Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date - 29 April 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ एप्रिल २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुस्लीम समुदायाला तीन-तलाक वरून राजकारण न करण्याची
विनंती केली आहे. याबाबत चर्चा सुरू असून हा विषय मुस्लीम समुदायामध्येच चर्चेद्वारे
सोडवण्याबाबत आशावादी असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले. लोक स्वत:हून प्रश्न सोडवण्यास
तयार असल्यास उत्तम आहे, असंही ते म्हणाले. ते आज नवी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत
होते. ‘सर्वांची साथ, सर्वांचा विकास’ हे सरकारचे घोषवाक्य असून सरकार कोणताही भेदभाव
करणार नसल्याचं ते म्हणाले.
****
२०२२ पर्यंत देशामध्ये प्रत्येकाला घर देण्याचे सरकारचे ध्येय असल्याचं प्रतिपादन
केंद्रीय कामगार मंत्री बंडारू दत्तात्रय यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीमध्ये
पत्रकारांशी बोलत होते. कामगार मंत्रालयाने आणि गृहनिर्माण मंत्रालयानं सहकार्याने
नवी विमा योजना आणली असल्याचं ते म्हणाले. या योजनेअंतर्गत कमीत कमी दहा लोक असल्यास
ते सहकार संस्था स्थापन करू शकतात. अशी संस्था प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत दोन
लाख वीस हजार मिळण्यास पात्र असल्याचं दत्तात्रय म्हणाले.
****
आठ ते नऊ लाख नोंदणीकृत कंपन्या कंपनी व्यवहार मंत्रालयाला आयकर विवरण सादर करत
नसल्याचं महसूल सचिव हसमुख अधिया यांनी म्हटलं आहे. या कंपन्यांच्या माध्यमातून पैशाचे
गैरव्यवहार होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. याबाबत कारवाई करण्यासाठी एक चमूची स्थापना
करण्यात आली असून पंतप्रधान कार्यालय गेल्या पंधरा दिवसांपासून या कंपन्यांवर लक्ष
ठेऊन असल्याचं ते म्हणाले.
****
मतदारांनी केलेल्या मतदानाची खात्री होण्यासाठी सप्टेबर २०१८ पर्यंत निवडणूक आयोग
१५ लाख व्हीव्हीपॅट या यंत्रांची खरेदी करणार असल्याचं, मुख्य निवडणूक आयुक्त नसीम
झैदी यांनी म्हटलं आहे. ते चंदीगडमध्ये एका परिसंवादामध्ये बोलत होते. आपण केलेल्या
मतदानाची १०० टक्के मतदारांना खात्री मिळणारा भारत हा जगातील एकमेव देश असेल, असंही
झैदी यावेळी म्हणाले.
****
न्यायालयीन कामकाजाशी संबंधित कर्मचाऱ्यांनी
रोजच्या कामात तंत्रज्ञानाच्या वापरावर भर द्यावा असं आवाहन कायदा मंत्री रविशंकर प्रसाद
यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथं न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या संमेलनात ते आज बोलत होते.
तंत्रज्ञानाच्या वापरामुळं त्वरीत न्यायदानास मदत होईल आणि खटल्यांचा निकाल वेळेत लागू
शकेल असं प्रसाद यावेळी म्हणाले.
****
जागतिक गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्र हे सर्वाधिक पसंतीचे राज्य असून देशात झालेल्या
गुंतवणुकीपैकी अर्धी गुंतवणूक राज्यात झाली असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी काल अलिबाग इथं केलं. रसायनी पाताळगंगा इथं जपानच्या कोकुयो आणि भारताच्या
कॅम्लीन कंपनीच्या संयुक्तरित्या केलेल्या नव्या उत्पादन केंद्राचं उद्घाटन त्यांच्या
हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. ‘मेक इन
महाराष्ट्र’, ‘इज ऑफ डुईंग बिजनेस’ यामुळे राज्यात गुंतवणूक करण्यास अधिक गुंतवणूकदार उत्सुक
आहेत. देशात तसंच राज्यात येणाऱ्या नव्या प्रकल्पांमुळे स्थानिक रोजगार उपलब्ध होत
असल्याचं फडणवीस यावेळी म्हणाले.
****
‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्याकरता १ मे च्या ग्रामसभेत
योजनेच्या शासन निर्णयाचं प्रकट वाचन करण्यासाठी महिला आणि बाल विकास मंत्री पंकजा
मुंडे यांनी राज्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या सरपंचांना पाठवलं आहे. राज्यातील मुलींचा
जन्मदर वाढविणे, लिंग निवडीस प्रतिबंध करणे, मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन देवून
खात्री देणे, मुलींच्या आरोग्याचा दर्जा वाढविणे यासाठी माझी कन्या भाग्यश्री ही योजना
राज्यात राबवण्यात येत आहे.
****
दृष्टीबाधितांच्या पहिल्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचं आयोजन औरंगाबाद इथल्या
एम.जी.एम. क्रीडा संकुलात करण्यात आलं आहे. खासदार चंद्रकांत खैरे, म्हाडाचे मुख्य
कार्यकारी संचालक डॉक्टर अनिल रामोड यांच्या उपस्थितीत या स्पर्धेचं उद्धाटन झालं. राज्यातल्या पाच विभागातले संघ या
स्पर्धेत सहभागी झाले आहेत. एक मे रोजी या स्पर्धेचा अंतिम सामना होणार असून यावेळी बक्षीस वितरण करण्यात
येणार आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या ११ वाजता होणाऱ्या आकाशवाणीवरील ’मन की बात’ या कार्यक्रमामध्ये
श्रोत्यांशी संवाद साधणार आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर
प्रक्षेपित करण्यात येणार आहे. हा या शृंखलेचा ३१ वा भाग आहे.
****
मुंबई-लातूर एक्सप्रेस बिदर पर्यंत वाढवण्याच्या रेल्वे बोर्डाच्या निर्णया विरोधात
लातूर इथं आज रेल्वे बचाव समितीच्या वतीनं गांधी चौकात धरणं आंदोलन करण्यात आलं. यावेळी
संतप्त कार्यकर्त्यानी लातूरचे खासदार डॉ. सुनिल गायकवाड यांच्या पुतळ्याचं दहन केलं.
पोलिसांनी याप्रकरणी पाच कार्यकर्त्यांना अटक केली आहे. लातूर-मुंबई एक्सप्रेस लातूर
स्थानकावर १२ तास थांबुन असते, त्या वेळेमध्ये बिदर, उदगीरच्या प्रवाशांसाठी ही रेल्वे
बिदरपर्यंत वाढवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतला आहे.
****
बीड नगरपरिषदेच्या ७५ सफाई कामगारांनी गेल्या दोन
महिन्यांपासून पगार न मिळाल्यानं आंदोलन सुरू केलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांना लेखी आश्वासन
देवूनही पगार न मिळाल्यानं या कामगारांनी हे आंदोलन केलं आहे.
****
No comments:
Post a Comment