Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 09 July 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०९ जूलै २०२४ दुपारी १.०० वा.
****
आपल्या तिसऱ्या कार्यकाळात भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्याचे सरकारचं उद्दिष्ट असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आपल्या रशिया दौऱ्यात आज मॉस्को इथं भारतीय नागरिकांशी संवाद साधतांना, मोदी यांनी, भारतीय नागरिकांचं रशियाच्या प्रगतीत योगदान असल्याचं नमूद केलं. दरम्यान, मॉस्को इथं होणाऱ्या २२व्या भारत - रशिया वार्षिक शिखर परिषदेत रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्यासोबत सहअध्यक्षपद मोदी भूषवणार आहेत.
****
जम्मू-काश्मीरमध्ये कठुआ जिल्ह्यात लष्कराच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याला कडक प्रत्युत्तर आवश्यक असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. या हल्ल्यात वीरमरण आलेल्या सैनिकांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करत, जखमींच्या लवकर बरे होण्याची प्रार्थना करत असल्याचं राष्ट्रपतींनी ट्विट संदेशात म्हटलं आहे. काल झालेल्या या हल्ल्यात पाच सैनिकांना वीरमरण आलं, तर पाच जण जखमी झाले.
****
राज्यात बनावट पॅथॉलोजी लॅब वर नियंत्रण आणि कारवाईसाठी स्वतंत्र कायदा आणण्याची घोषणा मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. याबाबतचा प्रश्न सुनील राणे यांनी उपस्थित केला होता, त्याला उत्तर देताना, सामंत यांनी, या कायद्यात दर नियंत्रण, कलेक्शन सेंटर नोंदणी तसंच फौजदारी कारवाईची देखील तरतूद असेल, अशी माहिती दिली. कायदा अस्तित्वात येईपर्यंत राज्यभर जिल्हावार पथकं तयार करून पॅथॉलोजी लॅब ची तपासणी केली जाईल, तसंच कायदा आणण्यासाठी वेळ लागत असेल तर सध्याच्या नर्सिंग कायद्यात सुधारणा करून कारवाई केली जाईल अशी माहितीही उदय सामंत यांनी दिली.
****
राज्यात नवीन महसूल कार्यालय निर्मिती आणि अन्य विषयांबाबत शिफारशींसाठी निवृत्त सनदी अधिकारी उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज विधानपरिषदेत ही माहिती दिली.
राज्यात कारखान्यांमध्ये होणाऱ्या स्फोटाच्या आणि आगीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, औद्योगिक सुरक्षा विभागानं केलेल्या कार्यवाहीचा लेखाजोखा कामगार विभागानं हिवाळी अधिवेशनात मांडावा असे निर्देश उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आज विधानपरिषदेत दिले.
****
विधान परिषदेत आज नवनिर्वाचित आमदारांपैकी उर्वरित दोन आमदारांचा शपथविधी पार पडला. मुंबई पदवीधर मतदारसंघाचे आमदार विधिज्ञ अनिल परब आणि नाशिक शिक्षक मतदारसंघाचे आमदार किशोर दराडे यांना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सदस्यत्वाची शपथ दिली.
दरम्यान, वरळी हिट अँड रन प्रकरणाचे पडसाद आज अधिवेशनातही उमटले. कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वी विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत घोषणाबाजी केली.
****
येत्या काही दिवसात महाराष्ट्रात प्रचाराचे झंझावाती दौरे सुरु करणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. पवार यांनी आज आपल्या पक्षाचे मंत्री, खासदार, आमदार, आणि पदाधिकाऱ्यांसह मुंबईत सिद्धीविनायकाचे दर्शन घेतलं, त्यानंतर ते बोलत होते. १४ जुलै रोजी बारामती इथं जाहीर सभेने या दौऱ्याला प्रारंभ होत आहे.
****
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाला जनतेकडून देणगी स्वीकारता येणार आहे. यासंदर्भात पक्षाने केलेली मागणी केंद्रीय निवडणूक आयोगाने मान्य केली आहे.
****
बीड जिल्ह्यात काल झालेल्या जोरदार पावसात अहमदनगर मार्गावर कडा इथला पूल वाहून गेला. कडी नदीवर पुलाचं बांधकाम सुरू असून, वाहतुकीसाठी हा पुल तात्पुरता बांधण्यात आला होता. या मार्गावरुन वाहतुकीसाठी पर्याय मार्गाचा अवलंब करण्याचं आवाहन करण्यात आलं आहेर
****
लातूर जिल्ह्यात बालविवाह प्रतिबंधाबाबत जनजागृतीसाठी १२५ निवडक शाळांमध्ये इयत्ता सहावी ते दहावीचे विद्यार्थी आणि पालकांसाठी विशेष सत्र आयोजित करण्यात येणार आहे. जिल्हा कृती दलाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
****
ग्रामीण भागातील कचऱ्याचं योग्य प्रकारे वर्गीकरण करण्यासाठी हिंगोली जिल्ह्यात आजपासून ७ ऑगस्ट पर्यंत विशेष जनजागृती मोहीम राबवण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार यांनी ही माहिती दिली.
****
भारतीय ऑलिंपिक संघटनेनं पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेसाठी नेमबाज गगन नारंग यांची पथकाचे प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे. उद्घाटन सोहळ्यात टेबल टेनिसपटू शरत कमल आणि बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हे ध्वजवाहक असतील, येत्या २६ तारखेपासून या स्पर्धा सुरू होणार आहेत.
****
महिला क्रिकेटमध्ये भारत आणि दक्षिण अफ्रिकेदरम्यान तिसरा आणि अंतिम टी-ट्वेंटी क्रिकेट सामना आज चेन्नई इथं खेळला जाणार आहे. या मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा संघ एक - शून्यनं आघाडीवर आहे.
****
No comments:
Post a Comment