Saturday, 22 April 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 22.04.2017 6.50am


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 22 April 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २२ एप्रिल २०१७ सकाळी ६.५० मि.

****

·      हॉटेल तसंच उपाहारगृहात सेवा शुल्क देणं ग्राहकांसाठी बंधनकारक नसल्याचं, केंद्र सरकारकडून स्पष्ट

·      लातूर आणि चंद्रपूर महापालिकेत भारतीय जनता पक्षाला बहुमत तर परभणी महापालिकेत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष

·      राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात सात टक्क्यांनी वाढ

आणि

·      सत्त्याण्णवाव्या खिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाला उस्मानाबाद इथं प्रारंभ

****

हॉटेल तसंच उपाहारगृहात सेवा शुल्क देणं ग्राहकांसाठी बंधनकारक नसल्याचं, केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी काल वृत्तसंस्थेशी बोलताना, हॉटेल तसंच उपाहारगृहांना सेवा शुल्क ठरवण्याचा अधिकार नसून, सेवा शुल्क देणं अथवा न देणं, हा निर्णय ग्राहकांसाठी पूर्णपणे ऐच्छिक असेल, असं म्हटलं आहे. याबाबत सर्व राज्य सरकारांनी योग्य पावले उचलावीत, असंही पासवान यांनी म्हटलं आहे.

****

राज्यात काल झालेल्या तीन महापालिकांच्या मतमोजणीत लातूर आणि चंद्रपूर महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळालं तर परभणी महानगर पालिकेत काँग्रेस पक्षानं सर्वाधिक जागा पटकावल्या. परभणी महापालिकेच्या ६५ जागांपैकी ३१ जागा काँग्रेसनं जिंकल्या असून सत्तास्थापनेसाठी आवश्यक बहुमताचा आकडा गाठण्यासाठी अवघ्या दोन जागांची आवश्यकता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं १८, भाजपनं आठ, शिवसेनेनं सहा, तर दोन जागांवर अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. या निकालाबाबत अधिक माहिती देत आहेत, आमचे वार्ताहर…

परभणी महानगरपालिका निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसले तरी मतदारांनी काँग्रेस पक्षाला सर्वाधिक ३१ जागा देऊन सत्तेच्या जवळ नेऊन ठेवले आहे. काँग्रेस पक्षाने मिळवलेले यश म्हणजे कार्यकर्त्यांच्या विश्वासावर  मतदारांनी केलेले शिक्कामोर्तब असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपुडकर यांनी व्यक्त केली.

लातूर महापालिकेत भाजपनं पहिल्यांदाच बहुमत मिळवलं. महापालिकेच्या ७० जागांपैकी भाजपनं ३६ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलं. काँग्रेसला ३३ तर राष्ट्रवादी काँग्रेसला एक जागा मिळाली. शिवसेनेला एकही जागा जिंकता आली नाही. याबाबत अधिक माहिती देत आहेत, आमचे वार्ताहर…

या निवडणुकीत शिवसेना, आरपीआय, एमआयएम यांना खातेही उघडता आलेली नाही. या निवडणुकीचं आणि या निकालाचं एक वैशिष्ट्य म्हणजे हा एकहाती निकाल आणि एकहाती पराभव हा मान्यच करावा लागेल.

चंद्रपूर महानगरपालिकेत भाजपनं सत्ता कायम ठेवली आहे. महापालिकेच्या ६६ जागांपैकी भाजपनं ३६, काँग्रेसनं १२, बहुजन समाज पक्ष आठ, शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रत्येकी दोन, तर चार जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले.

दरम्यान, लातूर आणि चंद्रपूर महानगरपालिकांमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या यशाबद्दल तसंच परभणी महानगरपालिकेत पक्षाचं संख्याबळ वाढवल्याबद्दल पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी पक्ष कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं आहे. दानवे यांनी मतदारांचेही आभार मानले आहेत.

****

मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात शासन सकारात्मक असल्याचं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. ते काल जळगाव इथं वार्ताहरांशी बोलत होते. मराठा आरक्षण या मुद्यावर शासनाची न्यायालयीन लढाई सुकर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. खतं, बियाणं, कीटकनाशकं यांच्या किंमती कमी करून, शेतीचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं, पाटील यावेळी म्हणाले, शेतकऱ्यांनी नियमित कर्जफेड करुन कर्ज परतफेडीचे लाभ घेण्याची भूमिका ठेवावी, असं आवाहन पाटील यांनी केलं.

****

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात सात टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. भत्त्याचा दर आता १३२ टक्के इतका असेल. गेल्या १ जुलैपासून पूर्वलक्षी प्रभावनं ही वाढ लागू होईल. राज्यातल्या १६ लाख अधिकारी कर्मचारी आणि जवळपास साडे सहा लाख निवृत्तीधारकांना या वाढीचा लाभ होणार आहे.



****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरुन प्रसारित केलं जात आहे, आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

सत्त्याण्णवाव्या खिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाला कालपासून उस्मानाबाद इथं प्रारंभ झाला. राज्याचे पशूसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन झालं. याबाबत अधिक माहिती देत आहेत, आमचे वार्ताहर …

नाट्य परिषदेला मिळणारे अनुदान शासनानं वाढवुन द्यावं, नाट्य व्यवसाय कलाकारांना घरं द्यावीत, अशा मागण्या नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी यावेळी केल्या. त्यावर शासन सकारात्मक विचार करेल, अशी ग्वाही पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी दिली. नाट्यसंमेलनाध्यक्ष जयंत सावरकर यांनी राज्यातली सर्व नाट्यगृह सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी नाट्य परिषदेकडे चालवण्यास द्यावी अशी मागणी केली. स्थानिक कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी हे संमेलन संस्मरणीय ठरेल असा विश्वास स्वागताध्यक्ष आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केला.  

ा उद्घाटन सोहळ्यापूर्वी नाट्यदिंडी काढण्यात आली. पारंपारिक वेशभुषेत सहभागी झालेल्या नागरिकांसह विविध सामाजिक संदेश देणारे चित्ररथ नागरिकांचं लक्ष वेधून घेत होते. या संमेलनात आज स्थानिक कलाकार लोककलांचं सादरीकरण करणार असून, विविध एकांकिकांसह, संमेलनाध्यक्षांची प्रकट मुलाखत घेतली जाणार आहे.

****

प्रधानमंत्री पीक विमा योजनेप्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री पुरस्कार देऊन गौरण्यात आलं. कानागरी सेवा दिनीनवी दिल्लीत ा पुरस्कार वितरण समारंभ झाला. लोकप्रशासनात उत्कृष्ट आणि नाविण्यपूर्ण काम करणाऱ्या नागरी सेवेतल्या अधिकाऱ्यांना दरवर्षी प्रधानमंत्री पुरस्कारदेऊन गौरण्यात येतं.

मुंबई इथं या दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात नांदेडचे जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांना राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानाअंतर्गत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरवण्यात आलं. औरंगाबाद जिल्ह्याच्या पैठण तालुक्यात वरवंडीच्या जिल्हा परिषद शाळेतले सहशिक्षक भरत काळे यांचाही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

      ११व्या नागरी सेवा दिनानिमित्त काल औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कार्यक्रम घेण्यात आला. उत्कृष्ट काम करणारे अधिकारी कर्मचारी यांचा विभागीय आयुक्त डॉ पुरुषोत्तम भापकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

****

औरंगाबाद इथल्या नालंदा प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयाच्या दोन मुख्याध्यापकांसह एका सहशिक्षकाला १० हजार रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं काल अटक केली. शालेय पोषण आहाराचं बिल मंजूर करुन देण्यासाठी ठेकेदाराकडे प्रत्येकी ६ हजार रुपयांची मागणी केली होती. ठेकेदाराकडून ही रक्कम घेणाऱ्या सहशिक्षकासह या दोन्ही मुख्याध्यापकांना अटक करण्यात आली.

****

हिंगोली जिल्ह्यात सेनगाव इथं गर्भपाताची बेकायदा औषधं बाळगणारा व्यावसायिक महेश जेथलिया याला न्यायालयानं चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. सुमारे दोन आठवड्यांपासून फरार असलेल्या जेथलिया याला गुरुवारी रात्री अटक करण्यात आली होती.

****

हैदराबाद औरंगाबाद पॅसेंजर रेल्वेगाडीचं इंजिन आणि तीन डबे गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास आंध्रप्रदेशात विकाराबादजवळ रुळावरुन घसरले. या अपघातात सुदैवानं जीवितहानी झाली नाही. मात्र काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला असून, काही गाड्या अंशत: तर काही गाड्या पूर्णत: रद्द करण्यात आल्या आहेत.    

****

सांगली जिल्ह्यात मीरज-पंढरपूर महामार्गावर वाळूच्या ट्रकवर मिनी ट्रॅव्हल्स बस आदळून झालेल्या अपघातात सहा जण ठार तर १२ जण जखमी झाले. काल पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला.

****

औरंगाबाद-पुणे मार्गावर गंगापूर फाट्याजवळ खासगी बस आणि कंटेनर यांच्यात धडक होऊन बस चालकासह दोघे जण जागीच ठार झाले तर १७ जण जण जखमी झाले. नादुरुस्त कंटेनरवर भरधाव बस मागून धडकल्यानं हा अपघात झाला.

****

बीड जिल्ह्यात धारुर तालुक्यातल्या आरणवाडीजवळ भरधाव ट्रकनं दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील एकजण जागीच ठार झाला तर अन्य एक जण जखमी झाला. काल सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.

****

बीड जिल्ह्यात उष्माघातानं काल दोन जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एक शेतकरी आणि एका कामगाराचा समावेश आहे. उष्माघातानं जिल्ह्यात आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

नांदेड जिल्ह्यात प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेसह इतर घरकुल योजनांतर्गत १५ हजार ५२३ लाभार्थ्यांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. येत्या आठ दिवसात लाभार्थ्यांना निधीचा पहिला हफ्ता वितरित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. सुधीर भातलवंडे यांनी दिली.

//*******//


No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 15.08.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 15 August 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्...