Saturday, 22 April 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 22.04.2017 - 05.25pm


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 22 April 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २२ एप्रिल २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

भारत-अमेरिकेदरम्यानचे संबंध गेल्या काही दशकांमध्ये खूप सुधारले असून हे संबंध अधिक बळकट आणि परीपक्व होत असल्याचं अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे. जेटली हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून ते आज वॉशिंग्टनमध्ये बोलत होते. भारत सरकार ट्रम्प प्रशासनासोबत काम करण्याबाबत खूप आशादायी असून द्विपक्षीय संबंधांमधील अनेक पैलू अधिक बळकट करू पाहत असल्याचं जेटली यावेळी म्हणाले.

****

केंद्र सरकारच्या आरोग्यविषयक अर्थसंकल्पात सर्व राज्यांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे, मात्र कित्येक राज्यांकडून आरोग्यविषयी निधीचा वापरच केला जात नसल्याचं, केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी म्हटलं आहे. नवी मुंबईतल्या नेरुळ इथं डी. वाय. पाटील विद्यापीठात मेडीव्हिजन २०१७’ या राष्ट्रीय परिषदेत ते आज बोलत होते. १९ वर्षांवरील वयोगटातल्या कर्करोग पीडितांना मोफत सुविधा देण्यासाठी जागतिक स्क्रिनिंग योजना राबवण्यात येणार असून, त्यासाठी देशभरातले शंभर जिल्हे निवडण्यात येणार असल्याचं ते म्हणाले.

****

निवडणूक आयोगाला कथित लाच देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी ए आय ए डी एम केच्या शशीकला गटाचे दिनकरन हे दिल्ली पोलिसांच्या आंतरराज्य गुन्हे शाखेसमोर चौकशीसाठी हजर झाले आहेत. ‘झाडाची दोन पानं’ हे निवडणूक चिन्ह मिळवण्यासाठी त्यांनी आयोगाला लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

****

अनावधानानं झालेला धर्माचा अपमान हा गुन्हा होऊ शकत नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. भारतीय दंड विधानाच्या २९५अ कलमाच्या करण्यात येणाऱ्या गैरवापराविषयी न्यालयाकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. या कलमाअंतर्गत धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप सिद्ध झाल्यास तीन वर्षांची शिक्षा सुनावली जाते. अनावधानानं, वाईट हेतू मनी न बाळगता किंवा निष्काळजीपणानं धार्मिक भावना दुखावल्या जाणं याचा या कलमात समावेश होत नसल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे.

****

औरंगाबाद तालुक्यातल्या शेंद्राबन आणि गंगापूर जहागिर इथल्या पाणी पुरवठा योजना पूर्ण करण्यात आल्यानं दोन्ही गावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला असल्याचं, विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी म्हटलं आहे. ते आज शेंद्राबन आणि गंगापूर जहागिर इथं उभारण्यात आलेल्या नळ पाणी पुरवठा योजनेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. गावकऱ्यांनी पाणी जपून आणि काटकसरीनं वापरण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

खरीप हंगामपूर्व नियोजन आणि जलयुक्त शिवार अभियानासंदर्भात आढावा बैठकही आज बागडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

****

उस्मानाबाद इथं सुरु असलेल्या सत्याण्णवाव्या अखिल भारतीय नाट्य संमेलनात आज दुसऱ्या दिवशी अनेक एकांकिका सादर झाल्या. त्याचबरोबर संमेलनाध्यक्ष जयंत सावरकर यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. स्थानिक लोककला, नृत्य प्रकार, एकपात्री प्रयोग अशा विविध कार्यक्रमांना रसिकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. उद्या या संमेलनाचा समारोप होणार आहे.

****

चतुरंग प्रतिष्ठानचा ‘संगीत सन्मान पुरस्कार’ यंदा मराठवाड्याचे ज्येष्ठ गायक पंडित नाथ नेरळकर यांना जाहीर झाला आहे. मानपत्र आणि ७५ हजार रुपये रोख असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. नेरळकर गेल्या सहा दशकांहून अधिक काळ संगीत साधना करत आहेत, त्याचबरोबर संपूर्ण भारतभर कार्यक्रमांद्वारे त्यांनी अभिजात संगीताचा प्रसार केला आहे. डोंबिवली इथं येत्या १३ मे रोजी होणाऱ्या कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

****

परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा इथं १४ एप्रिलला आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या दगडफेक प्रकरणातल्या दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगामार्फत करण्यात येणार आहे. आयोगाचे अध्यक्ष विजयकुमार कांबळे यांनी आज परभणी इथं ही माहिती दिली. या दगडफेकीत जखमी झालेल्यांना कांबळे यांनी जिल्हा रुग्णालयात भेट दिली, त्यानंतर ते बोलत होते. 

****

औरंगाबाद इथं पहिल्या संत शिरोमणी सावता माळी शेतकरी आठवडी बाजाराचं उद्घाटन उद्या विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांच्या हस्ते होणार आहे. शहरातल्या दर्गा रोड परिसरात कृषी विभागाची कृषी अभियांत्रिकी कार्यशाळा मैदानावर हा आठवडी बाजार भरणार आहे. या आठवडी बाजारात शेतकऱ्यांचे २० गट दर्जेदार भाजीपाला, फळे पुरवणार आहेत. सरकारनं गेल्या वर्षी श्री संत सावता माळी शेतकरी आठवडी बाजार सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.

****

No comments: