Friday, 21 April 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 21.04.2017 - 05.25pm


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 21 April 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २१ एप्रिल २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

लातूर आणि चंद्रपूर महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळालं तर परभणी महानगरपालिकेत सर्वाधिक जागा पटकावत काँग्रेस पक्ष बहुमताच्या जवळ पोहोचला आहे. परभणी महापालिकेत ६५ जागांपैकी ३१ जागा काँग्रेसला मिळाल्या असून बहुमतासाठी अवघ्या दोन जागा कमी पडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनं १८, भाजपनं आठ, शिवसेनेनं सहा, तर दोन जागा अपक्ष उमेदवारांनी जिंकल्या आहेत.
लातूरमध्ये पहिल्यांदाच भाजपनं स्पष्ट बहुमत मिळवलं असून एकूण ७० जागांपैकी ३६ जागांवर भाजपनं विजय मिळवला आहे. काँग्रेसला ३३ तर राष्ट्रवादी काँग्रेसला एक जागा मिळाली. शिवसेनेला एकही जागा जिंकता आली नाही.
चंद्रपूर महानगरपालिकेत भाजपनं सत्ता कायम ठेवली आहे. एकूण ६६ जागांपैकी भाजपनं ३६, काँग्रेसनं १२, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रत्येकी दोन, प्रहारनं एक तर १३ जागा अपक्ष उमेदवारांनी जिंकल्या आहेत.

****

मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात शासन सकारात्मक असल्याचं, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. जळगाव इथं ते आज वार्ताहरांशी बोलत होते. मराठा आरक्षण या मुद्यावर शासनाची न्यायालयीन लढाई सुकर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबतही शासन गंभीर असून, शेतकऱ्यांना शेती करणं आर्थिकदृष्ट्या सुकर व्हावं यासाठी उत्पादन खर्च शक्य तितका कमी आणि शक्य झाल्यास मोफत करता येईल का, यादृष्टीनं विचार सुरु असल्याचं ते म्हणाले.

****

नाशिक जिल्ह्यातल्या लासलगाव आणि निफाड इथं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना रोख किंवा एन इ एफ टी द्वारे पैसे देण्याच्या विषयावरून आज सलग दुसऱ्या दिवशी कांदा लिलाव ठप्प होते. कांदा लिलावापोटी व्यापारी धनादेश देतात मात्र ते टण्यास १० ते १५ दिवस विलंब होत असल्यानं, व्यापाऱ्यांनी एन इ एफ टी किंवा रोखीच्या स्वरूपात हा पैसा द्यावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
दरम्यान, आज चांदवड बाजार समितीत कांद्याचे भाव २०० ते ३०० रुपये प्रति क्विंटलनं कोसळल्यानं शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडून रास्ता रोको आंदोलन केलं. पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे काही वेळानं लिलाव पूर्ववत सुरु झाले.

****

प्रधानमंत्री पीक विमा योजनेची प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांना प्रधानमंत्री पुरस्कार देऊन गौरण्यात आलं. राष्ट्रीय स्तरावर लोकप्रशासनात उत्कृष्ट आणि नाविण्यपूर्ण काम करणाऱ्या नागरी सेवेतल्या अधिकाऱ्यांना दरवर्षी २१ एप्रिल रोजी नागरी सेवा दिनी’ ‘प्रधानमंत्री पुरस्कारदेऊन गौरविण्यात येतं.

****

स्वाईन फ्लू आजाराविषयी नागरिकांनी भिती बाळगण्याचं कारण नाही, असं आरोग्य विभागाचे सहाय्यक संचालक आणि विशेष कार्यकारी अधिकारी डॉ.नितीन बिलोलीकर यांनी सांगितलं. औरंगाबाद इथं जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं स्वाईन फ्यू या आजाराविषयी आज एक दिवसीय जिल्हास्तरीय जनजागृती कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यानंतर घेण्यात आलेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. महानगरपालिकेच्या वतीनं स्वाईन फ्यू विषयी ०२४०-२३३३५३६ ते ४० या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करण्याचं आवाहन डॉक्टर जयश्री कुलकर्णी यांनी केलं आहे.

****

आधार पत्र हा पर्याय म्हणून वापरता येईल असे आदेश दिले असतानाही केंद्र सरकारनं ते बंधनकारक केल्यामुळे सर्वोच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे. आयकर आणि पॅन कार्डसाठी आधार पत्र सक्ती करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला होता, यावर न्यायालयानं, आधारची सक्ती करण्याची गरज आहे का, असा सवाल केला. बोगस कंपन्यांमध्ये पैसे फिरवण्यासाठी पॅन कार्डचा वापर झाला होता. या प्रकाराला आळा घालण्यासाठी आधार पत्र बंधनकारक केलं, असं सरकारनं न्यायालयाला सांगितलं. यावर पुढील सुनावणी पुढच्या आठवड्यात होणार आहे. 

****

काश्मिरी विद्यार्थ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सर्व राज्य सरकारांना दिले आहेत. राजस्थानमधल्या मेवाड विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या सहा काश्मिरी विद्यार्थ्यांना चित्तोगढ इथं स्थानिकांनी मारहाण केली, या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली आहे. या घटनेची गंभीर दखल घेत, काश्मिरी विद्यार्थ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करणं गरजेचं असून इतर नागरिकांप्रमाणे तेही भारतीय नागरिक आहेत, असं ते म्हणाले.

****

भारतीय नौदलानं आज जमिनीवर मारा करणाऱ्या ‘ब्राम्होस सुपरसॉनिक क्रुज’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. बंगालच्या उपसागरात ही चाचणी करण्यात आली असून, या चाचणीचे अपेक्षित परिणाम दिसून आल्याचं नौदलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. 

****

No comments: