Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 09 July 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०९ जूलै २०२४ सकाळी ७.१० मि.
****
· नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्र सरकार तसंच राष्ट्रीय परीक्षा परिषदेला अहवाल सादर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
· पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात जिल्हास्तरावरील सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना
· छत्रपती संभाजीनगर विमानतळ विस्तारीकरणाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार – खासदार भागवत कराड यांची माहिती
आणि
· राज्यात विविध ठिकाणी जोरदार पाऊस, मुंबईसह कोकणात आज मुसळधार पावसाचा इशारा
****
नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्र सरकार तसंच राष्ट्रीय परीक्षा परिषदेला अहवाल सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. काल यासंदर्भात झालेल्या सुनावणीत न्यायालयानं, केंद्र सरकार तसंच राष्ट्रीय परीक्षा परिषदेला उद्या सायंकाळी पाच वाजेच्या आत हा अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे. केंद्रीय अन्वेषण विभाग-सीबीआयलाही आतापर्यंतच्या तपासासंदर्भात एक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. परीक्षेच्या पावित्र्याबाबत तडजोड झाल्याचं, स्पष्ट दिसत असलं तरीही परीक्षा रद्द करणं हा अखेरचा पर्याय आहे. पुनर्परीक्षेचे निर्देश देण्यापूर्वी पेपर कुठून फुटला याचा छडा लावणं आवश्यक असल्याचं, न्यायालयानं नमूद केलं. या प्रकरणी पुढची सुनावणी परवा गुरुवारी होणार आहे.
****
'नीट' परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी लातूर इथला शिक्षक आरोपी संजय जाधव याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. जाधव याची सीबीआय कोठडी काल संपल्यानं, त्याला लातूर न्यायालयात हजर करण्यात आलं.
दरम्यान, या प्रकरणात दिल्लीतल्या गंगाधर नामक आरोपीला आंध्र प्रदेशात अटक झाली असून, सीबीआयचं पथक त्याला अटक करून लातूरमध्ये आणणार आहे. इरण्णा कोनगलवार हा आरोपी अद्यापही फरार असून सीबीआय त्याचाही कसून शोध घेत आहे.
****
राज्यभरात ‘हिट अँड रन’ च्या घटनांमध्ये कुणाचाही मुलाहिजा न ठेवता कठोर कारवाईचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. सर्वसामान्य नागरिक हे आमच्यासाठी सर्वांत महत्त्वाचे आहेत, त्यामुळे ‘हिट अँड रन’ सारखी प्रकरणे अत्यंत गांभीर्याने हाताळावीत आणि पीडितांना न्याय देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी पोलिस प्रशासनाला दिले आहेत. काही धनदांडगे तसंच राजकारणी लोक आपल्या पदाचा गैरवापर करून व्यवस्था वाकवण्याचा प्रयत्न करत असतील तर ते अजिबात खपवून घेतलं जाणार नाही, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. सर्व जनतेसाठी, सुरक्षित महाराष्ट्रासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
****
राज्यात सर्वदूर सुरु असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरावरील सर्व यंत्रणांनी सतर्क आणि सज्ज राहण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. राज्यातल्या पाऊस परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी काल मंत्रालयातल्या नियंत्रण कक्षाला भेट दिल्यानंतर ते बोलत होते. मुंबईत रविवारी रात्रीपासून सुमारे ३०० मिलीमीटर पाऊस झाला, अतिवृष्टीच्या निकषापेक्षा हे प्रमाण अत्यधिक असल्याने, ही परिस्थिती उद्भवल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी मुंबई महापालिकेनं केलेल्या होल्डिंग पाँण्डस् आणि मायक्रो टनलिंग यामुळे पूर्वी पाणी साचण्याच्या ठिकाणी यंदा पाणी साचलं नसल्याची माहिती त्यांनी दिली. मिठी नदीला फ्लड गेट बसवण्यात येत असल्याने, भरतीच्या वेळेस समुद्राचे पाणी शहरात येणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
दरम्यान, स्वतःच्या अपयशाचं खापर मुख्यमंत्री पावसावर फोडत असल्याची टीका, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ते काल मुंबईत माध्यमांशी बोलत होते. राज्याच्या अनेक भागात पावसाअभावी दुबार पेरणीचे संकट ओढवलं आहे, अनेक गावांत पाणी टंचाई, चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत आहे, यासंदर्भात सरकार मंत्रालयातून आदेश देतं, मात्र प्रशासन काहीच काम करत नाही, याकडे सरकार कधी लक्ष देणार, असा प्रश्न पटोले यांनी विचारला.
****
शासनाच्या स्व-मालकीच्या जागेतील अंगणवाड्यांमधून दरवर्षी पाच हजार अंगणवाड्या स्मार्ट करण्याची योजना सुरू आहे. याअंतर्गत मागील तीन वर्षात १६ हजार ८८५ अंगणवाडी केंद्रांचे स्मार्ट अंगणवाडी केंद्रांमध्ये रुपांतर झाल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. त्या काल विधान परिषदेत बोलत होत्या.
****
विधान परिषदेच्या दोन नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी काल पार पडला. कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे आणि मुंबई शिक्षक मतदारसंघाचे आमदार जगन्नाथ अभ्यंकर यांना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सदस्यत्वाची शपथ दिली.
****
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीने गेल्या आठ दशकांत सामाजिक तसंच आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातल्या अनेक पिढ्यांना शिक्षित आणि स्वावलंबी केलं, असे गौरवोद्गार राज्यपाल रमेश बैस यांनी काढले आहेत. पीपल्स एजुकेशन सोसायटी शिक्षण संस्थेचा ७९ वा वर्धापन दिन काल मुंबईत राज्यपालांच्या उपस्थितीत साजरा झाला, त्यावेळी ते बोलत होते. केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री आणि पीपल्स एजुकेशन सोसायटीचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
छत्रपती संभाजीनगर शहरातल्या विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याचं, खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी सांगितलं आहे. काल विमानतळ विस्तारीकरणासंदर्भात आढावा बैठक घेतल्यानंतर, ते पत्रकार परिषदेत बोलत होते. विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या कामासाठी १३९ एकर जमीन संपादित करण्यात येणार आहे. हे काम झाल्यावर छत्रपती संभाजीनगरहून एयर रशियाची विमान सेवा सुरू होईल असंही त्यांनी सांगितलं. शहरवासियांना दररोज पेयजल पुरवठ्यासंदर्भात समांतर जलवाहिनीच्या अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या असून, आतापर्यंत ३२ किलोमीटर जलवाहिनी टाकण्याचं काम झालं आहे, तर आठ जलकुंभ उभारण्यात आल्याची माहिती कराड यांनी यावेळी दिली.
****
राज्यात काल विविध ठिकाणी जोरदार पाऊस झाला.
मुंबईत मुसळधार पवसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून, वाहतुकीवर परिणाम झाला आहे. उपनगरीय रेल्वेसह मध्य रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाड्या देखील उशीरानं धावत आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. परिणामी पंचगंगा नदीचं पात्र फुगलं आहे. कोल्हापूर - बाजारभोगाव - राजापूर राज्यमार्ग बंद झाला आहे. मुसळधार पावसामुळे ठाणे, वसई, महाड, चिपळूण, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सिंधुदुर्ग इथं राष्ट्रीय आपत्ती निवारण दल - एनडीआरएफची पथकं तैनात करण्यात आली आहेत.
रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊस होत असून, नद्यांच्या पाण्यात वाढ झाली आहे. रायगड किल्ला परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाल्यामुळे कालपासून किल्ला पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही संततधार पाऊस होत असून जनजीवन विस्कळीत झालं आहे.
मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि पुणे या जिल्ह्यांना अति मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर या जिल्ह्यांमध्ये आज सर्व शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे.
दरम्यान, येत्या दोन दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून, तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता असून तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होईल, असं पुणे वेधशाळेनं कळवलं आहे.
****
मराठवाड्यात नवयुग आणण्यासाठी आगामी काळात अधिक प्रयत्नांची गरज, हैदराबाद मुक्ती संग्रामाचे अभ्यासक तसंच राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांनी व्यक्त केली आहे. राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य धनंजय गुडसूरकर यांच्या 'खळाळल्या शृंखला' या मुक्तिसंग्रामावर आधारित ग्रंथाचं प्रकाशन, दिवेगावकर यांच्या हस्ते पुण्यात नुकतंच झालं, त्यावेळी ते बोलत होते. सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. सामंतशाही राजवट आणि स्वातंत्र्याला झालेला उशीर, यामुळे मराठवाडा मागास राहिल्याचं निरीक्षण दिवेगावकर यांनी नोंदवलं.
****
नांदेडमध्ये काल मराठा आरक्षण जनजागृती शांतता फेरी काढण्यात आली. या रॅलीत मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्या प्रमुख उपस्थितीत काल जाहीर सभा घेण्यात आली. मराठ्यांचा आरक्षणाचा लढा ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय समाप्त होणार नाही, असं ते यावेळी म्हणाले.
दरम्यान, जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत आज लातूर इथं शांतता रॅलीसह सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर काल लातूर शहरात मोटरसायकल फेरी काढण्यात आली.
****
संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात काल सातारा जिल्ह्यात चांदोबाचा लिंब परिसरात उभा रिंगण सोहळा पार पडला. शेकडो वारकरी तसंच भाविकांनी हा सोहळा अनुभवला. ही पालखी आज तरडगाव इथून मागर्गस्थ होत आहे.
****
परभणी जिल्ह्यात इच्छुक भटक्या जमाती क प्रवर्गातल्या धनगर समाजातल्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षसाठी इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये प्रवेश देण्यासाठी १४ जुलैपर्यंत अर्ज मागवण्यात आले आहेत. पात्र लाभार्थ्यांनी अर्ज सादर करण्याचं आवाहन सहायक संचालक गीता गुठ्ठे यांनी केलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव इथं काल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची माहिती देण्यासाठी महिला मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी महिलांना मार्गदर्शन केलं.
****
सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकांसाठी राबवण्यात येणार्या ‘मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन बीड तसंच लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आलं आहे.
परभणी शहर आणि ग्रामीण भागात देखील नागरीकांनी विशेष सहाय योजनेअंतर्गत विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढील १५ दिवसांत कागदपत्रं सादर करण्याचं आवाहन तहसीलदार डॉ. संदीप राजपुरे यांनी केलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने शहरात आमखास मैदान लगत डॉ.बाबासाहेब आंबेडकर मनोरंजन पार्क, तारांगण आणि नावीन्यपूर्ण संग्रहालय विकसित करण्यात येत आहे. महापालिकेच्या वतीनं काल या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलं.
****
No comments:
Post a Comment