Monday, 24 April 2017

Text - AIR News Aurangbad 24.04.2017 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 24 April 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २४ एप्रिल २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

नाफेडच्या तूर खरेदी केंद्रांवर २२ एप्रिलपर्यंत ज्या शेतकऱ्यांची तूर आली, ती खरेदी करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्री रामविलास पासवान यांच्याकडे केली आहे. नाफेडनं २२ एप्रिलपासून राज्यात तूर खरेदी केंद्र बंद केली आहेत, त्यापार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्र्यांनी नवी दिल्ली इथं पासवान यांची भेट घेतली. बाहेरुन येणाऱ्या तुरीवरील आयात कर १० टक्क्यांवरुन २५ टक्क्यांवर करावा, तसंच, तूर खरेदीसाठी योग्यरित्या धोरण आखण्यात यावं, अशी मागणी करण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

****

पंचायत हे देशाच्या ग्रामीण भागातल्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी महत्वाचं माध्यम असून, त्यांची देशाच्या परिवर्तनात महत्वाची भूमिका असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ‘पंचायत राज दिना’निमित्त पंतप्रधानांनी देशभरातल्या पंचायतींना ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. पंचायती राज संस्थांच्या माध्यमातून नागरिकांची सेवा करणाऱ्यांचं त्यांनी कौतुक केलं. 

****

शेतकऱ्यांचं उत्पन्न दुपटीनं वाढण्यासाठी उत्पादने आणि गुरे विपणन कायदा २०१७ तसंच कंत्राटी शेती प्रस्ताव लागू करण्याची गरज कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी व्यक्त केली. ते आज नवी दिल्ली इथं कृषि आणि कृषि विपणनात सुधार, याविषयी राज्यांच्या कृषि मंत्र्यांच्या संमेलनालात बोलत होते. कृषि उत्पन्न बाजार समितीत असलेल्या त्रूटी दूर करण्याकरता एक देश एक बाजार व्यवस्थेला चालना देण्यासाठी नवीन अधिनियम आणला असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

****

जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात आज पिपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुलवामा जिल्ह्यातल्या पिंगलान पक्षाचे जिल्हाध्यक्ष अब्दुल गनी दार यांच्यावर संशयित दहशतवाद्यांनी गोळीबार केला. दहशतवाद्यांकडून नेत्याला ठार मारण्याची ही एका आठवड्यातली दुसरी घटना आहे.  

****

छत्तीसगढमधल्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत केंद्रीय राखीव पोलिस दलाचे अकरा जवान शहीद झाले. दोन ठिकाणच्या जवानांच्या ताफ्यावर नक्षलवाद्यांनी हल्ला केल्यानंतर ही चकमक झाली.

****

किशोर न्याय कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्याची गरज नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांनी व्यक्त केली आहे. ते आज कोलकाता इथं वार्ताहरांशी बोलत होते. तरुणांमध्ये वाढत्या गुन्ह्यासंदर्भात प्रश्नाला उत्तर देताना, सत्यार्थी यांनी, किशोर वयातल्या मुलांवर गुन्हेगारी कृत्य करण्यापासून आळा घालण्यासाठी या कायद्यात अनेक तरतुदी असल्याचं सांगितलं. 

****

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत महत्वाची भूमिका सत्ताधारी पक्षाची असल्याचं माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे. पवार यांच्या संसदीय कारकीर्दीला ५० वर्ष पुर्ण झाल्याच्या निमित्तानं सोलापूर इथं आज त्यांना नागरी सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रपती पदासाठी पवार यांच्या नावाची चर्चा माध्यमांमध्ये केली जात असून, त्यावर पवार यांनी, आपल्या पक्षाची ताकद कमी असली, तरी समर्थक जास्त असल्याचं म्हटलं आहे. 

****

राज्यातल्या नाशवंत शेतमालाच्या बाबतीत विविध समस्यांचा, प्रश्नांचा अभ्यास करून या शेतमालाचं काढणी पश्चात नुकसान टाळण्यासाठी राज्य सरकारनं अकरा सदस्यीय समिती गठित केली आहे. शेतमालाचं उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य बाजार भाव मिळण्यासाठी आणि उपाययोजना सुचविण्यासाठीही ही समिती अभ्यास करणार आहे. या समितीनं आजपासून ६० दिवसांत शासनाला आपला अहवाल सादर करावयाचा आहे. याबातचा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला. 

****

आर्थिक फसवणूक प्रकरणी देशभरातल्या साडेचार हजार गुंतवणूकदारांनी एकत्र येऊन 'समृध्दी जीवन' विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. समृध्दी जीवन अपहाराबाबत तपास करण्यासाठी विशेष पथक नेमावं, या प्रकरणात आतापर्यंत काय तपास केला, त्याबाबतची माहिती द्यावी, आदी मागण्या या याचिकेत करण्यात आल्या आहेत. कामगारांच्या पगारातून भविष्य निर्वाह निधी रक्कम कापून भविष्य निर्वाह निधी कार्यालयात जमा न केल्याप्रकरणी समृद्धी जीवन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

****

येत्या एक मे ला साजरा करण्यात येणाऱ्या ५७ व्या महाराष्ट्र दिनाच्या पूर्वतयारीची आढावा बैठक आज औरंगाबाद इथं विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यासाठी संबंधित अधिकार्यांना सूचना देण्यात आल्या. महाराष्ट्र दिनाचं मुख्य शासकीय ध्वजारोहण पोलिस आयुक्त कार्यालयात पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते होणार आहे. 

****

राज्यात आज सर्वात जास्त ४३ पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमान चंद्रपूर इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात आज नांदेड आणि परभणी इथं सरासरी ४० अंश, तर औरंगाबाद इथं सरासरी ३७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
****

No comments: