आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
२८ एप्रिल २०१७ सकाळी १०.०० वाजता
****
राज्यातल्या विविध १४ जिल्ह्यांतल्या
८० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि दोन हजार ४४० ग्रामपंचायतींमधल्या
तीन हजार ९०९ रिक्त पदांच्या पोट निवडणुकांसाठी २७ मे
रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी काल मुंबईत
केली. यामध्ये औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या प्रत्येकी एक, नांदेड
आणि जालना जिल्ह्यातल्या प्रत्येकी दोन ग्रामपंचायतींचा समावेश आहे. पोट निवडणुकीत
औरंगाबाद जिल्ह्यातल्या १२०, नांदेड १६०, उस्मानाबाद ७४, जालना
८६ आणि लातूर जिल्ह्यात ५३ जागांसाठी मतदान होईल.
****
राज्यस्तरीय योजनेअंतर्गत सन २०१७-१८ मध्ये राज्यातील
मुंबई आणि उपनगर हे २ जिल्हे वगळता उर्वरित ३४ जिल्ह्यांमध्ये गोवर्धन गोवंश सेवा केंद्र
सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. यासबंधीचा शासननिर्णय कृषी, पशुसंवर्धन, विभागाने
काल जारी केला. या निर्णयामुळे शेती आणि दूध यासाठी
अनुत्पादक असलेल्या गोवंशीय पशुधनाच्या संख्येत वाढ होणार आहे.
****
अक्षय्य तृतीयेनिमित्त आज महात्मा बसवेश्वर, तसंच भगवान
परशूराम यांची जयंती सर्वत्र साजरी होत आहे. या निमित्तानं दिवसभर विविध कार्यक्रमांचं
आयोजन करण्यात आलं आहे. औरंगाबाद शहरातून आज सकाळी दुचाकी फेरी काढण्यात आली. पारंपारिक
पोशाखात महिला पुरुष या दुचाकी फेरीत सहभागी झाले होते. शहराचं ग्रामदैवत असलेल्या
संस्थान गणपती मंदीर परिसरातून सायंकाळी शोभायात्रा काढण्यात येणार आहे.
****
समाजाला आज महापुरुषांच्या विचाराची गरज असल्याचं मत अखिल
भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केलं आहे.
महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या अनुषंगानं,
नांदेड जिल्हा परिषद अधिकारी आणि कर्मचारी भीम जयंती मंडळाच्या वतीनं आयोजित व्याख्यानात
ते काल बोलत होते.
****
आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी घराबरोबरच सामाजिक स्वच्छतेची
गरज लक्षात घ्यावी, असं औरंगाबाद जिल्ह्यातल्या पाटोदा या आदर्श गावाचे माजी सरपंच
भास्कर पेरे पाटील यांनी म्हटलं आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत काल लातूर इथं आयोजित
जिल्हा स्तरावरील महिला मेळाव्यात ते बोलत होते. महिलांनी वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी
पुढाकार घ्यावा, असं आवाहन पेरे पाटील यांनी यावेळी केलं.
//****//
No comments:
Post a Comment