Sunday, 30 April 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 30.04.2017 - 05.25pm


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 30 April 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० एप्रिल २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीपासून देशभरातल्या सर्व विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका एकाचवेळी घ्याव्यात असं, नीति आयोगानं केंद्र सरकारला सुचवलं आहे. या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणावर खर्चात बचत होईल, त्याबरोबरच वेळ आणि मनुष्यबळाचीही बचत होईल, असं आयोगानं म्हटलं आहे. २०२४ मध्ये एकत्रित निवडणुकांचा निर्णय घेतल्यास, काही विधानसभांचा कार्यकाळ वेळपूर्वीच संपवावा लागेल, तर काही विधानसभांचा कार्यकाळ लांबवावा लागेल, असं आयोगानं म्हटलं आहे.

****

येत्या पाच मे रोजी भारतीय अवकाश संशोधन संस्था दक्षिण आशिया उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करणार आहे. सार्क देशांच्या समूहातल्या पाकिस्तान वगळता, इतर सात देशांचा या प्रकल्पात सहभाग आहे. दक्षिण आशियाचे आर्थिक तसंच विकास विषयक प्राधान्यक्रम पूर्ण करण्यात हा उपग्रह सहायक ठरणार असल्याचा विश्वास, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात या कार्यक्रमातून व्यक्त केला.

****

मन की बात या कार्यक्रमावर माहिती प्रसारण मंत्रालयाच्या अहमदनगर क्षेत्रीय प्रचार कार्यालयानं आज विशेष चर्चासत्र आयोजित केलं होतं. अहमदनगर जिल्ह्यात पिंपळगाव माळवी इथं ग्रामस्थांनी हा कार्यक्रम एकत्रित पणे ऐकून, त्यावर सविस्तर चर्चा केली. देशाच्या सर्वांगीण विकासासोबतच शेतमालाला उत्पादनखर्चावर आधारित भाव द्यावा, ग्रामीण विकासावर अधिक भर द्यावा, अशा मागण्या ग्रामस्थांनी केल्या.

****

तेजस ही सर्व अद्ययावत सुविधांनी सुसज्ज रेल्वे गाडी येत्या जून महिन्यापासून मुंबई गोवा मार्गावर धावणार आहे. स्वयंचलित दरवाजे, चहा कॉफीची यंत्रं, स्वतंत्र एलसीडी स्क्रीन, अत्याधुनिक स्वच्छतागृहं, आदी सुविधा असलेली ही रेल्वे यंदाच्या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आली होती. गंतव्य स्थानकांची माहिती देणारे डिजिटल तसंच ब्रेल लिपीतले फलक, इलेक्ट्रॉनिक आरक्षण तक्ते, आदी सुविधाही या गाडीत असतील. मुंबई गोवा मार्गापाठोपाठ दिल्ली चंदीगड या मार्गावरही ही रेल्वे चालवली जाणार आहे.

****

हवामान विषयक अचूक पूर्वमाहितीमुळे शेतीचे नियोजन सुलभ होणार असून हा प्रकल्प शेतकऱ्यांना समृध्दीकडे नेणारा असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. नागपूर जिल्ह्यातील डोंगरगाव इथं महावेधप्रकल्पांतर्गत पहिल्या स्वयंचलित हवामान केंद्राचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. राज्यातल्या सर्व दोन हजार ६५ महसूल मंडळात स्वयंचलित हवामान केंद्रं उभारण्यात येणार असून येत्या महिन्याभरात एक हजार केंद्रं तर जूनअखेर ही सर्व केंद्र सुरू होणार आहेत. या हवामान केंद्रामुळे १४४ चौरस किलोमीटर परिसरातील हवामानाची अचूक नोंद दर दहा मिनिटांनी उपलब्ध होणार आहे.

जलयुक्त शिवार योजनेच्या यशामुळे राज्यात यंदा २०लाख टन तुरीचं उत्पादन झालं, गेल्या पंधरा वर्षातील सर्वाधिक तूर खरेदी राज्य सरकारनं केली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांच्या नावावर व्यापाऱ्यांची तूर खरेदी केली जाणार नाही, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

****

कृषी क्षेत्रासंबंधी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देत, शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वछता मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात एका प्रसिद्धीपत्रकात त्यांनी जालना जिल्ह्यातील विविध योजनांची माहिती दिली. शेतकऱ्यांना उत्पादन खर्च तसंच पीक कर्जापेक्षा अधिक उत्पन्न खात्रीशीरपणे मिळावं हा या वर्षीच्या नियोजनाचा मुख्य उद्देश असल्याचं त्यांनी या पत्रकात नमूद केलं आहे. जालना जिल्ह्यात ९ हजार ६०२ शेतकऱ्यांना शेततळे मंजूर करण्यात आले असून जालना इथं ५ कोटी ८२ लाख रुपये निधी मंजूरीसह रेशीम संकलन केंद्रासही केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिल्याचं लोणीकर यांनी सांगितलं आहे.

****

नाशिक जिल्ह्यात चांदवड तसंच मालेगांव परिसरात आज दुपारच्या सुमारास अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. जोरदार पावसाच्या माऱ्यामुळे या भागातल्या कांदा तसंच द्रा़क्ष पिकांचे नुकसान झाल्याची भीती वर्तवली जात आहे.

****

नांदेड जिल्ह्यात नायगाव शहरात आज दुपारी कापसाची वाहतूक करणाऱ्या एका ट्रकला अचानक आग लागली. ग्रामीण रुग्णालयासमोर मुख्य रस्त्यावर ही घटना घडल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.

****

No comments: