Tuesday, 23 July 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 23.07.2024 रोजीचे सकाळी 11.00 वाजताचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

संक्षिप्त बातमीपत्र

२३ जूलै २०२४ सकाळी ११.०० वाजता

****

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज चालू आर्थिक वर्षांचा अर्थसंकल्प लोकसभेत सादर करत आहेत. तत्पूर्वी त्यांनी आज सकाळी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. त्यानंतर झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अर्थसंकल्पाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.

****

देशातला बेरोजगारीचा दर कमी होत असल्याचं, केंद्रीय कामगार आणि रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी काल लोकसभेत सांगितलं. २०२०-२१ मध्ये बेरोजगारीचा दर चार पूर्णांक दोन टक्के होता, तर २०२१-२२ मध्ये हा दर चार पूर्णांक एक टक्के आणि २०२२-२३ मध्ये तीन पूर्णांक एक टक्के इतका असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्ण पदक पटकावणारे पहिले भारतीय क्रीडापटू अभिनव बिंद्रा यांना ऑलिम्पिक ऑर्डर हा बहुमान देऊन सन्मानित करण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या कार्यकारी मंडळानं घेतला आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये येत्या १० ऑगस्ट रोजी बिंद्रा यांना हा बहुमान प्रदान करण्यात येणार आहे. बिंद्रा यांनी २००८च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक पटकावलं होतं.

****

भारतीय नौदलाच्या आयएनएस ब्रह्मपुत्रा या युद्धनौकेवर रविवारी लागलेल्या आगीनंतर बोटीवरचा एक कनिष्ठ कर्मचारी बेपत्ता आहे. मुंबईतल्या नौदलाच्या गोदीमध्ये या बोटीच्या रिफिटिंगचं काम सुरू असताना ही आग लागली होती. बोटीवरील कर्मचाऱ्यांनी गोदीतील अग्निशमन यंत्रणेच्या मदतीनं ही काल सकाळपर्यंत ही आग तातडीनं नियंत्रणातही आणली. भारतीय नौदलानं या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

****

दुधाला प्रतिलिटर ४० रुपये भाव मिळावा यासाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं राज्यभर आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यामध्ये कोतुळ या ठिकाणी शेतकरी गेले १७ दिवस धरणे आंदोलनास बसले आहेत. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज अकोले आणि संगमनेर तालुक्यातले दूध उत्पादक शेतकरी आज कोतुळ ते संगमनेर अशी ट्रॅक्टर आणि ट्रॉली रॅली काढणार आहेत.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 04.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...