आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
२५ एप्रिल २०१७ सकाळी १०.०० वाजता
****
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ - सी बी एस ईनं मार्क मॉडरेशन
धोरण रद्द केलं आहे. या धोरणानुसार कठीण प्रश्नांसाठी विद्यार्थ्यांना पंधरा टक्के
गुण वाढवून दिले जात. मात्र काही गुणांसाठी विद्यार्थी अनुत्तीर्ण होणार असेल, तर ते
उत्तीर्ण व्हावेत, यासाठी अतिरिक्त गुण दिले जातील, असंही मंडळाकडून सांगण्यात आलं
आहे.
****
देशभरातल्या सर्व रेल्वेगाड्यांचे चालक आणि गार्ड आजपासून ३६ तासांचं उपोषण करणार
आहेत. कामाचे जादा तास आणि कामाचे असुरक्षित वातावरण याकडे सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी
हे आंदोलन केलं जाणार आहे. कामावर असताना तसंच काम संपवल्यानंतरही हे आंदोलन सुरू राहणार
आहे.
****
राज्यातल्या खाजगी सुरक्षा रक्षकांची नोंदणी सुरक्षा रक्षक
मंडळात होणं आवश्यक असून सर्व खाजगी सुरक्षा रक्षकांनी सुरक्षा रक्षक मंडळात नोंदणी
करावी, असं आवाहन कामगारमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी केलं. मंत्रालयात महाराष्ट्र
राज्य सुरक्षा रक्षक सल्लागार समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. सुरक्षा रक्षकाची
अंमलबजावणी यंत्रणा सक्षम करण्याचा राज्य प्रयत्न आहे, असं निलंगेकर यावेळी म्हणाले.
****
राज्य शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या
वतीनं दिव्यांग व्यक्तींसाठीच्या धोरणाचा मसुदा तयार करण्यात आला आहे. हा मसूदा सामाजिक
न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून, दिव्यांग क्षेत्रात काम
करणाऱ्या व्यक्ती, संस्था, तसंच जनतेकडून या मसूद्यावर सूचना, अभिप्राय मागवण्यात आले
आहेत. संबंधितांनी आपल्या सूचना २३ मे पर्यंत पाठवाव्यात, असं आवाहन करण्यात आलं आहे.
****
चीन
मधल्या जिन्हुआ इथं होत असलेल्या आशियाई ग्रां प्री ॲथटेटिक्स स्पर्धेत गोळाफेक प्रकारात
भारतीय ॲथलीट मनप्रीत कौरनं पहिल्या फेरीत सुवर्ण पदक पटकावलं आहे. यासोबतचं मनप्रितनं
येत्या ऑगस्ट महिन्यात लंडन इथं होणार्या ए ए एफ जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत स्थान पक्क
केलं आहे. भारतानं स्पर्धेच्या पहिल्या दिवशी एक सुवर्ण, चार रौप्य आणि दोन कांस्य
पदक मिळवले.
//*****//
No comments:
Post a Comment