Friday, 28 April 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 28.04.2017....17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 28 April 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २८ एप्रिल २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

राज्यातल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

औरंगाबादचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची मुंबई शहर वाहतूक सह आयुक्तपदी तर मिलिंद भारंबे यांची औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून बदली झाली आहे. तर औरंगाबाद शहर पोलिस उपायुक्तपदी उस्मानाबादच्या अपर पोलिस अधिक्षक दिपाली दाटे यांची नियुक्ती झाली आहे.  

बीड जिल्ह्यातल्या आंबाजोगाईचे अप्पर पोलिस अधिक्षक दीक्षित कुमार अशोक गेडाम यांची सिंधुदुर्गचे पोलिस अधिक्षक बदली झाली असून, त्यांच्या जागी दौंडच्या राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक सातचे समादेशक अजित बोराडे यांची नियुक्ती झाली आहे. माजलगावचे सहाय्यक पोलिस अधिक्षक डॉ. हरी बालाजी एन यांची गडचिरोलीचे अप्पर पोलिस अधिक्षक म्हणून बदली झाली आहे. 

 नांदेडचे अप्पर पोलिस अधिक्षक संदीप डोईफोडे यांची बुलढाणा अपर पोलिस अधिक्षक म्हणून बदली झाली असून, त्यांच्या जागी नागपूरच्या कामठीचे सहाय्यक पोलिस अधिक्षक मंगेश शिंदे यांची नियुक्ती झाली आहे.

जालन्याचे पोलिस अधिक्षक म्हणून पुण्याचे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस अधिक्षक रामनाथ पोकळे यांची नियुक्ती झाली, तर सध्याच्या पोलिस अधिक्षक ज्योती सिंह यांची पुणे शहर पोलिस उपायुक्त म्हणून बदली झाली आहे. तर, अपर पोलिस अधिक्षक राहुल माकणीकर यांची नागपूरच्या पोलिस उपायुक्त पदी बदली झाली आहे. 

****

केंद्रीय राखीव पोलीस दलाचे नवे महासंचालक म्हणून ज्येष्ठ पोलीस अधिकारी आर.आर. भटनागर यांनी आज पदभार स्वीकारला. पूर्वीचे महासंचालक के. दूर्गाप्रसाद या २८ फेब्रुवारीला निवृत्त झाल्यानंतर सुमारे दोन महिने हे पद रिक्त होतं.

****

      कर्जदारांसाठीच्या जोखीम व्यवस्थापन योजनेत एकसंधता आणण्यासाठी मुख्य जोखीम अधिकाऱ्याच्या जबाबदाऱ्या आणि कार्यकाळ निश्चित करण्याची सूचना रिझर्व्ह बँकेनं केली आहे. प्रत्येक बँकेची यासंदर्भातली धोरणं वेगवेगळी आहेत. परंतु कर्जाची परतफेड प्रक्रिया आणि कर्जाच्या जोखमी व्यवस्थापनाविषयी सर्व बँकांचं समान धोरण असावं असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे.

****

अक्षय तृतीया, महात्मा बसवेश्वर जयंती आणि परशुराम जयंती आज सर्वत्र उत्साहात साजरी होत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत सह्याद्री अतिथी गृह इथं महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. बीड जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी, तर औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयात उपायुक्त प्रल्हाद कचरे यांनी महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.

लातूर इथं यानिमित्त मोटर सायलर रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. परशुराम जयंतीनिमित्त औरंगाबाद शहरात मिरवणुक काढण्यात येत आहे. 

****

नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणून अरुण डोंगरे यांनी आज पदभार स्वीकारला. कार्यालयातल्या कर्मचार्यांनी त्यांचं स्वागत केलं. लोकाभिमुख प्रशासनाद्वारे जिल्ह्याचा विकास करण्यावर भर देणार असल्याचं ते यावेळी म्हणाले.

****

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या येरमाळा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र मोताळे यांच्यावर २०१२ मध्ये झालेल्या खुनी हल्ल्याप्रकरणी आरोपीस १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. उस्मानाबाद इथल्या दुसऱ्या अतिरिक्त सत्र न्यायालयानं ही शिक्षा सुनावली. मोक्का प्रकरणातील आरोपी पोपट पवार याला अटक करण्यासाठी मोताळे त्यांच्या घरी गेले असता त्यांच्यावर आरोपीनं हा हल्ला केला होता.

****





औरंगाबाद जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पटसंख्या वाढवण्यासाठी शिक्षकांनी परफॉर्मन्स कार्ड तयार केलं आहे. वाढलेली पटसंख्या, डिजिटायझेशन आणि गुणवत्ता ही कार्डमधली माहिती नवीन प्रवेशासाठी फायदेशीर ठरणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर राजे आर्दड आणि शिक्षणाधिकारी एम के देशमुख यांच्या संकल्पनेतून आगामी शैक्षणिक वर्षात जिल्हा परिषद शाळांचीपटसंख्या वाढावी यासाठी झेडपी शाळांचा सकारात्मक आलेख दर्शवण्यासाठी एक बुकलेट तयार करण्यात येणार आहे. 

****

दिल्ली निवडणुकांत नविन चेहऱ्यांना संधी दिल्यामुळे आपल्याला घवघवीत यश संपादन करता आलं. तसंच हा पॅटर्न आगामी निवडणुकात वापणार असल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम जाजू यांनी दिली. औरंगाबाद इथं ते आज वार्ताहर परिषदेत बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जात,पात, धर्म यांचा विचार न करता विकासाभिमुख राजकारण केलं असल्याचंही ते यावेळी म्हणाले. या वार्ताहर परिषदेला महापौर बापू घडामोडे, डॉक्टर भागवत कराड, माजी आमदार किशनचंद तनवाणी यांच्यासह कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

****

जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रातल्या वरच्या भागातल्या धरणांची क्षमता जास्त असल्यानं जायकवाडी धरणाचं सिंचन क्षेत्र सव्वा लाख हेक्टरनं कमी झालं आहे. त्यामुळे वैतरणेचं जादा पाणी गोदावरीत सोडावं अशी मागणी जलतज्ज्ञ शंकरराव नागरे यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर प्रशासकीय स्तरावर चर्चा करण्यात येत असून, विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर यांनी या मागणीच्या संदर्भात जलतज्ज्ञांची भेट घेवून चर्चा केली.

//*******//

No comments: