Tuesday, 23 July 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 23.07.2024 रोजीचे दुपारी 01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

 egional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 23 July 2024

Time: 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २३ जूलै २०२ दुपारी १.०० वा.

****

आयकर दात्यांना दिलासा, उद्योग क्षेत्राला चालना, धार्मिक पर्यटनाचा विकास, आणि नैसर्गिक शेतीला चालना देणारा चालू आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत सादर केला. उत्पादकता, रोजगार, सामाजिक न्याय, शहरी विकास, ऊर्जा सुरक्षा, पायाभूत सुविधा आदी नऊ प्राधान्यक्रमांवर हा अर्थसंकल्प आधारलेला आहे.

या अर्थसंकल्पात आयकर रचनेत बदल प्रस्तावित असून, वार्षिक तीन लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न पूर्णपणे करमुक्त करण्यात आलं असून, स्टॅंडर्ड डीडक्शनची मर्यादा वाढवण्यात आली असून, पगारदारांसाठी ही मर्यादा ७५ हजार रुपये तर कुटुंब निवृत्तीवेतन धारकांसाठी २५ हजार रुपये प्रस्तावित करण्यात आली आहे. सुमारे चार कोटी पगारदारांना याचा लाभ होणार आहे.

वार्षिक सात लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नावर पाच टक्के, सात लाख ते १० लाख रुपयांपर्यंत १० टक्के, १० लाख ते १२ लाख रुपयांपर्यंत १५ टक्के, १२ लाख ते १५ लाख रुपयांपर्यंत २० टक्के तर १५ लाख रुपयांपेक्षा अधिक वार्षिक उत्पन्नावर ३० टक्के आयकर आकारला जाणार आहे. नव्या कर विवरण पद्धतीने करमूल्यांकनासाठी या तरतुदी लागू असणार आहेत.

****


विदेशी कंपन्यांसाठी कार्पोरेट कर ३५ टक्के, ई कॉमर्स कंपन्यांसाठी स्रोतावर कर कपात - टीडीएसचा दर एक टक्क्यावरून शून्य पूर्णांक एक टक्का करण्याची तसंच स्टार्टअप्सनास प्रोत्साहन देण्यासाठी एंजल कर रद्द करण्याची तरतूद या अर्थसंकल्पातून करण्यात आली आहे.

****

या अर्थसंकल्पात, कर्करोगावरची औषधं तसंच वैद्यकीय उपकरणांवरचं सीमा शुल्क माफ करण्यात आलं असून, मोबाईल फोन, इलेक्ट्रीक वाहनं, अणु उर्जेसाठी लागणारी उपकरणं, प्लॅटिनम, सोने, चांदी, तांबे तसंच इतर २५ धातूंवरच्या सीमा शुल्कात कपात प्रस्तावित करण्यात आली आहे. तर प्लास्टिक तसंच टेलिफोन उपकरणांवरच्या सीमाशुल्कात वाढ करण्यात प्रस्तावित आली आहे.

****

पीएम आवास योजनेअंतर्गत तीन कोटी अतिरिक्त घरं बांधली जाणार असून, महिला आणि बालिका विकासासाठी तीन लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

रोजगार आणि कौशल्य प्रशिक्षणासाठी पंतप्रधान पाच योजनांच्या पॅकेजची घोषणा करण्यात आली. प्रथमच नोकरी शोधणाऱ्यांना कामावर घेण्यास मदत करण्यासाठी नियोक्त्यांना एक महिन्याचा पगार अनुदान म्हणून दिला जाईल. या योजनेसाठी पात्रता मर्यादा १ लाख रुपये मासिक वेतन असेल. या योजनेचा कालावधी दोन वर्षांचा असेल.

या योजनांमुळे पाच वर्षांत चार कोटी १० लाख युवकांना रोजगार मिळणार असल्याचं सीरातामन यांनी सांगितलं. युवकांसाठी इंटर्नशीप आंतरवासिता योजना सीतारामन यांनी जाहीर केली, यामध्ये पुढच्या पाच वर्षात पाचशे कंपन्यामध्ये युवकांना १२ महिने इंटर्नशीपचा अनुभव मिळणार आहे, यासाठी दरमहा पाच हजार रुपये विद्यावेतन आणि कार्यकाळ पूर्ण झाल्यावर सहा हजार रुपये अर्थसहाय्य केलं जाणार आहे. मुद्रा योजनेत कर्ज मर्यादा २० लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

एक कोटी शेतकऱ्यांनां नैसर्गिक शेतीसाठी प्रोत्साहन दिलं जाणार असून, अधिक उत्पादन देणारी ३२ विविध वाणं तसंच बागायती पिकांसाठी शंभरावर नवी वाणं उपलब्ध करून दिली जाणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं.

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एक लाख ५२ हजार कोटी रुपये, ग्रामीण विकास दोन पूर्णांक ५५ लाख कोटी रुपये, तर शिक्षण, रोजगार आणि कौशल्य विकासासाठी एक लाख ४८ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

 

धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी बिहार राज्यात गया इथं विष्णूपद मंदिर, तसंच महाबोधी मंदिराचा काशी विश्वनाथ कॉरीडॉरच्या धर्तीवर तर ओडिशातल्या मंदिरांचा तसंच पर्यटन स्थळांचा जागतिक पातळीवर विकास करण्यात येणार आहे. नालंदा हे पर्यटन केंद्र म्हणून विकसित करणार असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं.

बिहार राज्यात रस्ते बांधणीसाठी २६ हजार कोटी तर आंध्रप्रदेशात राजधानी अमरावतीसह विविध प्रकल्पासाठी १५ हजार कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे.

 

प्रधानमंत्री जनजाती उन्नत अभियानाची घोषणा या अर्थसंकल्पातून करण्यात आली, या माध्यमातून ६३ हजार गावांतल्या पाच कोटी आदिवासी बांधवांना लाभ होणार आहे.

****

आकाशवाणी आज आपला सत्त्यावणावा वर्धापन दिन साजरा करत आहे.  १९२७ साली आजच्या दिवशी आकाशवाणीचं पहिलं केंद्र मुंबई इथं सुरू झालं. इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी नावानं सुरू झालेलं हे केंद्र १९५७ नंतर आकाशवाणी या नावानं प्रसिद्ध झालं.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 09.07.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 09 July 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रप...