Monday, 15 July 2024

TEXT-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 15.07.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 15 July 2024

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १५ जूलै २०२४ सायंकाळी ६.१०

****

·      संसदेत घुसखोरी प्रकरणी दिल्ली पोलिसांकडून सर्व सहा आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल

·      खोट्या बातमीसंदर्भात खासगी वृत्तवाहिनीवर कारवाईचा आमदार पंकजा मुंडे यांचा इशारा

·      दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं राज्यभरात २१ जुलैपर्यंत आंदोलनं

·      मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीला मराठवाड्यातून लक्षणीय प्रतिसाद

आणि

·      देशभरात २७ जुलैपर्यंत पावसाचा जोर कायम-राज्यात पुढील पाच दिवस पावसाचे

****

संसदेत घुसखोरी प्रकरणी दिल्ली पोलिसांनी अमोल शिंदे याच्यासह मनोरंजन डी, ललित झा, महेश कुमावत, सागर शर्मा आणि नीलम आझाद या सर्व सहा आरोपींच्या विरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे. या सर्व आरोपींना दोन ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर करून सुनावणी होणार आहे. या सर्वांनी १३ डिसेंबर २०२३ रोजी संसदेत घुसखोरी केली, तसंच लोकसभेचं कामकाज चालू असतांना प्रेक्षकदीर्घेतून दालनात उतरत, धुराचे डबे फोडले होते.

****

भाजपाच्या राष्ट्रीय सचिव तथा आमदार पंकजा मुंडे यांनी आपल्याबाबत खोटी बातमी चालवणाऱ्या खासगी वृत्तवाहिनीवर अब्रू नुकसानीचा दावा करणार असल्याचं म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीने वादग्रस्त प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकर यांच्या अनुषंगाने पंकजा मुंडे यांच्याबद्दल बातमी प्रसारित केली होती, या बातमीत काहीही तथ्य नसल्याचं सांगत, संबंधित वृत्तवहिनीविरोधात अब्रू नुकसानीचा दावा करणार असल्याचं मुंडे यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे.

****

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मंत्री छगन भुजबळ यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवारांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी झालेल्या या बैठकीमुळे चर्चांना उधाण आलं आहे. भुजबळ यांनी मात्र, ही भेट ओबीसी आणि मराठा आरक्षणावरून सुरू असलेल्या वादावर चर्चा करण्यासाठी घेतल्याचं सांगितलं जात आहे. राज्यातील वाद मिटवण्यासाठी पुढाकार घेण्याची विनंती पवार यांना केल्याचं भुजबळ यांनी म्हटलं आहे.

****

महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा आणण्यामागे, शहरी नक्षलवादाच्या नावाखाली पुरोगामी चळवळींना लक्ष्य करण्याचा सरकारचा उद्देश असल्याची टीका, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. समाज माध्यमावरील संदेशात त्यांनी हे मत व्यक्त केलं आहे. सरकार अध्यादेशाद्वारे हा कायदा आणत असून, सर्व विरोधी पक्षांचा या विधेयकाला पूर्णपणे विरोध आहे असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

****

भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी संवाद यात्रेच्या माध्यमातून राज्यातील कानाकोपऱ्यात पोहचणार असल्याची माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ते आज नागपूरारात माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. येत्या २१ जुलै रोजी राज्यातल्या भाजपाच्या पाच हजार पदाधिकाऱ्यांचं पुण्यात अधिवेशन होणार असून या अधिवेशनात संवाद यात्रेविषयी अंतिम रूपरेषा तसंच तारीख ठरणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं.

****

 

दुधाला प्रतिलीटर ४० रुपये भाव तसंच रास्त आणि किफायतशीर दर- एफआरपी देण्याच्या प्रमुख मागणीसाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं राज्यभरात आजपासून २१ जुलै पर्यंत तीव्र आंदोलनं करण्यात येणार आहे. शेतकरी संघर्ष समितीचे समन्वयक अजित नवले यांनी ही माहिती दिली. दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यात आज आंदोलनाच्या दहाव्या दिवशी कोतुळ इथं आंदोलनाच्या मंडपाच्या समोर दूध हंडी फोडण्यात आली.

****

राज्य सहकारी पणन महासंघ तसंच नाफेड कार्यालयाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार मका, तूर, चणा, मूग, उडीद आणि सोयाबीन खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी नाफेड कार्यालयाने ई समृध्दी पोर्टल तयार केलं आहे. शेतकऱ्यांनी या पोर्टलवर खरेदी पूर्व नोंदणी करावी, असं आवाहन पणन महासंघामार्फत आवाहन करण्यात आलं आहे. नोंदणीसाठी कार्यालयाकडून जारी करण्यात आलेला क्यूआर कोड स्कॅन करावा, अथवा संकेतस्थळाला भेट द्यावी, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीला मराठवाड्यातून लक्षणीय प्रतिसाद मिळत आहे. या योजनेचे निकष आता अधिक सोपे करण्यात आले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुवर्णा जाधव यांनी आकाशवाणीला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन ही योजना आता खूप सोप्पी केली आहे. त्यांच्या साठी २१ ते ६५ वयोगटातील महिला, विवाहीत महिला, विधवा, घटस्फोटीत, परित्यकर्त्या आणि निराधार महिलांना त्याच बरोबर एखाद्या कुटूंबातील अविवाहित महिला तिला ही हा हक्क दिला जाणार आहे. ही अर्ज प्रक्रिया फार सोपी केली आहे त्यासाठी आता उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाही आहे पिवळं आणि केशरी रेशन कार्ड चालू शकत याच बराबर पाच एकर शेतीची अट ही आता वगळण्यात आली आहे.

 

जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुवर्णा जाधव यांची ही पूर्ण मुलाखत प्रासंगिक या सदरात प्रसारित केली जाणार आहे

****

नांदेड जिल्ह्यात या योजनेसाठी आतापर्यंत ७० हजाराहून अधिक अर्ज प्राप्त झाल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली. महिलांकडून ऑफलाईन अर्जही स्वीकारले जात आहेत. गावोगाव अर्ज भरून घेण्यासाठी शिबीरं घेतली जात आहेत. महापालिकेअंतर्गतही अर्ज भरून घेण्यासाठी मदत केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. कोणीही मध्यस्थामार्फत अर्ज भरून घेण्यासाठी प्रयत्न करू नये तसंच कोणी पैसे मागत असतील तर त्यांची तक्रार करावी असं आवाहन जिल्हाधिकारी राऊत यांनी केलं आहे.

****

हिंगोली जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी महिला मोठी गर्दी करत आहेत. मोबाईलवर तसंच सेवा केंद्रांवरूनही हे अर्ज भरता येणार आहेत.

यासाठी प्रत्येक ग्राम पातळीवर ग्राम समिती आणि नगर पंचायत तसंच नगरपालिका पातळीवर वॉर्डसमिती नियुक्त केली असल्याची माहिती हिंगोलीचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. महिलांच्या सुविधेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया पुन्हा सोपी झाली असून अधिकाधिक महिलांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

****

देशभरात २७ जुलैपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मोसमी पावसासाठी महाराष्ट्रासह देशभरात पोषक वातावरण निर्माण झालं आहे. राज्यात पुढील पाच दिवस पावसाचे असणार असून, किनारपट्टीवर बहुतांश ठिकाणी, तर घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

 

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दरडी कोसळणं आणि वीज अंगावर वीज कोसळून मृत्यू झालेल्यांची संख्या १०७ वर पोहोचली आहे. राज्यातील २० जिल्ह्यांतील साडे आठ लाखांहून अधिक नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. नाशिकमध्ये पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. लोणावळ्यातील धबधब्यांच्या परिसरात पर्यटनासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे.

 

रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात रेड अलर्टजारी करण्यात आला आहे. कोकणातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अनेक नद्यांनी पुराची पातळी गाठली आहे. खेड ते दिवाणखवटी दरम्यान दरड कोसळल्याने कोकण रेल्वे मार्ग ठप्प झाला आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी बसची व्यवस्था करण्यात आली आहे.

 

मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर शहर परिसरात आजही पावसाच्या सरी कोसळल्या. जालना शहरासह जिल्ह्यात बहुतांश भागात आज दुपारी मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. जालना आणि छत्रपती संभाजीनगर शहरासह, बीड, धाराशिव तसंच परभणी जिल्ह्यात काल अनेक भागात जोरदार पाऊस झाला. या पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्यात नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

****

महसुली कर्मचारी संघटनांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आजपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केलं आहे. सुधारित आकृतीबंध कर्मचारी कपात न करता लागू करावा यासह इतर मागण्यांसाठी पुकारलेल्या या आंदोलनामुळे हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, कळमनुरी, सेनगाव, औंढा नागनाथ, तसंच वसमत या तहसील कार्यालयात आज कामकाज होऊ शकलं नाही. परभणी जिल्ह्यातील महसूल कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह कर्मचऱ्यांनी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केलं आहे.

बीड इथं संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी इमारती बाहेर निदर्शने करत आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. छत्रपती संभाजीनगर इथंही महसूल विभागाचे बहुतांश कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत.

****

मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारणीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली हे. या निवडणुकीत मतदान करणाऱ्या मतदारांची यादी उद्यापासून परिषदेच्या छत्रपती संभाजीनगर इथल्या कार्यालयात अवलोकनासाठी ठेवण्यात येणार आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 29.06.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 29 June 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...