Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29 April 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ एप्रिल २०१७ दुपारी १.००वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १२व्या शतकातील
समाज सुधारक बसवेश्वर आणि २३ भाषांमधील इतर संतांच्या भाषांतरीत केलेल्या ’वचन’ या
ग्रंथाचं प्रकाशन आज नवी दिल्लीमध्ये करण्यात आलं. महात्मा बसवेश्वर यांच्या सुवर्ण
जयंती समारोहाच्या उद्घाटनप्रसंगी हे प्रकाशन करण्यात आलं. यावेळी बोलतांना पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी भगवान बसवेश्वर यांनी लोकशाही व्यवस्था विकसित केली असून, महिला
सक्षमीकरणासाठी त्यांनी महान कार्य केले असल्याचं ते म्हणाले. मुस्लीम समाजातील महिला
तीन तलाक पद्धत बंद करण्याचं आवाहन करत असून, त्याबाबत राजकारण करण्यात येऊ नये, असंही
ते यावेळी म्हणाले. राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या या पहिल्या समारोहामध्ये महात्मा बसवेश्वर
यांच्या कार्याचे डिजिटल स्वरुपात देखील यावेळी प्रकाशन करण्यात आले.
****
गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सुकमामध्ये सैन्यावर
झालेल्या नक्षली हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माहिती दिली.
नक्षली हल्ल्यानंतर करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती पंतप्रधान मोदी यांना देण्यात
आली. सिंह यांनी यावेळी जम्मू काश्मीरमध्ये विकासकामासाठी देण्यात आलेल्या ८० हजार
कोटी रुपयांच्या पॅकेजबाबतही माहिती दिली. या पॅकेजअंतर्गत जम्मू काश्मीर सरकारला आतापर्यंत
१९ हजार कोटी रुपये देण्यात आले आहेत.
****
भारतीय
तंत्रज्ञान संस्था अर्थात आय आय टी शिक्षण संस्थांमधून होणाऱ्या आत्महत्या हा चिंतेचा
विषय असून, या संस्थांच्या आवारात वैद्यकीय कल्याण केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात
आल्याचं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल मुंबईत सांगितलं.
त्याचप्रमाणे नव्याने दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्यासाठी
अभिमुखता कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येईल, असंही जावडेकर पुढे म्हणाले. या संस्थेतील
मुलींची संख्या वाढवून २० टक्क्यांवर नेण्याच्या दृष्टीनं संस्थेत काही अतिरिक्त जागा
वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं जावडेकर यांनी सांगितलं.
****
एचआयव्ही
एड्स बाधीत रूग्णांच्या चिकित्सा आणि उपचारासाठी एका नवीन सुधारित धोरणाची सुरूवात
काल केंद्रीय स्वास्थ्य मंत्री जे.पी. नड्डा यांच्या हस्ते करण्यात आली. यामुळे एचआयव्ही
बाधीत रूग्णांना अँटी रेट्रोवायरल- ए आर टी उपचार मोफत दिला जाईल असं सांगून या केंद्र
पुरस्कृत योजनेचा फायदा या रूग्णांना होईल असं ते म्हणाले. यावेळी एचआयव्ही बाधीतांसाठी
काम करणाऱ्या आणि जनजागृती करणाऱ्या कार्यकर्त्यांना त्यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात
आलं.
****
टपाल विभाग आणि भारत संचार निगम लिमिटेड - बी एस एन
एल ने एक सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या असून, या अंतर्गत ग्रामीण भागातील टपाल
कार्यालयात ब्रॉडबँड सेवा पुरवण्यात येणार आहे. याअंतर्गत देशातल्या ग्रामीण भागामध्ये
सुमारे एक लाख ५५ हजार टपाल कार्यालयं ब्रॉडबँड
सेवेनं जोडण्यात येणार आहे. याबाबत बोलतांना दूरसंचारमंत्री मनोज सिन्हा यांनी पहिल्या
फेरीमध्ये एक लाख ग्रामपंचायत कार्यालयांना ब्रॉडबँड सेवेची जोडणी लवकरच पूर्ण होणं
अपेक्षित असल्याचं सांगितलं.
****
बँका
खराब झालेल्या किंवा लिहिलेल्या नोटा स्विकारण्यास नकार देऊ शकत नाही असं रिझर्व्ह
बँक ऑफ इंडियानं स्पष्ट केलं आहे. अशा नोटांना बाद झालेल्या नोटा ग्राह्य न धरता यावर
तोडगा काढावा असंही आरबीआयनं सांगितलं आहे. रिझर्व्ह बँकेकडं गेल्या काही दिवसांत बँका
रंग उडालेल्या तसंच ज्यांच्यावर काही लिहिलं आहे, अशा नोटा स्वीकारत नसल्याच्या तक्रारी
येत होत्या. यामध्ये खासकरुन ५०० आणि २००० च्या नोटांचा समावेश होता. यानंतर आरबीआयनं
परिपत्रक काढत बँकांना या नोटा स्विकारण्याचा आदेश दिला आहे.
****
भाजप अध्यक्ष अमित शाह हे ९५ दिवसांच्या देशव्यापी
दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी ते २०१९ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका जिंकण्यासाठी
तसंच २०१४ मध्ये ज्या १२० जागांवर भाजपचा पराभव झाला त्या जिंकण्यासाठीची रणनीती तयार
करण्यात येणार आहे. या दौऱ्याचा भाग म्हणून ते आज जम्मू काश्मीरमध्ये पोहचणार आहेत.
शाह हे प्रत्येक राज्यामध्ये एक ते तीन दिवस थांबणार असून पक्षाची संघटनात्मक बलस्थानं
आणि दुव्यांचा आढावा यावेळी ते घेणार आहेत.
****
आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना दैनंदिन गरजांसाठी
लागणारी रक्कम त्यांच्या खात्यात परस्पर जमा करण्याचा निर्णय काल राज्य सरकारतर्फे
घेण्यात आला. शालेय साहित्य खरेदीत होणाऱ्या भ्रष्टाचाराला आळा घालणं हा या मागचा मुख्य
उद्देश आहे. या योजनेनुसार पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना वार्षिक साडेसात
हजार रूपये, पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांना साडे आठ हजार रूपये तर, दहावी ते बारावीतील
विद्यार्थी वार्षिक साडेनऊ हजार रूपये मिळण्यास पात्र असतील. येत्या शैक्षणिक वर्षापासून,
राज्य सरकार द्वारे संचालित १३३ आश्रम शाळांतून प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम राबवण्यात
येणार आहे.
//*****//
No comments:
Post a Comment