Friday, 5 July 2024

TEXT-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 05.07.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date : 05 July 2024

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०५ जूलै २०२ दुपारी १.०० वा.

****

बिहार आणि आंध्र प्रदेश प्रमाणे महाराष्ट्रालाही विशेष दर्जा किंवा विशेष पॅकेज मिळावं यासाठी प्रयत्न करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केली. अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. वेतन, निवृत्ती वेतन आणि व्याजावर राज्य सरकारचा ५८ टक्के खर्च होतो. भविष्यात हा खर्च वाढत जाणार असल्यानं उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करावेच लागणार असल्याचं ते म्हणाले.

राज्याच्या राजकोषीय तुटीविषयी अर्थसंकल्पावरील चर्चेत विविध सदस्यांनी चिंता व्यक्त केली होती. त्यावर राज्यात ही तूट केंद्र सरकारने घालून दिलेल्या ३ टक्क्यांच्या मर्यादेत असल्याकडे पवार यांनी लक्ष वेधलं. २०२८ पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलरची करण्याचं उद्दिष्ट आहे. त्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. केंद्राकडून राज्याला मिळणाऱ्या कर हिश्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार असल्याचा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला. राज्याचा सर्वांगीण विकासहाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्प सादर केल्याचं पवार यांनी नमूद केलं.

****

राज्यातल्या शाळांमध्ये मुख्याध्यापक पदासाठी किमान १५० पटसंख्येच्या मर्यादेचा निकष सरसकट लागू करणं योग्य ठरणार नाही, असं शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. सदस्य जयंत आसगावकर यांनी आज विधान परिषदेत यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती, त्यावर केसरकर बोलत होते. दरम्यान, यासंबंधी प्राप्त झालेली सर्व निवेदनं आयुक्तांकडे पाठवण्यात आली आहेत आणि त्यांचा अहवाल आल्यावर सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन केसरकर यांनी दिलं.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जलसमृध्दी गाव अभियानाला आज पासून सुरुवात झाली. या अभियानांतर्गत गावातील जलस्त्रोतांच्या पुर्नभरणावर भर दिला जाणार असल्याचं, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक पेड माँ के नाम उपक्रम राबवण्याचं आवाहन केलं होतं, ‌त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात सामाजिक वन विभागाच्या वतीने शाळा, महाविद्यालय तसेच शासकीय कार्यालयासाठी मोफत रोपटे वितरित करण्यात येत असल्याची माहिती स्वामी यांनी दिली.

****

नांदेड जिल्ह्यात मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी येत्या आठ तारखेपासून ठिकठिकाणी शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे. या शिबिरांच्या माध्यमातून पात्र महिलांना योजनेची माहिती आणि आवश्यक कागदपत्रांबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या योजनेत सहभागासाठी ३१ ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे. कुठल्याही प्रकारची धावपळ न करता, घाईगडबड न करता, अमिषाला बळी न पडता या योजनेसाठी अर्ज करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केलं आहे.

दरम्यान, जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२४ साठी पीक विमा पोर्टल चालू झालं असून, १५ जुलैपर्यत यात सहभाग घेता आहे. शेतकऱ्यांनी अंतिम दिनांकाची वाट न बघता लवकरात लवकर पिक विमा भरुन घ्यावा, असं आवाहन जिल्हाधिकारी राऊत यांनी केलं आहे.

****

जालना जिल्ह्यातल्या कोतवाल संवर्गाच्या पदभरतीसाठी अध्यक्ष आणि सदस्य कोतवाल निवड समिती यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमधील रिक्त पदांसाठी उद्या शनिवारी दुपारी साडेतीन ते पाच या कालावधीत १४ केंद्रांवर परीक्षा होणार आहे. परीक्षा सुरळीत होण्यासाठी तसंच संभाव्य गैरप्रकार रोखण्याच्या अनुषंगाने प्रशासनाकडून सर्वतोपरी दक्षता घेण्यात येत आहे.

****

कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी बीड जिल्ह्यातल्या धोंडराईचे मंडळ अधिकारी पुरुषोत्तम आंधळे आणि राक्षसभुवन सज्जाच्या तलाठ्याला जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी निलंबित केलं आहे. अवैध वाळू उपसा प्रकरणी ठोस कारवाई केली नसल्याप्रकरणी ही कारवाई केल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा कार्यभार डॉ. प्रशांत बोकारे यांनी आज स्वीकारला. कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांचं राज्यपाल रमेश बैस यांनी निलंबन केल्यामुळे बोकारे यांच्याकडे हा कार्यभार देण्यात आला आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 16.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 16 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...