Friday, 21 April 2017

text- AIR News Bulletin, Aurangabad 21.04.2017 6.50am


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 21 April 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २१ एप्रिल २०१७ सकाळी ६.५० मि.

****

·      देशातल्या १० नाविन्यपूर्ण प्रकल्पांमध्ये ‘मागेल त्याला शेततळं’ या प्रकल्पाचा समावेश

·      ‘शहरात प्रत्येकाला घर’ देण्यासाठी राज्यांनी सहकार्य करण्याचं केंद्र सरकारचं आवाहन

·      उस्मानाबाद इथं आजपासून ९७ व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाला प्रारंभ

आणि

·      परभणी आणि लातूर महानगरपालिका निवडणूक मतदानाची आज मतमोजणी

****

देशातल्या १० नाविन्यपूर्ण प्रकल्पांमध्ये महाराष्ट्राचा महत्वाकांक्षी प्रकल्प ‘मागेल त्याला शेततळं’ या प्रकल्पाची निवड करण्यात आली आहे. नवी दिल्ली इथं ११ व्या नागरी सेवा दिनाच्या मुख्य कार्यक्रमाचं आज आयोजन करण्यात आलं असून, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते काल या दोन दिवसाच्या समारंभाचं उद्घाटन करण्यात आलं. देशातील नाविन्यपूर्ण अशा विविध प्रकल्पांची पुस्तिका तयार करण्यात आली आहे. या पुस्तिकेचं विमोचन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज केलं जाणार आहे.

राज्यात  आजपर्यंत ३० हजार शेततळी पूर्ण करण्यात आली आहेत. यासाठी राज्य शासनानं १२० कोटी रूपये खर्च केले आहेत. मराठवाडा, आणि विदर्भात मोठ्या प्रमाणात शेततळी तयार करण्यात आली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशातल्या ५ लाख शेततळ्यांपैकी १ लाख शेततळी एकट्या महाराष्ट्रात पूर्ण करण्याचं उदिष्ट्य ठेवलं आहे.

दरम्यान, या अकराव्या नागरी सेवा दिनाचं उद्घाटन करतांना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी नागरी सेवेतल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचं आवाहन केलं. देशाच्या आणि जनतेच्या हिताच्या आधारे निर्णय घेतले जावे, तसंच नियम तयार करताना तो लोकांना उपयुक्त कसा राहील याचा विचार करावा, असं ते म्हणाले. नागरी सेवेत अधिकार मिळतात, मात्र त्याचबरोबर जबाबदारी आणि दायित्वही येत असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

‘शहरात प्रत्येकाला घर’ या योजनेसमोर अनेक आव्हानं असून, ही योजना पूर्ण करण्यासाठी राज्यांनी सहकार्य करावं, असं आवाहन केंद्रीय नगर विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे. ते काल नवी दिल्लीत वार्ताहरांशी  बोलत होते. प्रत्येकाचं स्वतःच्या घराचं स्वप्न साकार करण्यास केंद्र सरकार बांधील असल्याचं नायडू म्हणाले. देशातल्या दोन हजार आठ शहरांमध्ये प्रधान मंत्री आवास योजने अंतर्गत १७ कोटी ७३ लाख परवडणारी घरं बांधण्यास सरकारनं मंजूरी दिली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. राष्ट्रीय नागरी भाडे तत्वावर घरं देण्यासंबधीचं धोरण तयार करण्यात आलं असून, लवकरच ते केंद्रीय मंत्री मंडळासमोर मंजूरीसाठी ठेवलं जाईल, असं ते म्हणाले.

****

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ- सी बी एस ई नं शैक्षणिक संस्थांना पुस्तके, गणवेश आणि अन्य शालेय साहित्य विकण्यास विरोध केला आहे. शैक्षणिक संस्था या व्यवसायिक आस्थापना नसून, त्यांनी पुस्तके, गणवेश आणि अन्य शालेय साहित्य विकणं हे नियमांच्या विरुद्ध असल्याचं, मंडळानं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. शाळांकडून अशा प्रकारचे साहित्य विकण्यात येत असल्याच्या तक्रारी, काही पालकांनी केल्याच्या पार्श्चभूमीवर सी बी एस ईनं हे परिपत्रक जारी केलं आहे. शैक्षणिक संस्थांनी हे बेकायदेशीर कार्य थांबवून उत्तम दर्जाचं शिक्षण देण्यावर भर द्यावा, असं आवाहन या पत्रकाद्वारे करण्यात आलं आहे.  

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ३० एप्रिल रोजी आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा ३१ वा भाग असणार आहे. या कार्यक्रमासाठी नागरिकांना एक नऊ दोन दोन या दूरध्वनी क्रमांकावर किंवा माय जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळाद्वारे आपले विचार मांडता येतील.

****

आदर्श गृहनिर्माण संस्था घोटाळ्यातील आरोपी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याविरूद्ध खटला चालवण्यास राज्यपालांनी दिलेल्या परवानगीमागे कुठलाही राजकीय हेतू नाही तसंच परवानगीचा निर्णय बेकायदाही नाही, असा दावा राज्य सरकारनं प्रतिज्ञापत्राद्वारे मुंबई उच्च न्यायालयात केला आहे. राज्यपालांच्या निर्णयाच्या विरोधात चव्हाण यांनी याचिका दाखल केली आहे. या याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं सरकारला चव्हाण यांच्याविरूद्ध अगोदर खटला चालवण्यास परवानगी नाकारण्यासंदर्भात आपलं म्हणणं सादर करण्यास सांगितलं होतं.

****

शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या मागणीसाठी आमदार बच्च कडू यांनी काढलेल्या आसूड यात्रेला काल नंदूरबार जिल्ह्यात नवापूर इथल्या पथकर नाक्यावर रोखण्यात आलं. ही यात्रा गुजरातमध्ये प्रवेश करणार होती. गुजरात सीमेवर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरुन प्रसारित केलं जात आहे, आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

उस्मानाबाद इथं आजपासून ९७ व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाला प्रारंभ होत आहे. जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होत आहे. 

या नाट्यसंमेलनात एकपात्री महोत्सव, विविध नाटक, प्रकट मुलाखत, गोंधळ, आणि स्थानिक लोककलांचं सादरीकरण होणार आहे. संमेलनाविषयी अधिक माहिती देत आहेत, आमचे वार्ताहर…

उस्मानाबाद इथल्या तुळजाभवानी क्रिडा संकुलात सुलभा देशपांडे नाट्य नगरीत हे संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. आज नाट्यदिंडीनं या नाट्यसंमेलनाची सुरूवात होणार आहे. या नाट्यदिंडीस स्थानिक, पारंपारिक कलाकार, नाट्य रसिक तसंच नाट्यकलाकार सहभागी होत आहेत. तुळजाभवानी क्रिडा संकुलातील राजाराम शिंदे रंगमंचावर नाट्यसंमेलनाचं औपचारिक उद्घाटन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री श्री विनोद तावडे, पालकमंत्री दिवाकर रावते, सहपालकमंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते होत आहे. आपलं गाव आपलं संमेलन या घोषवाक्यानुसार हे संमेलन उस्मानाबाद करांचं व्हावं, असा प्रयत्न असल्याचं स्वागताध्यक्ष आमदार सुजितसिंह ठाकुर यांनी सांगितलं.

****

लातूर, परभणी आणि चंद्रपूर महापालिकांसाठीची मतमोजणी आज होणार आहे. मतमोजणीची तयारी पूर्ण झालेली असून, या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. परभणी महानगरपालिकेसाठी ६५ टक्के तर लातूर महानगरपालिकेसाठी ६२ टक्के मतदान झालं होतं. रभणीत ६५ जागांसाठी ४१८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. लातूर महानगरपालिकेत १८ प्रभागातून ७० नगरसेवकांची निवड केली जाणार आहे. 

****

राज्य लोकसेवा हक्क कायद्यात एखाद्याला सेवा नाकारली तर त्याची सबळ कारणे द्यावे लागतील, असं राज्य सेवा हक्क आयोगाचे आयुक्त स्वाधिन क्षत्रिय यांनी सांगितलं. राज्य लोकसेवा हक्क कायद्याच्या कामकाजासंदर्भात काल औरंगाबाद इथं कार्यशाळा घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. सेवा नाकारली तर संबंधितांना त्याविरोधात अपिलही करता येईल, असं ते म्हणाले. या कायद्यातर्गंत दोषी अधिकारी - कर्मचाऱ्यांना दंड करण्याचा आयोगाला अधिकार असल्याचं क्षत्रिय म्हणाले. या कायद्याची जनतेला महिती देण्यासाठी ‘आपले सरकार’ हे संकेतस्थळ सुरु करण्यात आलं असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

****

औरंगाबाद शहरातल्या बीड बायपास रस्त्यावरून दुपारी १२ ते चार वाजेदरम्यान जड वाहनांना वाहतुकीसाठी परवानगी देण्याचा निर्णय पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून या रस्त्यावर वाढलेले अपघात लक्षात घेऊन, जड वाहतुकीसाठी हा रस्ता बंद करण्याचा निर्णय पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी अलिकडेच घेतला होता. त्यामुळे जड वाहतूक करणाऱ्या वाहतुकदारांची मोठी अडचण झाली होती. या पार्श्वभूमीवर काल पोलिस आयुक्त आणि औरंगाबाद शहरातल्या ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली, या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

****

औरंगाबाद शहरामधल्या देवानगरी भागातल्या नागरिक आणि महिलांनी पाण्यासाठी महानगरपालिकेच्या कार्यालयावर काल हंडा मोर्चा काढला. गेल्या काही दिवसांपासून शहरातला पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यानं या भागातल्या पाणीपुरवठ्यावर परीणाम झाला आहे.

दरम्यान, महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेतही काल नगरसेवकांनी पाणीपुरवठ्याचा प्रश्न उपस्थित केला. पैठणहून औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन सतत फुटत असल्यामुळे शहरातले पाणीपुरवठ्याचं वेळापत्रक विस्कळीत झालं आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेवकांनी पाणी प्रश्नावर सर्वसाधारण सभेत आक्रमक भूमिका घेत प्रशासनावर टीका केली.

****

औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड तालुक्यातल्या मौजे ताडपिंपळगाव आणि मौजे देभेगाव इथल्या तात्पुरत्या पाणी पुरवठा योजनेला मान्यता देण्यात आली आहे. यासाठी ५२ लाख रुपय निधी मंजर करण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला.

****

लातूरचे निवासी उपजिल्हाधिकारी नारायण उबाळे यांचे काल पुण्यात निधन झालं, कर्करोगानं आजारी असलेले उबाळे गेल्या काही दिवसांपासून पुण्यातल्या दिनानाथ मंगेशकर रूग्णालयात उपचार घेत होते. उपचारादरम्यान काल त्यांचं निधन झालं. बीड जिल्ह्यातल्या जिरेवाडी या त्यांच्या मूळ गावी आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

****

दलित चळवळीतले लेखक, संशोधक आणि नाटककार डॉ. रामनाथ चव्हाण यांचं काल पुणे इथं निधन झालं. कर्करोगामुळे ते आजारी होते. काल सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

//*****//

No comments: