रक्रीया देखील मोफत केल्या जाणार आहेत. जास्तीत जास्त नागरीकांनी या महाआरोग्य शिबीराचा लाभ घ्यावा, असं अवाहन, जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांनी केलं आहे.

****

कतार इथं सुरु असलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत आज चार सामने होणार आहेत. भारतीय वेळेनुसार दुपारी साडे तीन वाजता अर्जेंटिना आणि सौदी अरेबिया, संध्याकाळी साडे चार वाजता डेन्मार्क आणि टिनिशिया, रात्री साडे नऊ वाजता मेक्सिको आणि पोलंड आणि रात्री साडे बारा वाजता फ्रान्स आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामने होणार आहेत.  

****

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तिसरा आणि शेवटचा टी - ट्वेंटी क्रिकेट सामना आज नेपियर इथं होत असून न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

 

//***********//

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 04.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...