Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 18 July 2024
Time
18.10 to 18.20
Language
Marathi
आकाशवाणी
छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
– १८ जूलै २०२४
सायंकाळी ६.१०
****
·
नीट यूजी गैरप्रकार प्रकरणी ४० याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात
सुनावणीस प्रारंभ
·
कष्टकरी तसंच दिव्यांगांच्या हक्कासाठी प्रहार जनशक्ती
पक्षाचा ९ ऑगस्टला राज्यव्यापी मोर्चा
·
पश्चिम महाराष्ट्रात येत्या ७ ऑगस्ट पासून मराठा आरक्षण
जनजागृती शांतता रॅली
आणि
·
स्वीडीश खुल्या टेनिस स्पर्धेत भारताच्या सुमित नागलचं
आव्हान संपुष्टात
****
वैद्यकीय
पदवी अभ्यासक्रमासाठीची नीट यूजी परीक्षा पुन्हा घ्यायची झाली तर त्याकरता ठोस कारणं
हवीत, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. नीट यूजी परीक्षेत गैरप्रकार प्रकरणी दाखल
४० याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी सुरू झाली. या घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या
केंद्रीय अन्वेषण विभागाने आतापर्यंतच्या चौकशीचा अहवाल आज बंद लिफाफ्यातून न्यायालयासमोर
सादर केला. तो आताच जाहीर केला तर पुढच्या तपासावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता
असल्याचं सीबीआयने म्हटलं आहे. अशा परीक्षेतल्या गैरप्रकारांचे गंभीर सामाजिक दुष्परिणाम
होतात अशा शब्दात न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे.
दरम्यान, नीट यूजी
पेपर फुटीप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबाआयनं बिहारची राजधानी पाटणा इथल्या
एम्स महाविद्यालयातल्या चार विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं, त्यांची
चौकशी सुरु असल्याची माहिती सीबीआयनं दिली आहे.
****
गडचिरोली
जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यात पोलिसांनी काल केलेल्या कारवाईत नक्षली चळवळीतल्या
दोन दलमचा बिमोड झाल्याचं समोर आलं आहे. गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी आज
पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या चकमकीत १२ नक्षलवादी ठार झाले, त्या सर्वांवर
मिळून ३० लाख रुपयांचं बक्षीस होतं. दरम्यान, या चकमकीत
जखमी झालेल्या पोलिसांवर नागपूर इथल्या रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांच्या प्रकृतीचा
धोका टळला असल्याचं नीलोत्पल यांनी सांगितलं.
दरम्यान, छत्तीसगडमध्ये
विजापूर आणि सुकमा जिल्ह्याच्या सीमेजवळ काल रात्री नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात
विशेष कार्यदलाचे दोन पोलिस हुतात्मा झाले तर चार पोलिस जखमी झाले.
****
वादग्रस्त
प्रशिक्षणार्थी प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला पुणे न्यायालयाने
तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. शेतकऱ्यांना पिस्तुल दाखवत धमकावल्याप्रकरणी पुणे
पोलिसांनी मनोरमा खेडकरला आज सकाळी रायगड जिल्ह्यात महाड इथून अटक केली. त्यानंतर तिला
न्यायालयात हजर करत, पोलिसांनी तिला सात दिवसांची कोठडी
देण्याची मागणी केली, न्यायालयाने तुर्तास तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली
आहे.
****
राज्यात
एक हजार महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार
आहे. आत्तापर्यंत १ हजार ९५८ महाविद्यालयांनी यासंबंधी अर्ज दाखल केले असून येणाऱ्या
काळात अधिक महाविद्यालयांना या उपक्रमात सामावून घेतलं जाणार आहे. महाविद्यालयात ऑगस्टपासून
प्रशिक्षण कार्यक्रम सुरु होणार असून या अंतर्गत प्रतिवर्षी १५० युवक-युवतींना कौशल्य
विकासाचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहेत. या योजनेसाठी १५ ते ४५ वयोगटातील सर्व
युवक-युवती पात्र असणार आहेत.
****
विधानसभेच्या
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या पदाधिकारी तसंच नेत्यांची आज मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीस शिवसेनेचे प्रमुख नेते, उपनेते, उपस्थित
होते.
****
कोल्हापूर
जिल्ह्यात विशाळगड इथं झालेल्या प्रकाराचा मुख्य सूत्रधार शोधावा अशी मागणी विधानसभेतले
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. हल्लेखोरांना पाठीशी न घालता या प्रकरणाची
सरकारने उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी वडेट्टीवार यांनी केली. अतिक्रमणाचा प्रश्न
सरकारने सुसंवादातून सोडवला असता तर ही घटना घडली नसती असंही त्यांनी नमूद केलं.
****
कष्टकरी, शेतकरी, निराधार, दिव्यांग
यांच्या हक्कासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने येत्या ९ ऑगस्ट रोजी राज्यव्यापी
मोर्चाचा इशारा देण्यात आला आहे. प्रहार जन शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा आमदार
बच्चू कडू यांनी आज छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. छत्रपती
संभाजीनगर इथं क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालय असा हा मोर्चा निघणार आहे. आपल्या
मागण्या सरकारने मान्य केल्या, तर येत्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांच्या बाजूने
प्रचार करू, अन्यथा विरोधात प्रचार करण्याची भूमिका बच्चू कडू यांनी स्पष्ट केली.
****
मराठा
आरक्षण आंदोलनासंदर्भात येत्या ७ ऑगस्ट पासून पश्चिम महाराष्ट्रात मराठा आरक्षण जनजागृती
शांतता रॅली काढण्यात येणार आहे, या आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज जालना जिल्ह्यातल्या
आंतरवाली इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. या जनजागृती रॅलीची सुरुवात सोलापूर
जिल्ह्यातून होत असून १३ ऑगस्टला नाशिक इथं समारोप होणार आहे, रॅलीच्या
नियोजनाबाबत पश्चिम महाराष्ट्रातल्या समन्वयकांशी आज आंतरवाली इथं चर्चा झाल्याची माहिती
जरांगे यांनी दिली. दरम्यान, येत्या २० जुलैपासून पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा जरांगे
यांनी दिला आहे. यापूर्वीच्या उपोषणावेळी सरकारच्या शिष्टमंडळानं दिलेलं कुठलेही आश्वासन
पाळलं नाही. त्यामुळे पुन्हा उपोषणाचा निर्णय घेतल्याचं, त्यांनी
सांगितलं.
****
औरंगाबादचं छत्रपती
संभाजीनगर नामांतर करण्याच्या निर्णयाविरोधात सामाजिक कार्यकर्ते हाशीम उस्मानी यांनी
सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. उस्मानी यांनी यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयातही
याचिका दाखल केली होती, मात्र उच्च न्यायालयाने ती फेटाळून लावली होती.
****
लोककवी, सामाजिक
कार्यकर्ते तुकाराम भाऊराव साठे ऊर्फ अण्णा भाऊ साठे यांना आज त्यांच्या पुण्यतिथी
निमित्त विविध सामाजिक, शैक्षणिक संस्थेच्या वतीने अभिवादन करण्यात येत आहे. छत्रपती
संभाजीनगर इथं अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आज सकाळपासून विविध
संघटना तसंच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
****
मुख्यमंत्री
माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत, धाराशिव जिल्ह्यातली कोणतीही पात्र महिला, या योजनेच्या
लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेऊन नियोजन करण्याचे निर्देश जिल्ह्याचे
पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिले आहेत. आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात यासंबंधी
आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. कालपर्यंत जिल्ह्यातून एक लाख ३० हजार ७७३ महिलांचे
अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी ८९ हजार ३१९ महिलांचे अर्ज पात्र झाल्याची माहिती यावेळी
देण्यात आली.
****
लातूर
जिल्ह्यातल्या प्रत्येक पात्र महिलेला मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यासाठी, जिल्हा
प्रशासन विविध उपक्रम राबवत आहे. जिल्ह्यातल्या उदगीर नगरपालिकेत या योजनेसाठी
घरोघरी जावून महिलांचे अर्ज भरून घेण्याचा उपक्रम राबवला जात आहे. यासाठी १८ कर्मचाऱ्यांची
नियुक्ती करण्यात आली आहे.
****
स्वीडीश
खुल्या टेनिस स्पर्धेत भारताच्या सुमित नागलचं आव्हान आज संपुष्टात आलं. आज झालेल्या
उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात अर्जेंटिनाच्या मरियानो नवोने सुमितवर ६-४, ६-२ अशी
मात केली. दरम्यान, नागलचा या स्पर्धेत पराभव झाला असला तरी त्यानं, एटीपी
क्रमवारीत पुरुष एकेरी प्रकारात ६८ व्या स्थानावर झेप घेत आपल्या
कारर्कीदीतला नवीन उच्चांक गाठला आहे.
****
महिलांच्या
आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेला उद्यापासून श्रीलंकेतील दाम्बुला इथं सुरुवात होणार
आहे. या स्पर्धेतले सर्व सामने रनगिरी दाम्बुला आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात खेळवले
जातील. ए गटात संयुक्त अरब अमिरात आणि नेपाळ यांच्यात होणाऱ्या सामन्यानं
या स्पर्धेला सुरुवात होईल. ए गटात भारत, नेपाळ, पाकिस्तान, संयुक्त
अरब अमिरात यांचा समावेश असून बी गटात श्रीलंका, बांग्लादेश, थायलंड, आणि मलेशिया
यांचा समावेश आहे. या स्पर्धेतला उपांत्य सामना २६ जुलैला तर अंतिम सामना २८ जुलैला
होणार आहे.
****
जालना
जिल्ह्यात दुचाकी आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीपचा अपघात होऊन जीप रस्त्यालगतच्या
विहिरीत पडल्याची दुर्घटना आज दुपारनंतर घडली, बदनापूर
तालुक्यातल्या चनेगाव इथले काही भाविक पंढरपूर वारीकरून जालना इथं परतत असतांना ही
दुघर्टना घडली, जीपमधल्या पाच भाविकांचे मृतदेह आतापर्यंत हाती आल्याचं, आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे.
****
काश्मीरमध्ये
झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ, आज नांदेड
शहरातल्या महात्मा फुले चौकात, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं तीव्र निदर्शने
करण्यात आली. जिल्हाप्रमुख माधव पावडे यांच्या नेतृत्वात अनेक कार्यकर्ते यात सहभागी
झाले.
****
परभणी
जिल्ह्यात जिंतूर तालुक्यातल्या जोगवाडा सोस परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाल्यामुळे पिकांचं
मोठं नुकसान झालं आहे. महसूल विभागाने नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत करण्याची
मागणी शेतकरी करत आहेत.
****
नशा मुक्ती
भारत अभियान अंतर्गत आज धाराशिव जिल्ह्यात पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालयात सर्व विद्यार्थ्यांना
नशा मुक्तीची प्रतिज्ञा देण्यात आली. तनिष्का मगर या विद्यार्थिनींने प्रतिज्ञेचं वाचन
केलं. विद्यालयाचे प्राचार्य के. वाय. इंगळे, यांच्यासह
सर्व शिक्षक आणि कर्मचारी वर्ग यावेळी उपस्थित होता.
****
संपूर्ण
देशभरात जातनिहाय जनगणना करावी, तसंच आरक्षणाची ५० टक्के कमाल मर्यादा हटवावी, या मागणीसाठी
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आज छत्रपती संभाजीनगर इथं पक्षाचे शहर सचिव अभय
टाकसाळ यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. या मागण्यांचं
निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं
****
बीड जिल्ह्यात
जात प्रमाणपत्र पडताळणीतील त्रुटींची पूर्तता करण्यासाठी विशेष अभियान राबवलं जाणार
आहे. २२ जुलै ते ३१ जुलै या कालावधीत हे अभियान आयोजित करण्यात आलं आहे. जिल्हा जात
प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त एस आर मकरंद यांनी ही माहीती दिली आहे.
****
No comments:
Post a Comment