Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 18 July 2024
Time: 01.00 to
01.05 PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १८ जूलै २०२४ दुपारी १.०० वा.
****
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती नोंगमेइकापस
कोटिस्वर सिंह आणि न्यायमूर्ती आर महादेवन यांनी आज शपथ घेतली. सर्वोच्च न्यायालयाचे
मुख्य न्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी त्यांना न्यायाधीश पदाची शपथ दिली. न्यायमूर्ती
नोंगमेइकापस कोटिस्वर सिंह ह्यांनी यापूर्वी जम्मू काश्मीर आणि लद्दाख उच्च न्यायालयाचे
मुख्य न्यायाधीश म्हणून तर न्यायमूर्ती आर
महादेवन यांनी चेन्नई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून काम पाहिलं आहे.
****
सर्वोच्च न्यायालयात आज नीट युजीशी संबंधित याचिकांवर
सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती जे. व्ही. पारडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज
मिश्रा यांच्या पीठासमोर चाळीसहून अधिक याचिकांवर आज सुनावणी होणार असून, यामध्ये उच्च न्यायालयांमध्ये प्रलंबित प्रकरणं सर्वोच्च
न्यायालयात वर्ग करण्याबाबतच्या दोन याचिकांचाही समावेश आहे.
****
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या आयईडी स्फोटात
विशेष कार्यदलाचे दोन सैनिक हुतात्मा झाले तर चार सैनिक जखमी झाले आहेत. छत्तीसगडच्या
बीजापूर आणि सुकमा जिल्ह्यांच्या सीमेजवळ नक्षलवाद्यांचा शोध घेण्यासाठी विशेष कार्यदलानं
मोहीम राबवली, त्यादरम्यान नक्षलवाद्यांनी हा स्फोट
घडवून आणला.
****
वादग्रस्त प्रशिक्षणार्थी प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकरची
आई मनोरमा खेडकर यांना पोलिसांनी आज रायगड जिल्ह्यातून ताब्यात घेतलं. महाड इथल्या
एका खाजगी हॉटेलमधून खेडकर यानं ताब्यात घेऊन पुणे पोलिस पुण्याकडे रवाना झाले आहेत. पौंड पोलिसांच्या
ताब्यात दिल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यात एका
शेतकऱ्याला बंदूक रोखून धमकवल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या फरार होत्या.
****
राज्यातल्या मातंग समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय असा सर्वांगीण विकास करण्यासाठी अण्णा
भाऊ साठे संशोधन- प्रशिक्षण संस्था - आर्टी स्थापन करण्याचा शासन निर्णय काल जारी करण्यात
आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था - बार्टी या संस्थेच्या धर्तीवर
ही संस्था स्थापन करण्यात आली आहे. या संस्थेसाठी व्यवस्थापकीय संचालक आणि निबंधक अशा
दोन पदांनादेखील मान्यता देण्यात आली आहे.
****
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार माधवराव गायकवाड यांच्या स्मृती प्रित्यर्थ
देण्यात येणारा स्मृती जीवनगौरव पुरस्कार छत्रपती संभाजीनगर इथले ज्येष्ठ कम्युनिस्ट
नेते भालचंद्र कांगो यांना जाहीर झाला आहे. यंदा या पुरस्काराचं सहावं वर्ष आहे. ५१
हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह, गौरवपत्र आणि शाल असं पुरस्काराचं स्वरूप आहे. येत्या
नोव्हेंबर महिन्यात छत्रपती संभाजीनगर इथं या पुरस्काराचं वितरण करण्यात येणार आहे.
या संस्थेच्या अध्यक्ष विधीज्ञ साधना गायकवाड यांनी ही माहिती दिली.
****
परभणी जिल्ह्यात जिंतूर तालुक्यातल्या जोगवाडा सोस परिसरात
ढगफुटीसदृश पाऊस झाल्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. महसूल विभागाने नुकसानीचे
पंचनामे करून आर्थिक मदत करण्याची मागणी शेतकरी करत आहेत.
****
सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळं जिल्ह्यतल्या
तेरेखोल, गड, कर्ली, वाघोटन या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. तेरेखोल नदी इशारा पातळीवरून
वाहत असल्यानं नदीकाठच्या लोकांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे.
****
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांचे
अर्ज भरून घेण्यासाठी लातूर जिल्हा प्रशासनामार्फत विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत.
प्रत्येक गावामध्ये, तसंच शहरी भागात विविध
ठिकाणी योजनेच्या अर्ज नोंदणी शिबिरांचं आयोजन केलं जात आहे. आषाढी एकादशीनिमित्त काल
जिल्ह्यातल्या अनेक मंदिरांमध्ये महिलांना या योजनेविषयी माहिती देऊन, अर्जांचं वितरण करण्यात आलं.
****
पॅरिस ऑलिंपिकसाठी भारतीय संघाच्या यादीवर केंद्रीय क्रीडा
मंत्रालयानं शिक्कामोर्तब केलं आहे. संघात ११७ खेळाडूंचा समावेश असून सोबत १४० तज्ञ, अधिकारी आणि कर्मचारी असतील. एथलेटिक्स प्रकारात सर्वाधिक
२९ खेळाडूंची निवड झाली असून, नेमबाजीसाठी २१, हॉकीसाठी १९ खेळाडू भारताचं प्रतिनिधित्व करतील.
****
महिलांच्या आशिया विश्वचषक टी २० क्रिकेट स्पर्धेला उद्यापासून
श्रीलंकेतील दाम्बुला इथं सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतले सर्व सामने रनगिरी दाम्बुला
आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात खेळवले जातील. ए गटात संयुक्त अरब अमिरात आणि नेपाल यांच्यात
होण्याऱ्या सामन्यानं या स्पर्धेला सुरुवात होईल. ए गटात भारत, नेपाल, पाकिस्तान, संयुक्त अरब अमिरात यांचा समावेश असून बी गटात श्रीलंका, बांग्लादेश, थायलंड, आणि मलेशिया यांचा समावेश आहे. या स्पर्धेतला उपांत्य सामना
२६ जुलैला तर अंतिम सामना २८ जुलैला होणार आहे.
****
No comments:
Post a Comment