Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 30 April 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० एप्रिल २०१७ सकाळी
६.५० मि.
****
·
तिहेरी - तलाकच्या मुद्यावरून राजकारण न करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन
· सरकारी शाळांची परिस्थिती सुधारण्यावर केंद्र सरकारचा
भर -केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर
· मराठवाड्यात लातूर, उस्मानाबाद
आणि बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी गारांसह पाऊस
आणि
·
मुंबई-लातूर एक्सप्रेस
रेल्वे बीदर पर्यंत वाढवण्याच्या निर्णया विरोधात लातूर इथं धरणं आंदोलन
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुस्लिम
समुदायाला तिहेरी - तलाकच्या मुद्यावरून राजकारण न करण्याचं आवाहन केलं आहे. ते काल
नवी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होते. मुस्लिम समाजात महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात
समाजातल्या जाणकारांनी पुढाकार घेऊन तोडगा काढावा, असं ते म्हणाले. मुस्लिम समाज
हा विषय चर्चेद्वारे सोडवेल, याबाबत आशावादी असल्याचं पंतप्रधान म्हणाले.
दरम्यान, १२ व्या शतकातले समाज सुधारक महात्मा बसवेश्वर आणि २३ भाषांमधल्या इतर संतांच्या अनुवादित केलेल्या ‘वचन’ या ग्रंथाचं प्रकाशन काल पंतप्रधानांच्या
हस्ते करण्यात आलं. सुमारे दोनशे भाषातज्ज्ञांनी
अनुवादित केलेल्या या ग्रंथाचं संपादन दिवंगत विचारवंत डॉक्टर एम. एम. कलबुर्गी यांनी
केलं आहे.
****
शेतकऱ्यांवर प्राप्तीकर लावण्यासंदर्भात केलेली सूचना म्हणजेच शेतकरी संपवण्याचं
कारस्थान आहे, अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण
विखे पाटील यांनी केली आहे. निती आयोगाच्या बैठकीत
हा प्रस्ताव आला होता, यासंदर्भात विखे पाटील यांनी काल पत्रक काढून टीका केली.
दरम्यान, कृषी उत्पन्नावर कोणताही कर लावण्याचा प्रस्ताव
नाही, असं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल कोल्हापूर इथं बोलतांना स्पष्ट केलं.
नीति आयोगाच्या बैठकीत आलेला हा प्रस्ताव फेटाळण्यात आल्याचं, पाटील यांनी सांगितलं.
****
सरकारी शाळांची परिस्थिती सुधारण्यावर केंद्र सरकारचा भर असल्याचं केंद्रीय मनुष्यबळ
विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे. शिक्षण क्षेत्रातले
नाविन्यपूर्ण उपक्रम आणि प्रयोगशील गुणवत्ता वाढीसंदर्भात, मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि विद्या प्राधिकरणाच्या वतीनं काल पुण्यात आयोजित, पश्चिम विभागीय
कार्यशाळेचं उद्घाटन केल्यानंतर जावडेकर बोलत होते. इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांचं
पुनर्मूल्यांकन करण्याचा अधिकार मिळावा यासाठीचं विधेयक लवकरच संसदेत मांडणार
असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
****
आश्रमशाळांतल्या विद्यार्थ्यांना
दैनंदिन गरजांसाठी लागणारी रक्कम त्यांच्या खात्यात परस्पर जमा करण्याचा निर्णय राज्य
सरकारनं घेतला आहे. शालेय साहित्य
खरेदीत होणाऱ्या भ्रष्टाचाराला आळा घालणं हा या मागचा मुख्य उद्देश आहे. या योजनेनुसार
पहिली ते चौथी पर्यंतचे विद्यार्थी वार्षिक साडेसात हजार रूपये, पाचवी ते नववीपर्यंतचे विद्यार्थी वार्षिक साडे आठ हजार रूपये तर, दहावी ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी वार्षिक साडेनऊ हजार रूपये मिळण्यास पात्र असतील. येत्या शैक्षणिक वर्षापासून,
राज्य सरकार द्वारे संचालित १३३ आश्रम शाळांतून हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.
****
राज्यातील रिक्षा-टॅक्सींचे प्रवास भाडे तसंच प्रवास भाड्याचे
टप्पे ठरवण्यासंदर्भात ऑनलाईन सर्वेक्षण घेण्यात येत आहे. सर्वसामान्य नागरिकांसह टॅक्सी
तसंच रिक्षाचालक आणि रिक्षा-टॅक्सी संघटनांनी येत्या १५ मेपर्यंत आपली मतं नोंदवावीत,
असं आवाहन यासंदर्भात शासनानं नेमलेल्या समितीचे अध्यक्ष, बी. सी. खटुआ यांनी केलं
आहे. काल मुंबईत ते वार्ताहरांशी बोलत होते.
****
बांधकाम क्षेत्रात पारदर्शकता आणि कार्यक्षमता आणण्यासाठी,
उद्या पासून महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण –म हा रे रा ची स्थापना करण्यात
येणार आहे. महारेरा हे महाराष्ट्रातल्या बांधकाम क्षेत्राचं नियमन करणार असून, सदनिका
विक्रीपूर्वी प्रत्येक विकासकाला त्याचे प्रस्तावित आणि चालू असलेले दोन्ही प्रकल्प
महारेरा मध्ये नोंदणीकृत करणं आवश्यक आहे. या प्रकल्पांचे सर्व तपशील महारेराच्या संकेतस्थळावर
उपलब्ध असणार आहेत.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी ११
वाजता आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या कार्यक्रमातून श्रोत्यांशी संवाद साधणार आहे. हा
कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून प्रक्षेपित करण्यात येणार
आहे. या कार्यक्रम शृंखलेचा हा ३१ वा भाग आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरुन प्रसारित
केलं जात आहे, आमचं हे बातमीपत्र न्यूज
ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
राज्याच्या काही भागात काल अवकाळी पावसानं हजेरी लावली.
मराठवाड्यात लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यात काल अनेक ठिकाणी गारांसह पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे. लातूर जिल्ह्यातल्या लातूर, औसा, रेणापूर, चाकूर, आणि जळकोट परीसरात, उस्मानाबाद
जिल्ह्यालाही काल अवकाळी पावसाचा फटका बसला. उस्मानाबाद आणि कळंब तालुक्यात तसंच बीड
जिल्ह्याच्या काही भागात हा पाऊस पडला. राज्यात सांगली, सातारा आणि वाशिम परिसरातल्या अनेक गावांत गारांसह पाऊस झाल्याचं वृत्त आहे.
****
मुंबई-लातूर एक्सप्रेस रेल्वे बिदर
पर्यंत वाढवण्याच्या रेल्वे मंडळाच्या निर्णया विरोधात लातूर इथं काल रेल्वे बचाव समितीच्या
वतीनं गांधी चौकात धरणं आंदोलन करण्यात आलं. यावेळी संतप्त कार्यकर्त्यानी लातूरचे
खासदार डॉक्टर सुनील गायकवाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं. पोलिसांनी याप्रकरणी
पाच कार्यकर्त्यांना अटक केली. लातूर-मुंबई एक्सप्रेस लातूर स्थानकावर १२ तास थांबून
असते, त्या वेळेत ही गाडी उदगीर तसंच बीदर पर्यंतच्या प्रवाशांसाठी बीदरपर्यंत वाढवण्याचा
निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतला आहे. या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद
खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे.
दरम्यान, या रेल्वेचा बीदरपर्यंत विस्तार
करण्याबाबत आपण कोणतंही पत्र दिलेलं नाही, असं खासदार गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे.
यासंदर्भात काहीजण अपप्रचार करत असून, त्यावर विश्वास ठेवू नये, असं आवाहन करत, गायकवाड
यांनी लातूरची रेल्वे ही लातूर इथूनच मुंबईला जावी, यासाठी प्रयत्न करत असल्याचं काल
जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
****
जनसामान्यांच्या भाषेमुळे शेक्सपिअर आजही जिवंत असल्याचं
मत प्राध्यापक मुस्तजीब खान यांनी व्यक्त केलं आहे. औरंगाबाद इथं आयोजित शेक्सपिअर
महोत्सवात ‘शेक्सपिअरची नाटकं’ या विषयावर ते काल बोलत होते. अंबाजोगाई इथले डॉ केशव
देशपांडे यांचं यावेळी ‘राम गणेश गडकरींवर शेक्सपिअरचा प्रभाव’ या विषयावर व्याख्यान
झालं. गोविंदभाई श्रॉफ सभागृहात आयोजित या महोत्सवात ‘ओळखलंत का मला’ ही एकांकिका काल
सादर झाली. आज सायंकाळी ‘कसाब आणि मी’ हे नाटकाच्या सादरीकरणानं महोत्सवाचा समारोप
होणार आहे.
****
नांदेड शहरात प्रदुषणाचं प्रमाण कमी करण्यासाठी यापुढे दर महिन्याचा पहिला
गुरुवार हा "वाहन विरहीत दिन - नो व्हेईकल डे" म्हणून पाळण्याचं आवाहन
नांदेड-वाघाळा शहर महापालिकेनं केलं आहे. या दिवशी खासगी वाहन न वापरता सार्वजनिक
वाहन किंवा सायकलचा वापर करावा, असं महापालिकेनं म्हटलं आहे. या संकल्पामुळे शहरातली वाहतूक कोंडी कमी होऊन, इंधन बचतीला चालना मिळेल असं महापालिकेतर्फे जारी
पत्रकात म्हटलं आहे.
****
बीड नगरपरिषदेच्या ७५ सफाई कामगारांनी गेल्या दोन महिन्यांपासून
पगार न मिळाल्यानं आंदोलन सुरू केलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांना लेखी आश्वासन देवूनही पगार
न मिळाल्यानं या कामगारांनी हे आंदोलन सुरू केलं आहे.
****
औरंगाबाद महानगरपालिकेत स्थायी समिती सदस्यांची काल निवड
करण्यात आली, यामध्ये शिवसेनेचे ऋषिकेश खैरे, सिद्धांत शिरसाट, राजू वैद्य, स्वाती
नागरे, रूपचंद वाघमारे, शहर विकास आघाडीचे गजानन बारवाल, भारतीय जनता पक्षाच्या राखी देसरडा, एमआयएम पक्षाचे नसीर सलीम, सय्यद मतीन यांची
निवड करण्यात आली.
****
भारतीय तंत्रशिक्षण परिषद -ए आ य सी टी ई नं औरंगाबाद शहरातल्या जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालय-
जेएनईसीची मान्यता कायम ठेवली असल्याचं प्रभारी प्राचार्य डॉक्टर एच.बी.शिंदे यांनी
काल वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या
वेतन प्रकरणी निकाल देतांना समोपचारानं तोडगा काढण्यास सांगितलं होतं. त्यानुसार शिक्षक
आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन देण्याचं कबूल केल्यानंतर
एआयसीटीईने मान्यता पूर्ववत केली आहे.
//********//
No comments:
Post a Comment