Tuesday, 9 July 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 09.07.2024 रोजीचे सकाळी:11.00,वाजताचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

संक्षिप्त बातमीपत्र

०९ जूलै २०२ सकाळी ११.०० वाजता

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रशियात मॉस्को इथं रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्यासोबत २२व्या भारत - रशिया वार्षिक शिखर परिषदेचं सहअध्यक्षपद भूषवणार आहेत. या परिषदेत उभय नेते संरक्षण, व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, सहकार, शिक्षण, यासह विविध मुद्यांवर चर्चा करणार आहेत.

****

जम्मू-काश्मीरमध्ये कथुआ जिल्ह्यात काल झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाच सैनिक हुतात्मा झाले, तर पाच जण जखमी झाले. गस्तीवर असलेल्या जवानांच्या वाहनांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर ही चकमक झाली. या भागात मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम राबवण्यात येत आहे.

****

महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीच्या काळात रजा देण्यासंदर्भात राज्यं आणि इतर संबंधित संस्थांशी चर्चा करून एक धोरण तयार करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. महिला कल्याण मंत्रालयानं यासंदर्भात संबंधितांशी बैठका घ्याव्यात आणि यासंदर्भात धोरण तयार करण्याचा विचार करावा, असंही न्यायालयानं काल यासंदर्भातल्या सुनावणी दरम्यान सांगितलं.

****

खरीप पिकांच्या लागवडीच्या क्षेत्रात यंदाच्या हंगामात गेल्या वर्षीच्या तुलनेत ४७ लाख हेक्टरनं वाढ झाली आहे. खरीप लागवडीखालचं क्षेत्र गेल्या वर्षी ३३१ लाख हेक्टर इतकं होतं, यंदा ते वाढून ३७८ हेक्टर इतकं झालं आहे. यापैकी ६० लाख हेक्टर क्षेत्रावर भाताची, तर ३६ लाख हेक्टर क्षेत्रात डाळींची लागवड करण्यात आली असल्याचं कृषी मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीत म्हटले आहे.

****

मुलींना शिक्षणात १०० टक्के सवलत देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचा शासन निर्णय काल जाहीर झाला. ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न आठ लाखाहून कमी असेल, अशा कुटुंबाना ही सवलत दिली जाईल. शैक्षणिक वर्ष २०२४- २५ पासून हा निर्णय लागू करण्यात येणार असून, यासाठी ९०६ कोटी पाच लाख रुपये एवढा निधी मंजूर कऱण्यात आला आहे.

****

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनतेकडून देणगी स्वीकारण्याची राष्ट्रवादी कॉँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाने केलेली मागणी केंद्रीय निवडणूक आयोगाने मान्य केली आहे. पक्षाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं काल निवडणूक आयोगाची भेट घेतल्यानंतर, त्यांनी ही माहिती दिली.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 24.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 24 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...