Saturday, 22 April 2017

text - AIR News Bulletin, Aurangabad 22.04.2017 1.00pm


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 22 April 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २२ एप्रिल २०१ दुपारी .००वा.

*****

कायदा आयोगाने दिलेल्या अहवालाबाबत कायदेविषयक तज्ज्ञांशी सल्ला मसलत केल्याशिवाय निर्णय घेतला जाणार नसल्याचं कायदा मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं बोलत होते. या अहवालामध्ये वकिलांनी गैरवर्तन केल्यास त्यांच्याविरोधात कडक कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली आहे. मंत्रालयाला याबाबत वकिलांच्या संघटनांसोबत चर्चा करण्याची सूचना दिली असून चर्चा पूर्ण झाल्यानंतरच काय तो निर्णय घेतला जाईल, असंही प्रसाद यांनी यावेळी स्पष्ट केलं.

****

माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं संबंधित अधिकाऱ्यांना, जे केबल चालक केबल नेटवर्कसाठी ॲनालॉग सिग्नलचा वापर करत आहेत त्यांच्याविरोधात कारवाई करण्यास सांगितल आहे. मंत्रालयानं यापूर्वीच एक परिपत्रक काढून एक एप्रिलपासून सर्व राज्य, केंद्रशासित प्रदेश आणि केबल चालकांना, दूरदर्शन प्रसारणासाठी डिजिटल व्यवस्थेमधून सांकेतिक भाषेच्या माध्यमातून प्रसारण करण्याची सूचना केली आहे. या नियमाचा भंग होत असल्यास जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि पोलिस आयुक्तांना कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

****

केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयनं सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि तांत्रिक शिक्षण संस्थेच्या अध्यक्षांविरोधात बँकेचं ५८ कोटी रुपयांचं नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये बँकेचे माजी सहायक सरव्यवस्थापक ए जी सावंत आणि वरिष्ठ व्यवस्थापक विद्याधर पेंडनेकर यांचा समावेश आहे. तांत्रिक शिक्षण संस्थेनं खोट्या कागदपत्रांसह दाखल केलेलं कर्ज प्रकरण मंजूर करण्याची शिफारस केल्याचा आरोप या अधिकाऱ्यांवर आहे.

****

मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी ‘माझी कन्या भाग्यश्री योजना’ तसंच अत्याचारग्रस्त महिलांना मदत मिळावी यासाठी ‘मनोधैर्य योजना’ या योजनेचं नूतनीकरण करणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. मुंडे यांनी या योजनांदसर्भात आढावा घेण्यासाठी राज्यातल्या सर्व अधिकाऱ्यांशी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला, त्यावेळी त्या बोलत होत्या.  या योजनांसंदर्भात अनुभव आणि सूचना येत्या दोन दिवसात लेखी स्वरूपात पाठवाव्यात, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

****

शासनानं प्रत्येक जिल्ह्यात कृषी महोत्सव घेण्याचा निर्णय घेतला असून, या महोत्सवांच्या माध्यमातून प्रगत कृषी तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यात येईल, असं कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे. कराड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं आयोजित आंबा महोत्सवाचं काल उद्घाटन करताना ते बोलत होते. शेतकऱ्यांनी विविध जिल्ह्यांमध्ये होणाऱ्या कृषी महोत्सवांमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.

****

प्रामुख्यानं ग्रामीण भागात विजेचं जाळं वाढवण्याच्या कामाला गती देण्यासाठी, राज्याचं नवीन पारेषण धोरण पुढील आठवड्यात जाहीर केलं जाईल, अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. महावितरणच्या विविध कार्यक्रमासाठी पुण्यात आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

****

महिला सक्षमीकरणासाठी राज्य महिला आयोगातर्फे दर महिन्यात राबविला जाणारा, ‘पिंक टॉक‘हा विशेष कार्यक्रम परवा २४ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम व्हर्च्युअल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून राज्यभर गावपातळीपर्यंत प्रसारित केला जाणार आहे. ई लर्निंग डॉट पार्थ इन्फो डॉट कॉम या लिंकवर सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम बघता येईल. या आधी ज्येष्ठ साहित्यिक डॉ.विजया वाड, पोलिस आयुक्त रश्मी करंदीकर यांनी पन्नास हजारहून महिलांना मार्गदर्शन केलं आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ३० एप्रिल रोजी आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा ३१ वा भाग असणार आहे. या कार्यक्रमासाठी नागरिकांना एक नऊ दोन दोन या दूरध्वनी क्रमांकावर किंवा माय जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळाद्वारे आपले विचार मांडता येतील.

****

जागतिक वसुंधरा दिवस आज पाळण्यात येत आहे. पर्यावरणाचं रक्षण करण्याचा संदेश देण्यासाठी हा दिवस पाळण्यात येतो. १९६९ साली युनेस्कोच्या परिषदेत २२ एप्रिल हा दिवस वसुंधरा दिवस म्हणून साजरा करण्याचं ठरवण्यात आलं होतं. ‘पर्यावरण आणि हवामान साक्षरता’ हा यंदाचा विषय आहे. 

****

      महाराष्ट्र छत्तीसगढ सीमेवर तीन जहाल महिला नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली. दोन्ही राज्यांच्या पोलिसांनी संयुक्तरित्या मोहीम राबवून त्यांना सीमेवरच्या सॅड्रा गावाच्या जंगलातून अटक केली. या तीघींचाही अनेक हिंसक घटनांमध्ये सहभाग होता.

****

वाळूज इथं येत्या २७ एप्रिलला जीएसटी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे. मसिआ सभागृहात होणाऱ्या या कार्यशाळेत व्यापारी आणि करदाते यांना जीएसटी बाबत माहिती देण्यात येणार आहे.

//******//

No comments: