Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 26 April 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६ एप्रिल २०१७ दुपारी १.००वा.
*****
दिल्लीच्या तीन महानगरपालिकांमध्ये
भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळणं निश्चित असल्याचं स्पष्ट होत आहे. हा विजय सुकमाच्या
हुतात्म्यांना समर्पित करत असल्याचं आणि हा विजय समारंभपूर्वक साजरा करणार नसल्याचं
भारतीय जनता पक्षानं म्हटलं आहे. हा इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्रांचा विजय आहे, अशी टीका
आम आदमी पक्षानं केल्यानंतर, केजरीवाल पराजयापासून योग्य तो बोध घेत नाहीत, ही दुःखाची
गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया भाजपनं दिली आहे. स्वराज इंडिया या पक्षाचे नेते योगेंद्र
यादव यांनी, आपण जनादेशाचा सन्मान करत असून, दोषारोप करण्याऐवजी पराभवाचा स्वीकार करायला
हवा, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
हा विजय म्हणजे पंतप्रधानांच्या
विकासाच्या राजकारणावर जनतेनं दाखवलेला विश्वास आहे, अशी प्रतिक्रीया भारतीय जनता पक्षाचे
अध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केली असून, दिल्लीच्या जनतेचे आभार मानले आहेत.
दरम्यान, काँग्रेस नेते
अजय माकन यांनी दिल्ली महानगरपालिका निवडणुकीतल्या काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी
स्वीकारली असून, प्रदेश अध्यक्षपदाचा राजिनामा दिला आहे.
****
दिव्यांग नागरिकांच्या
हक्कांबाबतच्या कायद्याचं सर्व राज्यांनी अतिशय काटेकोरपणे पालन करावे, असं सर्वोच्च
न्यायालयानं म्हटलं आहे. दिव्यांगांचे हक्क कायदा-२०१६ नुसार, दिव्यांगांसाठीच्या सुविधा
पुरवलेल्या आहेत की नाही, याबाबत सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांनी बारा आठवड्यांच्या
आत अहवाल द्यावा, असंही न्यायालयानं म्हटलं आहे. या कायद्यामुळे सर्व राज्यसरकारांची
दिव्यांगांसंदर्भातली जबाबदारी वाढली आहे, हे जाणून घेऊन, सर्व राज्यांनी त्याची तत्परतेनं
अंमलबजावणी करावी, असंही न्यायालयानं म्हटलं आहे.
****
उपराष्ट्रपती मोहम्मद
हामीद अन्सारी हे आर्मेनियाच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर असून, ते आज तिथल्या येरेवान
विद्यापीठात व्याख्यान देणार आहेत. ते तिथल्या विद्यार्थ्यांशी संवादही साधणार आहेत.
उपराष्ट्रपतींच्या या दौऱ्यात भारत आणि आर्मेनिया दरम्यान विविध क्षेत्रातल्या सहकार्यासंदर्भात
महत्वाचे सामंजस्य करार करण्यात आले.
****
कृषी उत्पन्नावर कर
लावण्याचा केंद्र सरकारचा विचार नसल्याचं केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी स्पष्ट
केलं आहे. नीती आयोगाच्या ‘कृषी उत्पन्नावर आयकर’या शीर्षकाच्या एका अहवालावर प्रतिक्रिया
देताना त्यांनी ही बाब स्पष्ट केली आहे.
****
शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी
केंद्र सरकार कृषी क्षेत्राला जास्तीत जास्त निधीद्वारे प्राधान्य देत असल्याचं केंद्रीय
कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्ली इथं एका राष्ट्रीय परिषदेत
बोलत होते. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासंदर्भात राज्य सरकारांना
आखणी करण्यास सांगण्यात आल्याचं सिंह यांनी सांगितलं. अन्नधान्याच्या उत्पादनात या
वर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे आठ टक्के वाढ अपेक्षित आहे, असंही सिंह यांनी
यावेळी सांगितलं.
****
शाळांनी स्पर्धेपोटी
विद्यार्थ्यांना अवाजवी जास्तीच्या श्रेणी किंवा गुण देण्याच्या ऐवजी त्यांच्या वास्तविक
आणि योग्य श्रेणी द्याव्यात, असं प्रतिपादन मनुषयबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी
केलं आहे. राज्य शिक्षण मंडळांनीही गुणांची ही अनावश्यक स्पर्धा कमी करण्याचा प्रयत्न
करावा, असं त्यांनी म्हटलं आहे. सर्व राज्य शिक्षण मंडळांनी यावर विचार करून निर्णय
घ्यावा असं जावडेकर यांनी म्हटलं आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं, विद्यार्थ्यांना
ग्रेस गुण देण्यासंदर्भातला नियम नुकताच बदलला आहे.
****
सरकारच्या अटल पेन्शन
या सामाजिक सुरक्षा योजनेचे लाभार्थी आता त्यांचे या योजनेचे व्यवहार ऑनलाईन पाहू शकणार
आहेत. अटल पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांना डिजिटली सक्षम करण्यासाठी आणि या योजनेची
कार्यप्रणाली सुधारण्यासाठी वित्तमंत्रालयानं काल ही सुविधा सुरू केली आहे. २०१५ मध्ये
सुरू झालेल्या या योजनेचे सुमारे ४५ लाख लाभार्थी असून दररोज त्यात दहा ते पंधरा हजार
लोकांची भर पडत असल्याचं या वृत्तात म्हटलं आहे.
****
महाराष्ट्र राज्याला
भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ व्हावी, या उद्देशानं महाराष्ट्र पर्यटन विकास
महामंडळानं इत्तिहाद आणि जेट एअरवेज या विमान कंपन्यांशी सामंजस्य करार केल्याची माहिती
दिली आहे. या करारानुसार, या विमानकंपन्या त्यांच्या प्रवाशांना महाराष्ट्रातल्या विविध
पर्यटनस्थळांची माहिती देणार आहेत.
****
गोंदिया इथल्या बिरसी
विमानतळावरच्या राजीव गांधी विमान प्रशिक्षण केंद्रातल्या एका प्रशिक्षणार्थी विमानाला
अपघात होऊन दोन वैमानिकांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. आज सकाळी उड्डाण केल्यानंतर
काही वेळातच हे विमान नदीमध्ये कोसळलं.
//******//
No comments:
Post a Comment