Sunday, 21 July 2024

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: २१ जूलै २०२४ दुपारी १.०० वा.

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 21 July 2024

Time: 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २१ जूलै २०२ दुपारी १.०० वा.

****

देशभरात आज गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी केली जात आहे. महर्षी वेद व्यास यांची जयंती म्हणून याला व्यासपौर्णिमाही म्हणतात. जीवनाच्या विविध क्षेत्रात मार्गदर्शकाची भूमिका बजावणाऱ्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा समजला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त देशवासीयांना सामाजिक माध्यमाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातल्या शिर्डी आज सकाळी शताब्‍दी ध्‍वजाचं पूजन करण्यात आलं. साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत, तर संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी विदर्भपंढरी शेगाव इथं भाविक मोठ्या संख्येनं दाखल झाले आहेत. अमरावतीच्या गुरुकुंज मोझरी इथं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधीस्थळी गुरुपौर्णिमा उत्सवाला पहाटे प्रारंभ झाला. छत्रपती संभाजीनगर शहरात हरिहर शक्तिपीठ रेणुका माता मंदिराच्या वतीनं गुरू लॉन्सवर महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. गारखेडा परिसरातल्या गजानन महाराज मंदिरातही भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत आहे.

****

भारतात प्रथमच, जागतिक वारसा समितीची बैठक होत आहे. आज संध्याकाळपासून नवी दिल्लीच्या भारत मंडपम् इथं या कार्यक्रमाला सुरुवात होईल. भारतासाठी ही अत्यंत आनंदाची बाब असल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमांद्वारे व्यक्त केलं आहे. देशाचा वारसा जतन करण्याच्या मार्गांवर विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी ही बैठक एक महत्त्वाचं व्यासपीठ असल्याचंही मोदी यांनी म्हणाले.

****

बांग्लादेशात आरक्षणाविरोधात सुरू असलेल्या हिंसक निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर, तिथले जवळपास एक हजार भारतीय विद्यार्थी काल मायदेशी परतले. ढाका इथलं भारताचं उच्चायुक्तालय, सहउच्चायुक्तालय अजूनही बांग्लादेशातल्या विविध विद्यापीठात शिकणाऱ्या चार हजार विद्यार्थ्यांना आवश्यक सहकार्यासाठी संपर्कात असून, नेपाळ-भूतान या देशांच्या विद्यार्थ्यांनाही भारतात परतण्यास मदत देण्यात आल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. विमानसेवेसह भारत-बांग्लादेश आंतरराष्ट्रीय सीमा सुरक्षितपणे ओलांडण्यासाठीदेखील उपाययोजना केल्या जात आहेत.

****

उत्तराखंडमधील पवित्र धाम केदारनाथसाठी जाणाऱ्या पादचारी मार्गावर चिरबासा इथं हेलिपॅडनजीक आज भूस्खलन झाल्यानं तीन जण दगावले, तर पाच जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये जालन्याच्या सुनील काळे, तर नागपूरच्या किशोर पराटे या युवकांचा समावेश आहे.

****

चांदीपुरा विषाणू प्रकरणासह गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेशातील मेंदूशी संबंधित तीव्र एन्सेफलायटिस आजाराबाबत आरोग्य सेवा महासंचालनालयाचे संचालक अतुल गोयल यांनी काल तज्ञांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली. विविध विषाणू, जीवाणू, बुरशी, परजीवी आणि इतर रसायनांमुळे हा आजार होत असल्याचं या बैठकीत नमूद करण्यात आलं. महाराष्ट्राच्या चांदीपुरा इथं प्रथम आढळलेल्या या विषाणूचा देशाच्या पश्चिम, मध्य आणि दक्षिणेकडील भागात, विशेषत: पावसाळी हंगामात उद्रेक होतो. माशा आणि गोचिडं यांद्वारे हा विषाणू पसरतो. प्रतिबंध, स्वच्छता आणि जागरूकता हेच या रोगावरील उपाय आहेत.

****

पंतप्रधान स्वनिधी योजनेतून केंद्र सरकारनं किरकोळ विक्रेत्यांना आतापर्यंत साडेआठ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी वितरीत केल्याची माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांनी दिली आहे. नड्डा यांच्या हस्ते काल रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी अन्नसुरक्षेसंदर्भातल्या संकेतस्थळाचं दिल्ली इथं उद्घाटन झालं. देशभरात खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वं लागू झाल्याचं सांगून, ते सुरक्षित खाद्यपदार्थांचा वापर करत असल्याच्या खात्रीसाठी एका नावीन्यपूर्ण चाचणी संचाची सुविधा गरजेची असल्याचं नड्डा यावेळी म्हणाले.

****

गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव नगरपरिषदेअंतर्गत कुंभारटोली आणि पाऊळडौना हा रस्ता दुरुस्त होत नसल्यामुळे त्रस्त झालेल्या विद्यार्थ्यांनी आज स्थानिकांसह या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये धान पिकाची रोवणी करत आंदोलन केलं. प्रशासनानं हा रस्ता लवकर दुरुस्त करावा, अशी मागणीही त्यांनी केली.

****

भारतीय हवामान विभागानं पुढील चार दिवसांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आज विदर्भ, छत्तीसगड, किनारी कर्नाटक, उत्तराखंड, पश्चिम उत्तर प्रदेश, हरयाणा, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, मराठवाडा, किनारी आंध्र प्रदेश, आणि तेलंगणमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसंच नवी दिल्लीमध्येही हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. राजस्थान, हिमाचल प्रदेश, पंजाब, बिहार, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये बुधवारपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

****

भंडारा जिल्ह्यात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरणासह रिमझिम पाऊस सुरू आहे. परिणामी जिल्ह्यातल्या वैनगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. गोसेखुर्द धरणाचे २३ दरवाजे एक मीटरनं, तर अन्य दहा दरवाजे अर्धा मीटरनं उघडण्यात आले आहेत. दरम्यान, भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयातील विद्युत प्रवाह नियंत्रक संचाला आग लागली होती. मात्र, अग्निशमन दलानं काही क्षणातच आगीवर नियंत्रण मिळवत अनर्थ टाळला.

गडचिरोली जिल्ह्यात काल रात्रीपासून पाऊस सुरू असून, गडचिरोलीहून नागपूर, तसंच चामोर्शी यासह आलापल्लीहून भामरागड, तसंच सिरोंचा या चार राष्ट्रीय महामार्गांसह तीस मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 06.07.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 06 July 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...