Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date - 25 April 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ एप्रिल २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
चांगल्या पावसाच्या अंदाजामुळे वर्ष
२०१७-१८ मध्ये २७ कोटी ३० लाख टन अन्नधान्य उत्पादन होणार असल्याचा अंदाज असल्याचं
सरकारनं म्हटलं आहे. २०१६-१७ या वर्षात २७ कोटी १९ लाख टनापेक्षा अधिक अन्नधान्याच्या
उत्पादनाचं लक्ष्य ठेवण्यात आल्याचं केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग यांनी सांगितलं.
ते आज नवी दिल्ली इथं खरीप हंगामाच्या शेतीवर आयोजित राष्ट्रीय संमेलनात बोलत होते.
जुन मध्ये संपणाऱ्या २०१६-१७ या पीक वर्षात गव्हाचं नऊ कोटी ८० लाख टन विक्रमी उत्पादन
होण्याचा अंदाज असल्याचं ते म्हणाले.
****
या महिन्याच्या अखेरपर्यंत सर्व
राज्य आपापल्या विधानसभेत वस्तु आणि सेवा कर - जीएसटी कायदा पारित करतील, अशी आशा महसूल
सचिव हसमुख अढिया यांनी
व्यक्त केली आहे. ते आज नवी दिल्ली इथं जीएसटी संबंधित एका संमेलनात बोलत होते. जीएसटी
मुळे संपूर्ण देशाला फायदा होणार असल्याचं ते म्हणाले.
दरम्यान, महाराष्ट्र वस्तू आणि सेवा
कर विधेयकासह संबंधित इतर विधेयकांना मंजुरी देण्यासाठी महाराष्ट्र विधानमंडळाचं विशेष
अधिवेशन येत्या १७ मे रोजी घेण्यात येणार आहे.
****
बनावट पासपोर्ट प्रकरणी कुख्यात
गुंड छोटा राजनसह तीन जणांना सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयानं कालच छोटा राजनसह तीन जणांना दोषी ठरवलं होतं.
सप्टेंबर २००३ मध्ये मोहन कुमार नावावर बनलेल्या बनावट पासपोर्ट आणि टूरिस्ट व्हिसावर
छोटा राजननं भारतातून ऑस्ट्रेलियात पळ काढला होता.
****
राज्यातल्या तूर खरेदी केंद्रांवर २२ एप्रिलपर्यंत
शेतकऱ्यांनी आणलेली सर्व तूर राज्य शासन खरेदी
करणार असून, यासाठी एक हजार कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात
येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी सांगितलं. मंत्रालयात आज आयोजित करण्यात आलेल्या तूर संदर्भातल्या आढावा
बैठकीत ते बोलत होते. शेतकऱ्यांच्या नावावर तूर विक्रीसाठी आणणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात
येईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
****
शेतकऱ्यांनी कमी भावानं तूर न विकता शेतमाल तारण कर्ज योजनेचा लाभ घ्यावा, असं आवाहन सहकार आणि पणन
मंत्री सुभाष देशमुख यांनी केलं आहे. ते आज सोलापूर इथं बोलत होते. शेतकऱ्यांना त्यांची
तूर कमी भावाने बाजारात न विकता बाजार समितीच्या गोदामात ठेऊन सहा टक्के दराने तारण
कर्ज घेता येईल, असं ते म्हणाले. हा माल गोदामात ठेवण्यासाठी शेतकऱ्यांकडून कोणतंही
भाडं आकारलं जात नाही, असं त्यांनी सांगितलं.
****
राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्ज माफी मिळाली पाहिजे या प्रमुख
मागणीसाठी विरोधी पक्षांनी काढलेल्या संघर्ष यात्रेच्या तीसऱ्या टप्प्याला आजपासून
कोल्हापूर इथं सुरुवात झाली. शेतकऱ्यांची सर्व तूर डाळ शासनानं खरेदी केली पाहिजे,
आणि तूर खरेदीत सुरु असणाऱ्या व्यापारी आणि नाफेड अधिकाऱ्यांच्या गैरव्यवहाराची चौकशी
केली पाहिजे, अशी मागणी माजी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी
यावेळी केली. आज ही यात्रा सांगलीकडे जाणार आहे.
****
सरकारी रुग्णालयातल्या निवासी डॉक्टरांचे प्रश्न समजून
घेण्यासाठी एक उच्चाधिकार समिती नेमण्यावर राज्य सरकारनं विचार करावा, असं मुंबई उच्च
न्यायालयानं म्हटलं आहे. गेल्या महिन्यात डॉक्टरांनी पुकारलेल्या संपाविरुद्ध दाखल
झालेल्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं, ही अपेक्षा व्यक्त केली. निवासी
डॉक्टरांना संपावर जाण्याची वेळ येऊ नये, यासाठी अशी समिती नेमली जाणं आवश्यक असल्याचं
न्यायालयानं म्हटलं आहे.
****
राज्यातल्या शाळा डिजिटल करण्यासाठी रोटरी साऊथ एशियन
सोसायटीनं पुढाकार घेतल्याचं पत्रक शिक्षण विभागाचे अपर सचिव बी. आर. माळी यांनी जारी
केलं आहे. राज्यातल्या शाळांचा दर्जा आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी शासन स्तरावरुरून जलद
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र' हा उपक्रम सुरू केला असून, यात डिजिटल शाळांविषयी उल्लेख
करण्यात आला आहे. रोटरी साऊथ एशियन सोसायटीच्या सहकार्यानं १८ हजार ५१० शाळांमध्ये
ई-लर्निंग सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असून, त्याबाबत शासनाबरोबर सामंजस्य करार
करण्यात आला आहे.
****
औरंगाबादच्या जिल्हाधिकारीपदी नवल किशोर राम हे आज रुजू
झाले. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांचं स्वागत करण्यात आलं. याआधी ते बीडचे जिल्हाधिकारी
म्हणून कार्यरत होते.
****
नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेतून पैसे मिळत नसलंयाने संतप्त
विविध विकास कार्यकारी सोसायटी संचालकांनी आज बँकेच्या मुख्य कार्यालयाच्या प्रवेशद्वाराला
टाळे ठोकले. ही बँक आर्थिक अडचणीत असून शेतकऱ्यांना पीक कर्ज दिले जात नाही, तसंच शासकीय
आणि अनुदानित शाळांच्या शिक्षक तसंच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं वेतन आणि अन्य देयके अडकून
पडली आहेत, त्यामुळे विविध विकास कार्यकारी सोसायट्यांच्या शाखांना रक्कम दिली जात
नसल्याचं सोसायटी संचालकांकडून सांगण्यात आलं
आहे.
****
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा २०१५-१६
या वर्षाचा ५७वा पदवी प्रदान सोहळा येत्या ३० मे रोजी होणार आहे. समारंभाचे पाहुणे
म्हणून माजी परराष्ट्र सचिव निरूपमा राव असणार आहे. या समारंभात एप्रिल २०१६ आणि ऑक्टोबर
२०१६ मध्ये उत्तीर्ण पदवीधारकांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे.
****
No comments:
Post a Comment