Monday, 22 May 2023

आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र २२ मे २०२३ सकाळी ११.०० वाजता

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२ २ मे २०२३ सकाळी ११.०० वाजता

****

देशाच्या जी २० अध्यक्षतेखाली आज जम्मू कश्मीरच्या श्रीनगर इथं पर्यटनविषयक कृती समुहाची तिसरी बैठक होणार आहे. या बैठकीचं औपचारिक उद्घाटन उद्या होणार असून आज दुपारी पर्यटनाशी संबंधित एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीत पर्यटन सामर्थ्य आणि सांस्कृतिक समृद्धता यावर चर्चा केली जाईल.  

***

लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी लम्पी आजाराचा पुन्हा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यामध्ये नवजात वासरांच्या मृत्यूचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे प्रशासनानं पुन्हा एकदा लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ७०२ जनावरांना लम्पीच्या आजाराची बाधा झाली आहे. यापैकी, ६४ जनावरं दगावली तर ५६७ जनावरं लम्पीच्या आजारापासून बरी झाली आहेत.

***

शासकीय योजनांचा नागरिकांना लाभ देण्यासाठी लातूर जिल्ह्यात औसा इथं आज  शासन आपल्या दारी अभियानाचं आयोजन करण्यात आलं आहे. निलंगा मार्गावर विजय मंगल कार्यालयात हे अभियान घेण्यात येत आहे. शासनाच्या विविध विभागांचे ६० कक्ष उभारण्यात येणार असून जवळपास सात हजारांपेक्षा अधिक लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ दिला जाणार आहे.

***

इंडियन प्रीमिअर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेतला प्ले- ऑफ गटातला पहिला सामना उद्या चेन्नई इथं गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. तर बुधवारी मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंटस यांच्यात सामना होईल.

***

इटली खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या काल झालेल्या अंतिम सामन्यात रशियाच्या डॅनियल मेदवेदेवनं अजिंक्यपद पटकावलं. त्यानं डेनमार्कच्या होल्गर रुन चा ७-५,७-५ असा पराभव केला. मेदवेदेव याचं हे पाचवं अजिंक्यपद असून तो जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे. 

***

कोकण, मध्य महाराष्ट्रात आज ढगाळ हवामान राहील. विदर्भात तुरळक ठिकाणी जोराचे वारे, वीजांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं यापूर्वीच दिला आहे.

//*********//

 

 

 

 

 


No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 03.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 03 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...