आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
२१ जूलै २०२४ सकाळी
११.०० वाजता
****
गुरूपौर्णिमेचा उत्सव आज सर्वत्र साजरा होत आहे. विविध आध्यात्मिक, तसंच कला क्षेत्रातील मार्गदर्शक गुरुंना अभिवादन
करण्यासाठी सर्वत्र धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या शिर्डी,
तसंच विदर्भपंढरी शेगाव इथं दर्शनासाठी भाविक मोठ्या
संख्येनं दाखल झाले आहेत.
****
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पुण्यात
भारतीय जनता पक्षाचं महाअधिवेशन होत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या
हस्ते अधिवेशनाचं उद्घाटन,
तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भाषणानं समारोप
होणार आहे.
****
भविष्याचा वेध घेत उच्च शिक्षणावर अधिक लक्ष केंद्रीत
केल्यास प्रगतीचा वेग वाढेल, असं मत इन्फोसिसचे संस्थापक अध्यक्ष एन. आर. नारायण मूर्ती
यांनी काल पुण्यात व्यक्त केलं. ज्येष्ठ संगणक शास्त्रज्ञ डॉक्टर विजय भटकर यांना
यावर्षीचा पुण्यभूषण पुरस्कार प्रदान काल करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
****
भविष्यातले गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्येकामध्ये
महात्मा गांधींचे विचार रुजवणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन अणुशास्त्रज्ञ डॉक्टर
अनिल काकोडकर यांनी केलं आहे. जळगाव इथं काल गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय
प्रतियोगिता-२०२४ या उपक्रमाचा पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. त्यावेळी ते बोलत
होते.
****
लातूर इथं डेंग्यू संशयित रुग्ण संख्येत महिनाभरात वाढ झाली आहे. त्यामुळं शहरवासीयांनी घरं, वसतिगृहं, शाळा, याठिकाणी डास अळी निर्मूलन करुन घ्यावं आणि डासांची उत्पत्ती न होण्याची
काळजी घेण्याचं आवाहन महापालिकेनं केलं आहे.
****
इतिहास अभ्यासक, उर्दू साहित्यिक आणि अनुवादक रफत कुरेशी यांचं गेल्या
आठवड्यात निधन झालं. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आज श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज
पुराणवस्तू संग्रहालयात हेरिटेज वॉक आणि श्रद्धांजली सभेचं आयोजन करण्यात आलं आहे.
सायंकाळी चार वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आवाहन इंडियन
नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज, अर्थात इंटॅक या संस्थेनं केलं आहे.
****
आज कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज,
तर किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान
विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
****
No comments:
Post a Comment