Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 15 July 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १५ जूलै २०२४ दुपारी १.०० वा.
****
देशातल्या किरकोळ व्यापार क्षेत्रातल्या डिजिटल व्यवहारांचं प्रमाण २०३० पर्यंत दुप्पट म्हणजेच सात लाख कोटी डॉलर्सवर जाण्याची शक्यता आहे. ऍमेझॉन पे आणि केर्ने या संस्थांच्या संयुक्त अभ्यासात हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. २०३० पर्यंत भारतातल्या ई कॉमर्स बाजारपेठेत २१ टक्क्यांनी वाढ होईल असं या अभ्यास अहवालात म्हटलं असून या अहवालानुसार २०२२ या वर्षातले फक्त भारतातले डिजिटल आर्थिक व्यवहार संपूर्ण जगाच्या डिजिटल आर्थिक व्यवहारांच्या ४६ टक्के इतके आहेत.
****
नेपाळच्या पंतप्रधानपदी के पी शर्मा ओली यांची निवड झाल्याबद्दल, पंतप्रधान नरेंद मोदी यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे. भारत आणि नेपाळ मधील मैत्रीपूर्ण संबंध दृढ करण्यासाठी तसंच दोन्ही देशांमध्ये परस्पर द्विपक्षीय सहकार्याचा आणखी विस्तार करण्यासाठी उत्सुक असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी आपल्या समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे.
****
विक्रम मिस्त्री यांनी आज परराष्ट्र सचिव पदाचा कार्यभार स्वीकारला. मिस्री हे १९८९ तुकडीचे आयएफएस अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या सचिवालयात उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. चीन, म्यानमार आणि स्पेनमध्ये भारतीय दूत म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल तसंच डॉ मनमोहन सिंग यांचे खाजगी सचिव म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. यापूर्वी या पदाचा कार्यभार विनय मोहन क्वात्रा यांच्याकडे होता, त्यांचा कार्यकाळ संपल्यानं मिस्त्री यांची या पदी निवड करण्यात आली.
****
महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा आणण्यामागे, शहरी नक्षलवादाच्या नावाखाली पुरोगामी चळवळींना लक्ष्य करण्याचा सरकारचा उद्देश असल्याची टीका, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. समाज माध्यमावरील संदेशात त्यांनी हे मत व्यक्त केलं आहे. कोणताही कायदा करतांना, त्यावर विधी आयोगाकडून मत घेणं, जनतेकडून आणि तज्ञांकडून अभिप्राय घेणं आणि विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात त्यावर सखोल चर्चा होणे अशी प्रक्रिया असतांना सरकार कोणालाही न जुमानता हा पाशवी कायदा अध्यादेशाद्वारे आणत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. हे विधेयक घटनाविरोधी असून सर्व विरोधी पक्षांचा या विधेयकाला पूर्णपणे विरोध आहे असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
****
दुधाला प्रति लिटर ४० रुपये भाव तसंच रास्त आणि किफायतशीर दर- एफआरपी देण्याच्या प्रमुख मागणीसाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं राज्यभरात आजपासून २१ जुलै पर्यंत तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. शेतकरी संघर्ष समितीचे समन्वयक अजित नवले यांनी ही माहिती दिली.
****
नाशिक जिल्ह्यात खरीपाच्या पेरणीला वेग आला असून ७० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. येवला तालुक्यात शंभर टक्के पेरण्या झाल्या असून चांदवड, मालेगाव, निफाड, नांदगाव, देवळा आणि बागलाण या सहा तालुक्यांमध्ये ८५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.
****
रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा आजचा चौथा दिवस असून गेल्या २४ तासांत खेडमध्ये तब्बल २३१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही पावसाचा जोर कायम आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत १२२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यातल्या तेरेखोल, गड, कर्ली, वाघोटन या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. सखल भागात पाणी शिरल्यानं, रस्ते वाहतूक ठप्प झाली असून जनजीवन विस्कळीत झालं आहे.
दरम्यान, या पावसामुळे कोकण रेल्वेमार्गावरील काही रेल्वेगाड्या रत्नागिरी रेल्वेस्थानकात रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाशांना मुंबईला सोडण्यासाठी एसटी बसेसची व्यवस्था करण्यात येत असून, रत्नागिरी स्थानकात ४०, चिपळूण स्थानकात १८, तर खेड स्थानकात १० बस पाठवल्या जात आहेत.
****
मराठवाड्यात काल छत्रपती संभाजीनगर शहर तुरळक पाऊस झाला. बीड जिल्ह्यासह धारुर, चुंबळी फाटा, परळी, गेवराई, गढी या भागात काल जोरदार पाऊस झाला. या पावसामुळं शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. तर परभणी जिल्ह्यात काल सोनपेठ शहर आणि तालूक्यात तसंच जिंतूर तालूक्यात येलदरी परिसरात रिमझिम स्वरुपाचा पाऊस झाला. धाराशिव शहर परिसरात काल संध्याकाळच्या सुमारास जोरदार पावसानं हजेरी लावली. यामुळे शहरातल्या प्रमुख तसंच अंतर्गत रस्त्यांवर पाणी साचलं.
****
राज्यात आज रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, परभणी, हिंगोली, अमरावती, पुणे, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांसाठी हवामान विभागानं रेड अलर्ट दिला आहे. तर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, नांदेड आणि बीड जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट दिला आहे.
****
No comments:
Post a Comment