Saturday, 13 July 2024

TEXT-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 13.07.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 13 July 2024

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १३ जूलै २०२४ सायंकाळी ६.१०

****

·      पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर-५२ हजार ३०० कोटीच्या विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण 

·      खासदार नारायण राणे यांच्या लोकसभा विजयाला शिवसेनेचे विनायक राऊत यांचं न्यायालयात आव्हान

·      मराठा आरक्षण आंदोलन नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर इथं शांतता रॅली

आणि

·      मुंबईसह ठाणे आणि रत्नागिरी जिल्ह्यांला हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या हस्ते ५२ हजार ३०० कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण होत आहे. गोरेगाव इथल्या नेस्को प्रदर्शन केंद्रात रस्ते, रेल्वे आणि बंदर क्षेत्राशी संबंधित २९ हजार ४०० कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार असून, गोरेगाव- मुलुंड रस्त्यावरचा जुळा बोगदा, ठाणे - बोरिवली दरम्यानचा बोगदा तसंच, नवी मुंबईत तुर्भे इथं कल्याण यार्ड रिमॉडेलिंग आणि गती शक्ती मल्टी मॉडेल कार्गो टर्मिनल या प्रकल्पांची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होईल. लोकमान्य टिळक टर्मिनसवरच्या नवीन फलाटाचं लोकार्पणही तसंच मुख्यमंत्री युवा कार्य शिक्षण योजनेचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. इंडीयन न्यूजपेपर सोसायटीच्या नव्या इमारतीचं उद्घाटनही पंतप्रधान आज करणार आहेत.

****

प्राप्तिकर विभागानं २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी ६ लाख ४५ हजार कोटी रुपयांहून अधिक प्रत्यक्ष कर संकलन केलं आहे तसंच या महिन्याच्या ११ तारखेपर्यंत ७० हजार ९०२ कोटी रुपयांचा परतावा जारी केला आहे. एकूण संकलनात २ लाख ६५ हजार ३३६ कोटी रुपये कॉर्पोरेट कर, ३ लाख ६१ हजार ८६२ कोटी रुपये वैयक्तिक प्राप्तिकर आणि १ हजार ४२६ कोटी रुपये इतर करांचा समावेश असल्याचं प्राप्तिकर विभागानं जारी केलेल्या आकडेवारीत म्हटलं आहे.

****

भारतीय जनता पक्षाचे सिंधुदुर्ग- रत्नागिरीचे खासदार नारायण राणे यांच्या लोकसभेतील विजया विरोधात शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. राणे यांनी कपटनीती, पैशांचा वापर आणि मतदारांना धमकावून हा विजय मिळवला आहे, असा आरोप राऊत यांनी याचिकेत आरोप केला आहे. नारायण राणे, त्यांचे पुत्र नीतेश राणे आणि भाजप कार्यकर्त्यांनी निवडणूक काळात अनेक गैरप्रकार केले, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही कारवाई न झाल्यामुळे ही याचिका केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

कांदा, कापूस आणि सोयाबीन दरांच्या चढउताराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देणार असल्याचं आश्वासन केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी दिलं आहे. राज्याच्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी गोयल यांची या संदर्भात भेट घेतली, त्यावेळी गोयल यांनी हे आश्वासन दिल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

महाराष्ट्रातल्या विविध नगरपंचायती तसंच एका नगरपरिषदेतल्या सदस्य पदांच्या ११ रिक्त जागांसाठी, येत्या ११ ऑगस्ट २०२४ रोजी मतदान होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून ही माहिती देण्यात आली. कोल्हापूराच्या हातकणंगले नगरपंचायतीच्या अध्यक्षपदाच्या रिक्त जागेची पोटनिवडणुकीही त्याच दिवशी घेतली जाईल असं आयोगानं कळवलं आहे. मतमोजणी १२ ऑगस्ट ला होणार आहे.

या निवडणुकीसाठी उमेदवारांना रविवार २१ जुलै वगळून दिनांक १८ ते २४ जुलै २०२४ या कालावधीत अर्ज दाखल करता येणार आहेत, तर २५ जुलै ला अर्जांची छाननी होणार असल्याचं आयोगाच्या निवेदनात म्हटलं आहे.

****

केंद्रीय विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाला भेट देवून प्रकल्पाचा आढावा घेतला. यावेळी विमानतळ प्रकल्प अधिकाऱ्यांना प्रकल्पाच्या वेगवान पूर्ततेसाठी त्यांनी सूचना केल्या. यावेळी अधिकाऱ्यांनी विमानतळ प्रकल्पाच्या निर्माण कार्याचं सादरीकरण केलं. नागरी विमान राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार श्रीकांत शिंदे,  सिडकोचे उपाध्यक्ष विजय सिंघल यांच्यासह अनेक अधिकारी यावेळी उपस्थित होते.

****

येत्या २६ जुलैला कारगिल विजयाचा रौप्यमहोत्सवी वर्धापनदिन साजरा होत आहे. या निमित्ताने कारगिल हेलिपॅडवर एक विशेष प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. अपनी सेना को जानेनामक या प्रदर्शनात विविध शस्त्र तसंच उपकरणं दाखवण्यात येत आहेत. परिसरातल्या विविध शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थी, राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी, तसंच अनेक नागरिक या प्रदर्शनाला भेट देत असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत आज छत्रपती संभाजीनगर इथं शांतता रॅली काढण्यात येत आहे. शहरातल्या सिडको भागातल्या वसंतराव नाईक चौक ते क्रांतीचौक या मार्गावर ही रॅली काढण्यात येत आहे. मराठा बांधव मोठ्या संख्येनं या रॅलीत सहभागी होण्यासाठी छत्रपती संभाजीनगर शहरातल्या जालना रस्त्यावर दाखल झाले आहेत. महिलांचा यात लक्षणीय सहभाग आहे. जरांगे यांच्या स्वागतासाठी जागोजागी स्वागत मंच उभारण्यात आले आहेत. दरम्यान, या रॅलीसाठी जरांगे यांचं शहरात आगमन होताच खासदार संदिपान भुमरे यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणयोजनेअंतर्गत आतापर्यंत ७९ हजार २६६ महिलांची नोंदणी झाली आहे, जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी सुवर्णा जाधव यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यात आतापर्यंत १६ हजार ७७८ महिलांची नोंदणी ऑनलाईन तर ६२ हजार ४८८ महिलांची नोंदणी ऑफलाईन पद्धतीने झाली आहे. ग्रामीण भागात नारी शक्ती दूत या ॲपद्वारे अंगणवाडी सेविका तसंच मदतनीसांकडून ही नोंदणी करून घेतली जात आहे.

लातूर जिल्ह्यात मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज भरून घेण्याची कार्यवाही गतीने सुरु आहे. या योजनेसाठी प्राप्त अर्जांच्या पहिल्या यादीचं चावडी वाचन आज जिल्ह्यातल्या सर्व शहरी आणि ग्रामीण भागात करण्यात आलं. अर्जदाराची नावं, त्यांनी अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांची यावेळी माहिती देण्यात आली. जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी तथा जिल्हा कार्यक्रम अधिकारी जावेद शेख यांनी औसा तालुक्यातल्या आलमला इथल्या चावडी वाचनास उपस्थित राहून मार्गदर्शन केलं. उदगीर नगरपरिषदेच्या चावडी वाचनास मुख्याधिकारी सुंदर बोंदर हे उपस्थित होते. जिल्ह्यात इतर ठिकाणीही तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी यावेळी चावडी वाचन उपक्रमाला भेट दिली.

अहमदनगर जिल्ह्यात या योजनेत जास्तीत जास्त लाभार्थी महिलांचा समाविष्ट करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने मदत केंद्र उभारण्यात आलं आहे. आज केडगाव परिसरातल्या मदत केंद्राचं जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आलं.

****

छत्रपती संभाजीनगर इथं ‘चला जाणून घेऊ या मतदान केंद्रालाहा दोन दिवसीय उपक्रम राबवला जात आहे. या अंतर्गत मतदारांना मतदान केंद्राची माहिती देणं तसंच त्यासंदर्भातील अडीअडचणी जाणून घेण्यात येत आहेत. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज सावंगी इथं मतदारांशी संवाद साधला. सरपंच श्विनी जगदाळे परिसरातील मतदार, सहकारी गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी यांच्यासह अनेक नागरिक यावेळी उपस्थित होते.

****

परभणी जिल्ह्यातल्या पर्यावरणाचा योग्य समतोल राखण्यासाठी तसच परभणी जिल्हा सुंदर आणि हरित करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने वृक्षवल्ली वाढवूया गाव हरित बनवूया राबवण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर यांनी कळवलं आहे. याबाबत एक प्रसिद्धीपत्रक काढण्यात आलं आहे. सर्व वयोगटातील लोकांना या वृक्ष लागवडीसाठी प्रेरित करण्यात येणार असून, गाव तिथे घनवन, स्मृति उद्या निर्मिती, नदीकाठी बांबू लागवड करणे, आदी उपक्रम राबवण्यात येणार आहे.

****

मुंबईत कालपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालं आहे. तीनही रेल्वे मार्गांवरील वाहतूक उशिराने सुरू असून प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. सखल भागांत पाणी साचल्याने वाहतुकीस अडथळे निर्माण झाले आहेत.

रायगड जिल्ह्यात काल रात्रीपासून जोरदार पाऊस कोसळत असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. जिल्ह्यातले नदी, नाले दुथडी भरून वहात आहेत. दरम्यान, अलिबागमध्ये असलेल्या सरकारी हॉस्पिटलमधे पाण्याची धार लागल्याने दुसऱ्या मजल्यावर पाणी झालं आहे. हवामान विभागाने रायगडला पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे.

पालघर जिल्ह्यात आज जोरदार पाऊस झाला. डहाणू, पालघर, बोईसर, जव्हारसह अनेक भागांत पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे जिल्ह्यातल्या अनेक नद्यांना मोठा पूर आला आहे.

हवामान विभागाने मुंबईसह ठाणे, आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुणे आणि सातारा जिल्ह्यांनाही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर नाशिक, पालघर, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

अहमदनगर तसंच जळगाव जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता असून, मराठवाड्याच्या अनेक भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 28.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 28 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...