आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
२६ एप्रिल २०१७ सकाळी १०.०० वाजता
****
दिल्ली
महानगरपालिंकांच्या निवडणुकांची मतमोजणी आज सकाळी आठ वाजल्यापासून सुरू झाली आहे. उत्तर
दिल्ली, दक्षिण दिल्ली आणि पूर्व दिल्ली या तीन महानगरपालिकांच्या दोनशे सत्तर प्रभागांसाठी
गेल्या रविवारी मतदान झालं होतं.
मतमोजणीच्या
आतापर्यंत आलेल्या वृत्तांनुसार भाजपानं तीनही महानगरपालिकांमध्ये आघाडी घेतली आहे.
दक्षिण दिल्लीमध्ये भाजप ४९ तर काँग्रेस १३ आणि आम आदमी पक्ष १७ जागांवर आघाडीवर आहेत.
उत्तर दिल्लीत भाजप ५१, काँग्रेस ५ आणि आप १८ जागांवर तर पूर्व दिल्लीत भाजप ३६ जागांवर
आणि काँग्रेस आणि आप प्रत्येकी पाच जागांवर आघाडीवर असल्याचं वृत्त आहे.
****
राष्ट्रपती
प्रणव मुखर्जी आज हैद्राबाद इथल्या उस्मानिया विद्यापीठाच्या शतकपूर्ती समारंभाचं उद्घाटन
करणार आहेत. हैदराबाद इथल्या इंग्लीश आणि परदेशी भाषा विद्यापीठाचा पहिला दीक्षांत
समारंभही राष्ट्रपतींच्या उपस्थितीत होणार आहे.
उस्मानिया
विद्यापीठ हे देशातल्या सर्वात जुन्या विद्यापीठांपैकी एक असून, साडेपाच लाख विद्यार्थी
आणि एक हजारहून अधिक संलग्न विद्यापीठं असलेली ही आशियातली सर्वात मोठी शैक्षणिक संस्था
आहे.
****
अण्णाद्रमुक
पक्षाचे नेते टी टी व्ही दिनाकरन यांना काल मध्यरात्री दिल्ली पोलिसांनी अटक केली.
निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याला लाच देऊ केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली. त्यांना
आज दिल्ली न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.
****
श्रीलंकेचे
पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत द्विपक्षीय बैठक
करणार आहेत. प्रस्तावित आर्थिक आणि तंत्रज्ञान सहकार्य करार, त्रिंकोमाली बंदराचा विकास
आणि दोन्ही देशांच्या मच्छिमारांसंदर्भातला प्रश्न या विषयांवर या बैठकीत चर्चा होईल,
अशी शक्यता आहे.
//*****//
No comments:
Post a Comment