Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date - 27 April 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ एप्रिल २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वेचं
खाजगीकरण रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे हा सामान्य जनतेसाठी वाहतुकीचा शेवटचा
उपाय असल्याचं ते म्हणाले. सरकार सामान्य माणसाच्या गरजेकडे दुर्लक्ष करणार नसल्याचं
ते म्हणाले. नीति आयोगाला रेल्वे संबंधित सामाजिक सेवा दायित्वाच्या मुद्यावर लक्ष
देण्यास सांगितलं असल्याचं ते म्हणाले.
****
भारतानं आज अग्नी तीन या
प्रक्षेपणास्त्राची
ओडिसातल्या
अब्दुल कलाम बेटावरुन यशस्वी चाचणी केली. तीन हजार किलोमीटर अंतरापर्यंत हे क्षेपणास्त्र
मारा करु शकतं. सध्या कार्यरत शस्त्रप्रणालीला आणखी प्रभावी बनवण्यासाठी संरक्षण संशोधन
विकास संस्था - डीआरडीओच्या सहाय्यानं हे परीक्षण करण्यात
आलं.
****
ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांच्या
निधनावर राष्ट्रपती
प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक
व्यक्त केला. खन्ना हे अतिशय हुशार अभिनेते आणि राजकारणी होते, असं राष्ट्रपतींनी शोक
संदेशात म्हटलं आहे.
महान अभिनेता आणि लोकप्रतिनिधी म्हणून
विनोद खन्ना सदैव स्मरणात राहतील, असं सांगत पंतप्रधानांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण
केली. त्यांच्या
निधनानं सामाजिक, राजकीय क्षेत्राची उत्तम जाण असणारा कलावंत आपण गमावला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी
म्हटलं आहे.
****
उपचाराचे पैसे थकले म्हणून रुग्णाला
रुग्णालयात रोखून अडवणूक करणं चुकीचं असल्याचा निर्वाळा दिल्ली उच्च न्यायालयानं आज
दिला. दिल्लीतील एका रुग्णाच्या मुलाने दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीत न्यायालयानं
हा निर्णय दिला. साडे तेरा लाखांचं देयक थकल्यामुळे खासगी रुग्णालयानं रुग्णाला घरी
सोडण्यास मनाई केली होती. न्यायालयानं हस्तक्षेप करून त्याची सुटका केली.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ३०
एप्रिल रोजी आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार आहेत.
हा या कार्यक्रमाचा ३१ वा भाग असणार आहे. या कार्यक्रमासाठी नागरिकांना एक नऊ दोन दोन
या दूरध्वनी क्रमांकावर किंवा माय जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळाद्वारे आपले विचार मांडता
येतील.
****
उडान योजनेमुळे मराठवाड्याच्या विकासाला
चालना मिळेल, असं मत ग्रामविकास आणि महिला, बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त
केलं आहे. नांदेड-हैदराबाद विमानसेवेचा शुभारंभ आज व्हिडिओ लिंकिंगद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांच्या हस्ते झाला, त्यानिमित्तानं नांदेडच्या गुरुगोविंदसिंघजी विमानतळावर आयोजित
कार्यक्रमात त्या बोलत होत्या. उडान योजनेत विमान तिकिटाचे दरही
कमी असल्यानं सामान्य
माणसाला विमानसेवेचा लाभ घेता येईल, असं
त्या म्हणाल्या.
****
राज्यात तूर खरेदी पुन्हा सुरु करायची
असल्यास राज्य सरकारनं तसा आदेश देणं गरजेचं असल्याचं नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील
यांनी सांगितलं. तूर खरेदीसाठी नाफेडला केंद्र सरकारनं तीन वेळा मुदतवाढ दिली. मात्र
२२ एप्रिलला मुदत संपल्यानं तूर खरेदी बंद केली असून, नाफेड स्वत:च्या अधिकारात तूर
खरेदी करु शकत नाही, असं ते म्हणाले. अजूनही शेतकऱ्यांची तूर
शिल्लक असल्यास नाफेडला तसा आदेश देऊन खरेदी केंद्रं सुरु करावीत,
असं पाटील यांनी सांगितलं.
****
खरीप हंगाम हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत
महत्वपूर्ण असल्यानं सर्व संबंधित विभाग आणि यंत्रणांनी गाव केंद्रबिंदू मानून खरीपाचं नियोजन केल्यास शेतकऱ्यांना नक्कीच
लाभ होईल, असं सहकार
राज्यमंत्री आणि परभणीचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. परभणी जिल्हाधिकारी
कार्यालयात आयोजित खरीप हंगाम आढावा बैठकीत ते आज बोलत होते. शेतकऱ्यांना बियाणे, खते
तसंच पेरणीसाठीच्या अन्य साधनसामग्रीचा तुटवडा भासू नये, यासाठी सर्व संबंधित विभागांनी
समन्वय राखून प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
****
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा
पत्रकारिता विभाग आणि युनिसेफच्या संयुक्त विद्यमानं उद्या आणि परवा दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय
चर्चासत्राचं आयोजन
करण्यात आलं आहे. कार्यक्रमाचे संयोजक डॉ. दिनकर माने यांनी औरंगाबाद इथं वार्ताहर
परिषदेत ही माहिती दिली. युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट गोल्स, सोशल जस्टीस ॲण्ड मीडिया
या विषयावरील या चर्चासत्रात दहा देशातले संशोधक सहभागी होणार आहेत.
****
जोपर्यंत देशात सामाजिक लोकशाही
येत नाही, तोपर्यंत
राजकीय लोकशाही येणार नसल्याचं मत राज्यघटनेचे अभ्यासक डॉक्टर आर. के. क्षीरसागर
यांनी व्यक्त केलं. ते आज औरंगाबाद इथं फुले, शाहू, आंबेडकर विचार प्रबोधन परिषदेच्या
वतीनं आयोजित विशेष व्याख्यानात बोलत होते. संविधानात मांडलेला विचार हा समाजवादी असल्याचं
त्यांनी यावेळी सांगितलं. ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर गंगाधर पानतावणे कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी होते.
****
No comments:
Post a Comment