आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
१६
जूलै २०२४ सकाळी
११.०० वाजता
****
सरकारनं
आजपासून सर्व विमानं आणि विमान इंजिनाच्या विविध भागांवर पाच टक्के एकसमान एकात्मिक
वस्तू आणि सेवा कर - आयजीएसटी लागू केला आहे. याआधी वेगवेगळ्या प्रकारासाठी हा दर पाच, बारा, अठरा
ते 28 टक्क्यांपर्यंत आकारला जात असल्यानं, तसंच तो वेगवेगळ्या खात्यांमध्ये जमा होत असल्यानं, ही कररचना जटिल झाली होती. ती एकसमान दर लागू करून सुटसुटीत
केली असल्याचं, नागरी हवाई वाहतूक मंत्री राममोहन
नायडू यांनी म्हटलं आहे.
****
भारताची
निर्यात जून महिन्यात पाच पूर्णांक चार दशांश टक्क्यांनी वाढून ६५ अब्ज ४७ कोटी डॉलरवर
पोचली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं ही आकडेवारी प्रसिद्ध केली. अभियांत्रिकीविषयक
सामग्री, इलेक्ट्रॉनिक उत्पादनं, औषधं, कॉफी
इत्यादींची निर्यात वाढल्यामुळे भारताकडून होत असलेल्या निर्यातीला बळ मिळाल्याचं मंत्रालयानं
म्हटलं आहे.
****
कौशल्य
ही आजच्या काळाची गरज असून, प्रत्येकाकडे
आपल्या व्यवसायातलं कौशल्य असणं आवश्यक असल्याचं, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. मुंबईत काल
जागतिक कौशल्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कौशल्य आणि व्यवसाय शिक्षण
मंडळातर्फे विविध क्षेत्रातल्या प्रशिक्षणार्थींना तसंच उत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण
संस्थांना यावेळी पारितोषिकं देण्यात आली.
दरम्यान, कौशल्य दिनानिमित्त काल नाशिकमध्ये पालकमंत्री दादा भुसे यांच्या
उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात ७०० शिकाऊ उमेदवारांना नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात
आलं.
****
मुंबई
- पुणे द्रूतगती महामार्गावर लोणावळ्या जवळ मध्यरात्री, भाविकांनी भरलेली खाजगी बस ट्रॅक्टरला धडकून झालेल्या भीषण अपघातात, पाच भाविकांचा मृत्यू झाला, तर ४२ जण जखमी झाले. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरच्या दिशेनं ही बस जात होती, बसमधले सर्व प्रवाशी डोंबिवली इथले असल्याची माहिती पोलिसांनी
दिली आहे.
****
मराठवाडा
साहित्य परिषदेच्या कार्यकारणीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून, या निवडणुकीत मतदान करणाऱ्या मतदारांची यादी आजपासून परिषदेच्या
छत्रपती संभाजीनगर इथल्या कार्यालयात अवलोकनासाठी ठेवण्यात येणार आहे. पाच ऑगस्टपर्यंत
या मतदार यादीवर आक्षेप नोंदवता येणार असून, अंतिम यादी २० ऑगस्टला जाहीर होणार आहे.
****
No comments:
Post a Comment