Thursday, 27 April 2017

text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 27.04.2017 6.50


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 27 April 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २७ एप्रिल २०१७ सकाळी ६.५० मि.

****

·      कृषी उत्पन्नावर कोणत्याही प्रकारचा कर लावण्याचा विचार नाही - केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली

·      दिव्यांग हक्क कायद्याचं काटेकोरपणे पालन करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे राज्यांना आदेश    

·      नांदेड - हैदराबाद विमानसेवेचा आजपासून शुभारंभ

आणि

·      राज्यातल्या अकरा प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या पुन्हा बदल्या; जी. श्रीकांत - लातूरचे, ए. के. डोंगरे - नांदेडचे तर एम. देवेंदर सिंग - बीडचे जिल्हाधिकारी

****

कृषी उत्पन्नावर कोणत्याही प्रकारचा कर लावण्याचा सरकारचा विचार नाही, असं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केलं आहे. काही ठराविक मर्यादेनंतर कृषी उत्पन्नावर कर लागू करावा, असं नीती आयोगाचे सदस्य बिबेक ओबेरॉय यांनी सुचवलं होतं. त्या पार्श्वभूमीवर सरकारचा तसा कुठलाही विचार नाही, तसंच घटनेमध्येही केंद्राला अशा प्रकारचे कृषी उत्पन्नावर कर लावण्याचे अधिकार नाहीत, असं जेटली यांनी आपल्या ट्वीटर संदेशात म्हटलं आहे.

****

दिव्यांग नागरिकांच्या हक्कांबाबतच्या कायद्याचं सर्व राज्यांनी काटेकोरपणे पालन करावं, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. दिव्यांगांचे हक्क कायदा-२०१६ नुसार, दिव्यांगांसाठीच्या सुविधा पुरवलेल्या आहेत की नाही, याबाबत सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी बारा आठवड्यांच्या आत अहवाल द्यावा, असंही न्यायालयानं म्हटलं आहे. या कायद्यामुळे सर्व राज्य सरकारांची दिव्यांगांसंदर्भातली जबाबदारी वाढली आहे, हे जाणून घेऊन, सर्व राज्यांनी त्याची तत्परतेनं अंमलबजावणी करावी, असंही न्यायालयानं म्हटलं आहे.

****

पालक आणि शिक्षक संघटनांबरोबर चर्चा न करता शाळांनी शुल्क वाढ केल्यास, संबंधित शाळांवर कडक कारवाई करण्याचा इशारा, राज्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिला आहे. तावडे यांच्या उपस्थितीत 'महाकरियर मित्र' या वेब पोर्टल आणि मोबाईल ऍप्लिकेशनचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड इथं काल करण्यात आलं, त्यानंतर तावडे वार्ताहरांशी बोलत होते.

****

पिंपरीमध्ये काल भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीला सुरुवात झाली. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या बैठकीच उद्घाटन झालं.  दोन दिवस चालणाऱ्या या बैठकीसाठी भाजपचे राज्यातले वरिष्ठ नेते, मंत्री, आमदार, खासदार आणि कार्यकर्ते उपस्थित आहेत.

दरम्यान, सर्व विरोधी पक्षांनी काल सकाळपासून चिंचवड रेल्वे स्थानकाजवळ लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची भाजपला आठवण करुन देण्यासाठी 'आश्वासनांची आठवण' नावानं उपोषणाला सुरुवात केली, असल्याचं राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पत्रकात म्हटलं आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज प्रादेशिक जोडणी योजना, ‘उडे देश का आम नागरिक’ अर्थात- ‘उडान’ योजनेअंतर्गत नांदेड - हैदराबाद विमानसेवेचा व्हिडीओलिंकिंगद्वारे हिमाचल प्रदेशातल्या सिमल्यातून शुभारंभ करतील. यासोबतच सिमला - दिल्ली आणि कडप्पा - हैदराबाद विमान सेवेचाही शुभारंभ पंतप्रधानांच्या हस्ते होईल. यानिमित्तानं नांदेड इथं विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून, या कार्यक्रमाला ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

****

मुंबईतले कॉंग्रेसचे नेते गुरुदास कामत यांनी काल पक्षाच्या सरचिटणीस पदासह अन्य पदांचा तडकाफडकी राजीनामा दिला. गेल्या आठवड्यात कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांना पत्र पाठवून सर्व पदांच्या जबाबदाऱ्यांमधून मुक्त करण्याची विनंती केली होती, असं कामत यांनी ट्वीटर वरुन सांगितलं.

****

स्वयंसेवी संस्था आणि त्यांच्या निधी वितरणावर नियंत्रण ठेवणारा कायदा करण्याबाबत  केंद्र सरकारनं आपली भूमिका स्पष्ट करावी,  असे आदेश काल सर्वोच्च न्यायालयानं दिले. स्वयंसेवी संस्थांना लाखो रुपये सरकार देतं, मात्र, त्यांचे हिशोब ठेवले जात नाहीत. यासंदर्भात सहा वर्षांपूर्वी एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे, त्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान हे आदेश न्यायालयानं  दिले. याचिकेची सुनावणी आठ आठवड्यांनंतर ठेवण्यात आली आहे.

****

यावर्षीच्या अखिल भारतीय हिंद केसरी कुस्ती स्पर्धेला आजपासून पुण्यात सुरूवात होत आहे. चार दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत २९ राज्यांमधले दोनशे ऐंशी कुस्तीपटू सहभागी होणार आहेत. या लढतीसाठी महाराष्ट्राकडून अभिजित कटके आणि सागर बिराजदार खेळणार असून, याशिवाय विविध वजन गटांमध्येही स्पर्धा होणार आहेत.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरुन प्रसारित केलं जात आहे, आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

      राज्यातल्या आणखी अकरा प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या काल बदल्या करण्यात आल्या, यात याआधी झालेल्या काही अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये फेरबदल करण्यात आले, यामध्ये जी. श्रीकांत यांची नांदेडची बदली रद्द करून त्यांची आता लातूरचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, ए. के. डोंगरे यांची नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. अभय महाजन यांची बीड जिल्हाधिकारी म्हणून झालेली बदली रद्द करण्यात आली असून त्यांना आता अहमदनगरचे जिल्हाधिकारी म्हणून नेमणूक देण्यात आली आहे. एम. देवेंदर सिंग यांची लातूरची बदली रद्द करुन त्यांना बीडचे जिल्हाधिकारी म्हणून पाठवण्यात आलं आहे.

****

लातूर मुंबई एक्स्प्रेस रेल्वे बिदरपर्यंत वाढवण्यात येऊ नये, अशी मागणी, लातूर एक्स्प्रेस बचाव समितीच्या वतीनं काल करण्यात आली. ही वाढ झाल्यास लातूरच्या प्रवाशांना कमी जागा उपलब्ध होतील, असं कारण देत, या समितीनं ही मागणी रेल्वेच्या सोलापूर विभागाचे विभागीय व्यवस्थापक अजयकुमार दुबे यांच्याकडे केली. यावर ही मागणी रेल्वे मंडळाकडे पाठवण्यात येईल, असं दुबे यांनी आंदोलनकर्त्यांना सांगितलं. ही रेल्वे कायम ठेवून, मुंबई बिदर मार्गासाठी दुसरी नवीन गाडी सुरू करण्याची मागणी, मराठवाडा व्यापारी महासंघानंही केली आहे.

****

      साहित्य, कला, सामाजिक तसंच राजकीय अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सोलापूर विद्यापीठानं माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांना काल डी लिट पदवी देऊन सन्मानित केलं. राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी काल सोलापूर विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात, शिंदे यांना मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन ही पदवी प्रदान केली.

****

संसदेच्या राजभाषा समितीच्या निरीक्षण बैठकीला लातूर इथं कालपासून प्रारंभ झाला. समितीचे संयोजक खासदार डॉक्टर प्रसन्नकुमार पाटसानी यांच्यासह समितीचे सदस्य बैठकीला उपस्थित आहेत.

बैठकीपूर्वी समितीचे संयोजक खासदार डॉ पाटसानी यांच्या हस्ते लातूरच्या रेल्वे स्थानकावरील हिन्दी पुस्तकालय आणि विनोबा भावे वाचनालयाच उद्‌घाटन काल करण्यात आल. खासदार पाटसानी यांनी दूरदर्शन, आकाशवाणी यांच्या वतीनं लावण्यात आलेल्या प्रर्दशनीला भेट देऊन पुस्तकांची पाहणीदेखील केली.

****

गोंदियाजवळ बिरसी विमानतळावर असलेल्या राष्ट्रीय उड्डाण प्रशिक्षण संस्था -एन एफ टी आय चं प्रशिक्षणार्थी विमान काल महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवरील वैनगंगा नदीत कोसळलं. या दुर्घटनेत प्रशिक्षक आणि शिकाऊ वैमानिक तरुणी या दोघांचा जागीच मृत्यु झाला.

****

      शेताचा नकाशा काढून देण्यासाठी पाचशे रूपयांची लाच घेणाऱ्या परभणी जिल्ह्यातल्या मानवत इथल्या भूमी अभिलेख कार्यालयातला आरेखक सुधीर पाठक याला दीड वर्ष कारावसाची शिक्षा परभणीच्या न्यायालयानं सुनावली आहे.

****

येत्या एक मे ला महाराष्ट्र दिनाची शासकीय सुट्टी असल्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय - घाटीचा बाह्यरुग्ण विभाग बंद राहील, असं रुग्णालयाच्या अधिष्ठातांनी कळवलं आहे.

****

बुलडाणा जिल्ह्यामध्ये उष्माघाताचे आतापर्यंत तीन बळी गेले आहेत. खामगाव इथं तापमान ४६ अंश सेल्सिअसच्या वर गेलं असून, या ठिकाणी उष्माघातामुळे २ जणांचा मृत्यु झाला तर जळगाव जामोद इथं एकाचा उष्माघातानं मृत्यू झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

नांदेड ते अजनी ही उन्हाळी विशेष गाडी प्रवाशांच्या कमी प्रतिसादामुळे रद्द करण्यात आल्याचं दक्षिण मध्ये रेल्वे प्रशासनानं कळवलं आहे.

****

राज्य अन्न आयोग स्थापन न केल्याबद्दल तसंच हा आयोग स्थापन केलेल्या राज्यांनी कार्यान्वित न केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्रासहित पाच राज्यांविरुद्ध नाराजी व्यक्त केली असून, देशातल्या दहा राज्यांच्या मुख्य सचिवांना सर्वोच्च न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

दुष्काळग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांना सहाय्य करण्यात यावं, आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार राष्ट्रीय अन्न आयोगाची स्थापना करण्यात यावी, अशा आशयाची याचिका स्वराज अभियान या अशासकीय स्वयंसेवी संघटनेनं न्यायालयात दाखल केली आहे.

//*******//

No comments: