Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
: 22 November 2022
Time
07.10 AM to 07.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २२ नोव्हेंबर २०२२ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
· पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रोजगार मेळाव्यात देशभरातल्या ७१ हजार कर्मचाऱ्यांना
नियुक्तीपत्रं प्रदान करणार
· महाराष्ट्र - कर्नाटक सीमा प्रश्नी न्यायालयीन प्रक्रियेच्या समन्वयासाठी दोन
मंत्र्यांची नियुक्ती
· शेती पंपाचं चालू बिल भरणाऱ्या शेतकऱ्यांची वीज जोडणी न तोडण्याचे ऊर्जामंत्री
देवेंद्र फडणवीस यांचे महावितरणला निर्देश
· कांद्याचे भाव घटल्यामुळे लासलगावमध्ये शेतकरी संघटनेनं लिलाव रोखले
· उस्मानाबाद जिल्ह्यात खरीप २०२० पीक विमा प्रकरणी १५० कोटी रुपये २५ नोव्हेंबरपर्यंत
न्यायालयात जमा करण्याचे पीक विमा कंपनीला आदेश
· लातूर जिल्ह्यातले स्वातंत्र्यसैनिक पिराजी तोगरे यांचं निधन
· उस्मानाबादमध्ये सुरु असलेल्या ५५ व्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धेत
राज्याच्या पुरुष तसंच महिला संघांची विजयी घोडदौड कायम
आणि
· भारत - न्यूझीलंडदरम्यान आज तिसरा टी ट्वेंटी क्रिकेट सामना
सविस्तर बातम्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज रोजगार मेळाव्यात देशभरातल्या ७१ हजार
कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रं प्रदान केली जाणार आहेत. आभासी माध्यमातून होणाऱ्या या
कार्यक्रमात पंतप्रधान सर्व कर्मचाऱ्यांना संबोधित करतील. देशभरात ४५ ठिकाणी ही नियुक्तीपत्रं
कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष प्रदान केली जातील. या रोजगार मेळाव्यात पंतप्रधानांच्या हस्ते
कर्मयोगी प्रारंभ मॉड्यूललाही सुरवात केली जाईल. नवनियुक्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी
हा प्रशिक्षण अभ्यासक्रम आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आचारसंहिता, नैतिकता, सत्यनिष्ठा
आणि मनुष्यबळासंबंधीच्या धोरणांचा या अभ्यासक्रमात समावेश आहे.
****
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल नवी दिल्ली इथं वर्ष २०२३-२४च्या
अर्थसंकल्पाच्या तयारीच्या दृष्टीनं विविध संबंधितांशी अर्थसंकल्प पूर्वीची चर्चा सुरु
केली. दूरदृष्यप्रणालीमार्फत होत असलेल्या या बैठकीला अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी,
डॉ. भागवत कराड, केंद्रीय अर्थसचिव डॉ. टी.व्ही. सोमनाथन आणि मुख्य आर्थिक सल्लागार
डॉ. अनंत नागेश्वरन यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. या बैठकांमध्ये उद्योग जगतातले
नेते, पायाभूत सुविधा आणि हवामान बदलात या क्षेत्रांमधले तज्ञ सहभागी होणार आहेत. २०२३-२४
च्या अर्थसंकल्पासाठी सूचना मागवण्याकरता या बैठका होणार असल्याचं अर्थ मंत्रालयानं
म्हटलं आहे.
****
महाराष्ट्र - कर्नाटक सीमा प्रश्नी न्यायालयीन प्रक्रियेच्या समन्वयासाठी दोन
मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सीमा प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल उच्चाधिकारी समितीची मुंबईत बैठक घेतली,
त्यावेळी ही माहिती देण्यात आली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी
याबाबत सूचना केली होती.
यासंदर्भातल्या कायदेशीर लढाईसाठी ज्येष्ठ विधीज्ञ वैद्यनाथन यांची नियुक्ती
करण्यात आली असून, समन्वयासाठी चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई या दोन मंत्र्यांची
नियुक्ती करण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. महाराष्ट्र शासनाच्या योजनांचा
लाभ सीमा भागातल्या बांधवांना प्रभावीपणे मिळावा, यासाठी सीमा प्रश्न हाताळणाऱ्या विशेष
कक्षाचं बळकटीकरण करावं, असे निर्देशही त्यांनी दिले. मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ
पूर्वीप्रमाणे सीमा भागात देण्यास, तसंच महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ
देखील सीमा भागातल्या नागरिकांना देण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी
सांगितलं. सनदशीर मार्गाने सीमा प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असून आम्ही सीमावासीयांबरोबर
आहोत, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली.
दरम्यान, आपण मांडलेल्या सूचनांना मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शवत मान्यता
दिल्याचं विरोधी पक्षनेते दानवे यांनी, या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
सीमा भागातल्या ८६५ गावांना बंद झालेले मुख्यमंत्री धर्मदाय योजनेतून मिळणारे लाभ पुन्हा
सुरू करावेत, यासह अनेक विनंतीवजा सूचना आपण केल्या, मुख्यमंत्र्यांनी त्या तत्काळ
मान्य केल्याचं ते म्हणाले.
****
ज्या शेतकऱ्यांनी शेती पंपाचं चालू बिल भरलं आहे, अशा शेतकऱ्यांच्या वीज जोडण्या
कापू नयेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना
दिले आहेत. राज्यात अनेक ठिकाणी चालू बिल भरलेल्या शेतकऱ्यांची विज जोडणी कापल्याच्या
तक्रारी प्राप्त झाल्यानंतर त्यांनी यासंबंधी सूचना केली. वीज बिल न भरल्यानं वसुली
सुरु असते, मात्र अतिवृष्टीमुळे यंदा शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. अशा शेतकऱ्यांना
सूट द्यावी असे आदेश दिले असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. ज्या शेतकऱ्यांचं नुकसान
झालं नाही, त्यांनी नियमित वीज भरणा करावा, नुकसानग्रस्त भागात भविष्यात वसुली करता
येईल. शेतकऱ्यांच्या शेती पंपांचं कनेक्शन तोडू नका, असं त्यांनी सांगितलं.
****
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवरायांबद्दल कथित अवमानकारक विधान
केल्याविरोधात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात काल
मुंबईत गिरगाव चौपाटी इथं शिवसेनेच्यावतीनं निषेध आंदोलन करण्यात आलं. कार्यकर्त्यांनी
घोषणाबाजी करुन तसंच निषेधाचे फलक दाखवून आपला विरोध दर्शवला, पोलिसांनी अंबादास दानवे
यांच्यासह शिवसैनिकांना ताब्यात घेतलं.
भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी एका दूरचित्रवाहिनीला मुलाखत
देताना, छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल, धुळ्यात सकल मराठा
समाजाच्या वतीनं, राज्यपाल आणि त्रिवेदी यांच्या प्रतिमेस जोडे मारुन प्रतिमा दहन करण्यात
आलं. यावेळी आंदोलनकर्त्यांनी तीव्र शब्दात दोघांचा निषेध केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या
वतीने पुण्यात राज्यपालांच्या निषेधात आंदोलन करण्यात आलं. औरंगाबाद इथं मुकुंदवाडी
परिसरात महाविकास आघाडीच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी फलक
झळकावत राज्यपालांविरोधात घोषणा देत, त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
****
आकाशवाणी आणि दूरदर्शन या माध्यमांची विश्वासार्हता आजही कायम असल्याचं, प्रसारभारतीचे
नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, गौरव द्विवेदी यांनी म्हटलं आहे. काल सीईओ पदाचा
कार्यभार स्वीकारल्यानंतर ते बोलत होते. आकाशवाणी आणि दूरदर्शन हे दोन्ही विभाग अधिक
बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा मानस, द्विवेदी यांनी व्यक्त केला.
****
देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यात ७५ वर्षांवरील नागरिकांना
एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवासाची सुविधा देण्यात आली आहे. २६ ऑगस्ट
२०२२ ते २० नोव्हेंबर २०२२ दरम्यान राज्यभरातून दोन कोटी आठ लाखाहून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी
एसटीतून मोफत प्रवासाचा लाभ घेतला आहे. एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक
शेखर चन्ने यांनी ही माहिती दिली.
****
कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्यानं नाशिकच्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार
समितीत महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे
यांच्या नेतृत्वाखाली काल कांद्याचे लिलाव रोखण्यात आले. संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी
केंद्र सरकार, राज्य सरकार आणि नाफेडच्या विरोधात घोषणाबाजी केली. केंद्र सरकारने जास्तीत
जास्त कांदा परदेशात निर्यात करावा, तसंच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने
दहा रुपये प्रति किलोप्रमाणे नुकसान भरपाई अनुदान द्यावं, अशी मागणी दिघोळे यांनी यावेळी
केली.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात खरीप २०२० पीक विमा प्रकरणी दाखल अवमान याचिकेवर काल सर्वोच्च
न्यायालयात सुनावणी झाली. विमा कंपनीनं १५० कोटी रुपये येत्या २५ तारखेपर्यंत न्यायालयात
जमा करावे, तसंच दहा दिवसात शपथपत्र दाखल करण्याचे आदेश न्यायालयानं यावेळी दिले. खरीप
२०२० मध्ये पिकांच्या नुकसानीपोटी तीन आठवड्यात भरपाई देण्याच्या न्यायालयाच्या आदेशाचं
पालन न केल्यामुळे बजाज अलायंझ जनरल इन्शुरन्स कंपनी विरोधात राज्य सरकारनं अवमान याचिका
दाखल केली आहे.
****
लातूर जिल्ह्याच्या जळकोट तालुक्यातल्या घोणसी इथले स्वातंत्र्यसैनिक पिराजी
तोगरे यांचं काल वृद्धापकाळानं निधन झालं, ते १०४ वर्षांचे होते. तोगरे हे हैदराबाद
मुक्तिसंग्रामाच्या लढ्यात सामिल होते. घोणसी, तिरुका, जळकोट इथल्या आठ जणांनी या लढ्यात
भाग घेतला होता. त्यापैकी तोगरे हे एकच स्वातंत्र्यसैनिक हयात होते.
****
कतार इथं सुरु असलेल्या फिफा - फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत काल इंग्लंडनं इराणचा
सहा - दोन असा, तर नेदरलँडने सेनेगलचा दोन - शून्य असा पराभव केला. अमेरिका आणि वेल्स
यांच्यातला सामना एक - एकनं बरोरीत सुटला.
****
उस्मानाबाद इथं सुरु असलेल्या ५५ व्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धेत पुरुष
तसंच महिला संघांनी कालही विजयी घोडदौड कायम राखली. महिलांच्या सामन्यात महाराष्ट्रने
अरुणाचल प्रदेशचा १८-३ असा एक डाव १५ गुणांनी, तर पुरुष संघानं उत्तराखंडचा १७-७ असा
पराभव केला. महिलांच्या दुसऱ्या एका सामन्यात गोव्याने सीमा सुरक्षा दलाचा १८-४ असा
पराभव करत एक डाव १४ गुणांनी विजय मिळवला. पुरुषांच्या अन्य एका सामन्यात विदर्भाने
जम्मू-काश्मीरवर २३-८ असा एकतर्फी विजय मिळवला.
****
नाशिक इथल्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या दोन दिवसीय क्रीडा महोत्सवाला
कालपासून प्रारंभ झाला. काल झालेल्या स्पर्धेत
पाच हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत औरंगाबादच्या योगिता साळुंकेनं पहिला क्रमांक पटकावला.
लांब उडीत नांदेडच्या शीतल धुमाळनं दुसरा, गोळाफेक स्पर्धेत औरंगाबादच्या आकाश कलमने
तिसरा, थाळीफेक स्पर्धेत औरंगाबादच्या मयुरी पवारने दुसरा, उंच उडीत औरंगाबादच्या सुहास
जगतापने दुसरा तर नांदेडच्या आकाश पवारने तिसरा क्रमांक पटकावला. उंच उडीत महिला गटात
नांदेडच्या रेखा राठोड आणि मोनाली रामपानवाड यांनी अनुक्रमे पहिला आणि दुसरा क्रमांक
मिळवलं.
****
पुढच्या महिन्यात होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं यजमानपद अहमदनगरला मिळालं
आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आमदार संग्राम
जगताप हे यंदाच्या स्पर्धेचे आयोजक असतील. डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात ही
स्पर्धा होण्याची शक्यता असून, तारखा लवकरच जाहीर होणार आहेत. यंदा या स्पर्धेत ३४
जिल्ह्यांसह ११ महानगरपालिकांचे संघ सहभागी होणार असल्याची माहिती कुस्तीगीर परिषदेचे
उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे यांनी दिली. सर्व जिल्हा संघांना महाराष्ट्र केसरी कुस्ती
स्पर्धेसाठी संघ पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं असून, त्यासाठी जिल्ह्यांनी निवडचाचणी
आयोजित केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तिसरा आणि अखेरचा टी ट्वेंटी क्रिकेट सामना आज
खेळला जाणार आहे. दुपारी १२ वाजता सामन्याला सुरुवात होईल. तीन सामन्यांच्या या मालिकेतला
पहिला सामना होऊ शकला नव्हता, तर दुसरा सामना जिंकून भारत एक शून्यने आघाडीवर आहे.
****
हैद्राबाद इथल्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेकडून चालू
महिन्यापासून एप्रिल २०२३ पर्यंत, अवकाशात दहा बलून फ्लाईट्स सोडण्यात येणार आहेत.
संशोधनासाठी सोडण्यात येणाऱ्या या बलून्समध्ये वैज्ञानिक उपकरणं आहेत. ही उपकरणं काही
दिवसानंतर रंगीत पॅराशूटसह जमिनीवर पडण्याची शक्यता आहे. परभणी, औरंगाबाद, बीड, नांदेड,
उस्मानाबाद, अहमदनगर, जळगाव, सोलापूर या जिल्ह्यांसह शेजारील जिल्ह्यातही ही उपकरणे
जमिनीवर आढळून येऊ शकतात. कोणीही या उपकरणांना स्पर्श करू नये किंवा कोणत्याही प्रकारची
छेडछाड करू नये. अशी उपकरणे आढळून आल्यास जवळचे पोलीस ठाणे, टपाल कार्यालय, स्थानिक
प्रशासन किंवा जिल्हा प्रशासनास संपर्क साधावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूर तालुक्यातल्या गायरान जमीनीवरील अतिक्रमण हटवण्याच्या
कारवाईला स्थगिती द्यावी, या मागणीचं निवेदन आदिवासी भिल्ल समाजाच्या वतीनं प्रशासनाला
काल सादर करण्यात आलं. गेल्या पन्नास वर्षांपासून सरकारी गायरान जमीनीवर पिकं घेवून
आदिवासी समाज उपजिविका भागवत आहे. तसंच या ठिकाणी त्यांना शासनाच्या वतीनं घरकुलही
मिळाले आहेत. त्यामुळे यासंदर्भात सरकारनं या अतिक्रमण हटवण्याचा पुनर्विचार करण्याची
मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
****
औरंगाबाद इथं बळजबरी धर्मांतराच्या एका प्रकरणात भारतीय जनता पक्षानं पोलिस
आयुक्तांकडे तक्रार केली आहे. भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश महामंत्री जालिंदर
शेंडगे यांनी दाखल केलेल्या या तक्रारीत, सदरील तरुणाला मारहाण करून त्याची आर्थिक
फसवणूक केल्याचं म्हटलं आहे. भिन्न धर्मीय तरुण तरुणीच्या प्रेम प्रकरणातून युवतीच्या
नातेवाईकांनी सदर युवकाचं बळजबरी धर्मांतर केल्याचा आरोप करत, शेंडगे यांनी, या प्रकरणी
कारवाईची मागणी केली आहे. औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्या उपस्थितीत हा प्रकार
घडल्याचं सांगत, जलील यांच्याविरोधातही कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.
****
दरम्यान, औरंगाबाद इथंच एकतर्फी प्रेमातून एका तरुणानं स्वत:ला पेटवून घेत,
तरुणीला पेटवण्याचा प्रयत्न केला. यात तरुणाचा मृत्यू झाला असून, गंभीर भाजपलेल्या
तरुणीवर उपचार सुरु आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरात काल
दुपारी हा प्रकार घडला. हे दोघंही विज्ञानाच्या दोन शाखांमध्ये संशोधन करणारे विद्यार्थी
आहेत. संबंधित ३० वर्षीय तरुणाने काल तरुणीला प्रयोगशाळेत बोलावून घेत, स्वत:ला पेटवून
घेत, तरुणीला मिठी मारली. विभागातल्या कर्मचाऱ्यांनी प्रयोगशाळेचा दरवाजा तोडून, आग
विझवून दोघांनाही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय - घाटी रुग्णालयात दाखल केलं. सदरील
तरुणीने या तरुणाविरोधात आठभरापूर्वीच पोलिसात तक्रार दिली होती. सतत फोन करून तसंच
पाठलाग करून आपल्याला त्रास देत असल्याचं, तरुणीने या तक्रारीत म्हटलं आहे.
****
नांदेड इथं अवैध शस्त्र बाळगणाऱ्या तीन जणांना पोलिसांच्या गुन्हे शाखेनं अटक
केली. त्यांच्या ताब्यातून एका गावठी पिस्टलसह, तीन तलवारी, आणि एक खंजीर हस्तगत करण्यात
आल्या. पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी राबवलेल्या विशेष शोध मोहिमेत ही कारवाई
करण्यात आली.
****
गेल्या दोन दिवसांपासून औरंगाबादसह मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यात रात्रीच्या
वेळेस तापमानात कमालीची घसरण झाली आहे. औरंगाबाद शहरात गेले दोन दिवस किमान तापमान
एक अंकी नोंदवलं गेलं. काल सुमारे नऊ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. औरंगाबाद इथल्या
एमजीएम विद्यापीठातील एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास
औंधकर यांनी ही माहिती दिली.
****
No comments:
Post a Comment