Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 29 April 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ एप्रिल २०१७ सकाळी
६.५० मि.
****
·
कर्जाच्या परिघाबाहेर गेलेल्या
शेतकऱ्यांनाही कर्जपुरवठा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
· राज्यात पोलिस दलात
मोठे फेरबदल; औरंगाबादचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची मुंबई शहर वाहतूक शाखेच्या सह आयुक्तपदी बदली
तर ठाण्याचे अपर पोलिस आयुक्त यशस्वी यादव औरंगाबादचे पोलिस आयुक्त
म्हणून रुजू
आणि
·
तूर खरेदीसंदर्भातल्या
जाचक अटी रद्द करून नव्यानं शासननिर्णय जारी करावा - विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची
मागणी
****
कर्जाच्या परिघाबाहेर गेलेल्या शेतकऱ्यांनाही कर्जपुरवठा
करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. काल मुंबईत २०१७-१८ ची खरीप हंगामपूर्व आढावा बैठक मुख्यमंत्र्यांच्या
अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते.
राज्यात सुमारे ३१ लाख शेतकरी कर्जाच्या परिघाबाहेर गेले आहेत, त्यांना कर्जपुरवठ्याच्या परिघात आणण्यासाठी अपर मुख्य वित्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे, या समितीनं नियोजन
करून, सर्व शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून द्यावं, असं मुख्यमंत्री म्हणाले. ज्या बँका कर्जवाटपात अकार्यक्षम आहेत, त्यांना व्यावसायिक बँकांशी जोडून
त्या सक्षम केल्या जात असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
या वर्षी कृषी विकास दर साडे बारा टक्के राहिल्याचं त्यांनी सांगितलं.
उत्पादकता वाढवणं हे या हंगामाचं मुख्य उद्दिष्ट असून, यंदाच्या खरीप हंगामात दुबार पेरणीचं संकट टाळण्यासाठी सर्वंकष आराखडा
तयार करण्याचे निर्देश फडणवीस यांनी दिले आहेत.
पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा, तालुका, गाव पातळीवर सुक्ष्म नियोजन करुन पीक कर्ज मेळावे
आयोजित करावेत, कृषी विद्यापीठांनी पीक पद्धतीचं नियोजन करून, शाश्वत पीक
घेण्याबाबत गाव पातळीवर माहिती द्यावी, जलयुक्त शिवार, शेततळी, विहीरींची कामं
युद्धपातळीवर करण्यात यावीत, कृषी आणि पणन विभागाने साठवणूक, अन्न प्रक्रिया उद्योगावर अधिक भर द्यावा, आदी
सूचनाही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत केल्या.
****
हवामानाची माहिती देणाऱ्या ‘महावेध’ प्रकल्पाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या
होणार आहे. या प्रकल्पामुळे हवामान अंदाजात अचूकता येणार असून कृषी संशोधन आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी तो
सहायक ठरेल. या प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातल्या सर्व दोन हजार ६५ महसूल मंडळामध्ये स्वयंचलित हवामान केंद्राची उभारणी
करण्यात येणार आहे.
****
राज्यात पोलिस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत.
औरंगाबादचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची मुंबई शहर वाहतूक सह आयुक्तपदी बदली
झाली असून, ठाण्याचे अपर पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी काल औरंगाबादचे पोलिस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला.
औरंगाबाद शहराचे पोलिस उपायुक्त वसंत परदेशी यांची ठाणे
शहर पोलिस उपायुक्त पदी तर उपायुक्त संदीप आटोळे यांची गोंदीयाच्या अपर पोलिस अधीक्षक
पदी बदली करण्यात आली आहे. उस्मानाबादच्या अपर पोलिस अधीक्षक दिपाली दाटे तसंच औरंगाबाद
इथलेच पोलिस अधीक्षक विनायक ढाकणे आता, औरंगाबाद शहर पोलिस उपायुक्त म्हणून काम पाहतील.
औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक अजित पाटील यांची पुणे गुन्हे
अन्वेषण विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून बदली झाली असून, मुंबई शहर वाहतुक
विभागाचे सहायक पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे आता औरंगाबादचे विशेष पोलिस महानिरीक्षक
असतील.
औरंगाबाद ग्रामीणचे पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांची
मुंबई शहर पोलिस उपायुक्त पदी, बदली झाली असून, नागपूर सीआयडीच्या पोलिस अधीक्षक डॉ
आरतीसिंह यांनी काल औरंगाबाद ग्रामीण पोलिस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला. पैठणचे सहाय्यक पोलिस अधीक्षक बच्चन सिंग यांची
जळगावच्या अपर पोलिस अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.
जालन्याच्या पोलिस
अधिक्षक ज्योती प्रिया सिंह यांची पुणे शहर पोलिस उपायुक्त पदी बदली झाली आहे. पुणे
गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस अधीक्षक रामनाथ पोकळे आता जालन्याचे पोलिस अधीक्षक म्हणून
काम पाहतील. जालन्याचे अपर पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर यांची नागपूरच्या पोलिस उपायुक्त
पदी तर लातूरच्या अपर पोलिस अधीक्षक लता फड यांची जालन्याच्या अपर पोलिस अधीक्षक पदी
बदली झाली आहे.
यवतमाळचे अपर पोलिस अधीक्षक काकासाहेब डोळे आता लातूरचे
अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून काम पाहतील.
बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाईचे अप्पर पोलिस अधीक्षक दीक्षित
कुमार गेडाम यांची सिंधुदूर्गच्या पोलिस अधीक्षक पदी बदली झाली असून, त्यांच्या जागी
दौंड इथले राज्य राखीव पोलिस दलाचे समादेशक अजित बोराडे यांची नियुक्ती झाली आहे. माजलगावचे
सहाय्यक पोलिस अधीक्षक डॉ. हरि बालाजी एन यांची गडचिरोलीचे अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून
बदली झाली आहे.
नांदेडचे पोलिस अधीक्षक संजय येनपुरे यांची मुंबईचे शहर
पोलिस उपायुक्त म्हणून बदली झाली असून, अकोल्याचे पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीना आता
नांदेडचे पोलिस अधीक्षक असतील.
नांदेडचे अप्पर पोलिस अधीक्षक संदीप डोईफोडे यांची बुलडाणा
अपर पोलिस अधीक्षक म्हणून बदली झाली असून, त्यांच्या जागी नागपूरच्या कामठीचे सहाय्यक
पोलिस अधीक्षक मंगेश शिंदे यांची बदली झाली आहे.
परभणी पोलिस अधीक्षक नियती ठाकुर यांची चंद्रपूरच्या पोलिस
अधीक्षक पदी बदली झाली असून, नागपूरच्या पोलिस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य दिलीप
झळगे यांची परभणीच्या पोलिस अधीक्षक पदी नियुक्ती झाली आहे.
हिंगोलीचे पोलिस अधीक्षक म्हणून पुणे शहराचे पोलिस उपायुक्त
बस्वराज तेली यांची नियुक्ती झाली असून, सध्याचे पोलिस अधीक्षक अशोक मोराळे यांची पुणे
शहर पोलिस उपायुक्त म्हणून बदली झाली आहे.
ठाणे शहर पोलिस उपायुक्त पंढरीनाथ पवार यांची जालना पोलिस
प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य म्हणून, तर बारामतीचे अपर पोलिस अधीक्षक तानाजी चिखले
यांची जालना पोलिस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य म्हणून बदली झाली आहे.
मुंबई शहर पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांची नांदेड
इथं नागरी हक्क संरक्षण विभागाचे पोलिस अधीक्षक म्हणून, तर धुळ्याचे अपर पोलिस अधीक्षक
चंद्रकांत गवळी यांची औरंगाबाद इथं नागरी हक्क संरक्षण विभागाचे पोलिस अधीक्षक म्हणून
बदली झाली आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरुन प्रसारित
केलं जात आहे, आमचं हे बातमीपत्र न्यूज
ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या रविवारी आकाशवाणीवरील ‘मन
की बात’ या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा ३१ वा भाग
असणार आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम
प्रसारित होईल.
****
शासनानं तूर खरेदीसंदर्भातल्या जाचक अटी रद्द करून नव्यानं
शासननिर्णय जारी करावा, अशी मागणी विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी
केली आहे. तूर खरेदीसंदर्भात नियोजनाचा अभाव असून शेतकऱ्यांचा छळ होत असल्याचा आरोप
मुंडे यांनी केला. शेतकऱ्यांच्या हमीभावावर प्रतिक्विंटल चारशे पन्नास रूपये बोनस देऊन
आठ दिवसात तूर खरेदी प्रक्रिया पूर्ण करावी, असंही ते म्हणाले. समृद्धी महामार्गामुळे
या भागातला नव्वद टक्के शेतकरी भूमिहीन होणार असल्यानं, शासनानं समृद्धी महामार्गाचा
पुनर्विचार करावा अशी मागणीही मुंडे यांनी यावेळी केली.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या येरमाळा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस
निरीक्षक राजेंद्र मोताळे यांच्यावर २०१२ मध्ये झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी आरोपीस १० वर्षे सक्तमजुरीची
शिक्षा सुनावण्यात आली आहे. उस्मानाबाद अतिरिक्त सत्र न्यायालयानं ही शिक्षा सुनावली.
मोक्का प्रकरणातील आरोपी पोपट पवार याला अटक करण्यासाठी मोताळे त्याच्या घरी गेले असता
आरोपीनं मोताळे यांच्यावर हा हल्ला केला होता.
****
राज्यातल्या ८० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि दोन हजार ४४० ग्रामपंचायतींमधल्या तीन हजार ९०९ रिक्त पदांच्या पोट निवडणुकांसाठी २७ मे रोजी मतदान होणार आहे. यामध्ये औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या
प्रत्येकी एक, नांदेड आणि जालना
जिल्ह्यातल्या प्रत्येकी दोन ग्रामपंचायतींचा समावेश आहे. पोट निवडणुकीत औरंगाबाद जिल्ह्यातल्या
१२०, नांदेड १६०, उस्मानाबाद ७४, जालना ८६ आणि लातूर जिल्ह्यात ५३ रिक्त जागांसाठी मतदान होईल.
****
पीडित महिलांना पोलिसांसह संबंधित यंत्रणांकडून प्रतिसाद न मिळाल्यास महिला आयोग त्याचा पाठपुरावा
करुन न्याय मिळवून देईल असं, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा डॉक्टर विजया रहाटकर
यांनी म्हटलं आहे. काल औरंगाबाद इथं सुभेदारी विश्रामगृहात
आयोजित 'महिला आयोग तुमच्या दारी' या उपक्रमांतर्गत त्या बोलत
होत्या. महिलांच्या कौटुंबिक, कार्यालयीन तसंच सामाजिक सुरक्षेसाठी राज्य महिला आयोग प्रयत्नशील असल्याचं रहाटकर यावेळी
म्हणाल्या.
****
जालना जिल्ह्यात मंठा पंचायत
समितीचे विस्तार अधिकारी ए आर चव्हाण, तसंच पांगरी गोसावीचे ग्रामविस्तार अधिकारी एस
आर आटोळे यांना निलंबित करण्यात आलं आहे. सातत्यानं गैरहजर राहण्याच्या कारणावरून ही
कारवाई करण्यात आली. जालना पंचायत समितीतल्या दोन कर्मचाऱ्यांनाही कार्यालयात उशीरा
येण्याच्या कारणावरून निलंबित करण्यात आलं आहे.
****
परिवहन विभागाची नवीन संगणकीय प्रणाली वाहनधारकांसाठी उपयुक्त ठरणार असल्याचं परभणीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पी. बी. जाधव यांनी म्हटलं आहे. ते काल परभणी इथं आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. परभणी जिल्ह्यातील साडेतीनशे सुविधा केंद्रांमधून
संगणकीय प्रणाली सुरु करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. या नवीन प्रणालीमध्ये रोखरहित व्यवहारांची सुविधा उपलब्ध आहे.
//*******//
No comments:
Post a Comment