आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
३० एप्रिल २०१७ सकाळी १०.०० वाजता
****
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं विद्युत देयकापोटी
जमा केलेली ३३ कोटी २२ लाख रुपयांची रक्कम महावितरणकडे भरणा न केल्यानं महावितरणने
बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे तसंच बँकेच्या दोन अधिकाऱ्यांविरुध्द फसवणूक आणि अपहाराचा
गुन्हा दाखल केला आहे. बँकेनं १ मार्च ते २४ एप्रिल २०१७ या कालावधीत नाशिक आणि मालेगाव
परिमंडळातल्या वीज ग्राहकांकडून ३३ कोटी २२ लाख रूपये जमा केले, मात्र ते महावितरणकडे
हस्तांतरित केले नाहीत.
****
अहमदनगर
जिल्ह्यातल्या निळवंडे धरणाच्या कालव्याचं बांधकाम करण्यासाठी शिर्डीचं साईबाबा संस्थान
विश्वस्त मंडळ, राज्य सरकारला ५०० कोटी रुपये कर्ज देणार आहे. विश्वस्त मंडळाच्या काल
झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचं, मंडळाचे सदस्य सचिन तांबे यांनी पी.टी.आय.
या वृत्तसंस्थेला सांगितलं. राज्य सरकारनं ठराविक कालमर्यादेत ही रक्कम संस्थानला परत
करावी, असं संस्थानकडून सांगण्यात आलं आहे.
****
सेंद्रीय शेतीमाल उत्पादक-ग्राहक जागरुकता अभियानांतर्गत
औरंगाबाद शहरातल्या चेतन ट्रेड सेंटर इथं आज सकाळी ११ वाजता एका चर्चासत्राचं आयोजन
करण्यात आलं आहे. सेंद्रीय शेती करणारे शेतकरी आणि ग्राहक यांच्यासाठी हे आयोजन करण्यात
आलं असल्याचं भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाचे प्रदेश चिटणीस पंजाबराव वडजे यांनी
सांगितलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी ११ वाजता
आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या कार्यक्रमातून श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रम
आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून प्रक्षेपित करण्यात येणार आहे. या कार्यक्रम
शृंखलेचा हा ३१ वा भाग आहे.
//******//
No comments:
Post a Comment