Sunday, 23 April 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 23.04.2017 - 05.25pm


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 23 April 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २३ एप्रिल २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

देशातली सर्व राज्य सरकारं आणि त्यांचे मुख्यमंत्री मिळून प्रयत्न करतील, तेव्हाच नव्या भारताचे स्वप्न साकार होईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं नीति आयोगाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत ते आज बोलत होते. देशाचा नियोजनबद्ध आणि वेगानं विकास घडवून आणण्यासाठी १५ वर्षांचा आराखडा यावेळी सादर करण्यात आला. राज्यांनी भांडवल खर्च आणि पायाभूत सुविधांच्या निर्मितीची गती वाढवावी, असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं.   

****

मंत्रालयं तसंच सर्व सरकारी विभागांनी, वयाची साठ वर्ष पूर्ण केलेल्या नागरिकांना ज्येष्ठ नागरिक मानावं, असं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. मंत्रालयं तसंच विविध विभागांच्या ज्येष्ठ नागरिक सुविधांसाठीच्या वयोमर्यादेत भिन्नता आढळली आहे. या निकषात साम्य असावं, यासाठी सामाजिक न्याय मंत्रालय, 'ज्येष्ठ नागरिक कल्याण आणि देखभाल' कायद्यात सुधारणेचा विचार करत असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. खासगी संस्थांनीही याच वयोमर्यादेचं पालन करावं, असं केंद्र सरकारनं म्हटलं आहे.

****

पासपोर्ट अर्थात पारपत्रासाठी आता हिंदी भाषेतूनही ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.  परराष्ट्र मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली. संसदीय समितीनं याबाबत सुचवलेल्या शिफारशींना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मान्यता दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. पारपत्रासाठीचे अर्ज इंग्रजीसोबत हिंदी भाषेत उपलब्ध करून द्यावेत, तसंच पारपत्रावर मजकूरही दोन्ही भाषेत असावा, आदी शिफारशी या समितीनं केल्या आहेत.

****

सरकार प्रादेशिक भाषिकांवर हिंदी भाषा बोलण्याची सक्ती करत असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी फेटाळून लावला आहे. ते आज चेन्नई इथं एका कार्यक्रमानंतर वार्ताहरांशी बोलत होते. हिंदी शिकणं ही प्रत्येकाची वैयक्तिक आवड असून, सरकार कोणतीही सक्ती करणार नसल्याचं ते म्हणाले.

****

निवडणूक आयोगानं इलेक्ट्रॉनिक्स कार्पोरेशन ऑफ इंडिया आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या दोन कंपन्यांकडे सोळा लाख व्हीव्हीपॅट यंत्रांची मागणी नोंदवली आहे. २०१७-१८ आणि २०१८-१९ या दोन वर्षांत होणाऱ्या निवडणुकांसाठी या यंत्रांची आवश्यकता असल्याचं आयोगानं म्हटलं आहे. या दोन्ही कंपन्यांकडून आयोग प्रत्येक आठ लाख साडे सात हजार व्हीव्हीपॅट यंत्र खरेदी करणार आहे.

****

सरकारनं यावर्षीपासून पीक पेरणी क्षेत्राचा ४० टक्के भाग पीक विमा योजनेच्या कक्षेत आणण्याचं उद्दीष्ट निर्धारित केलं आहे. कृषी मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्यानं पीटीआयला ही माहिती दिली. पंतप्रधान पीक विमा योजनेला पहिल्या वर्षात चांगला प्रतिसाद मिळाला असून, २०१७ -१८ या आर्थिक वर्षात सात कोटी ७६ लाख हेक्टर क्षेत्र या योजनेअंतर्गत आणणार असल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.  

****

सहकार क्षेत्रानं शेतकऱ्यांना सुखी करण्यासोबतच ग्रामीण भागात युवकांना नोकरी, व्यवसाय उपलब्ध करुन देत आत्मनिर्भर होण्यास सहकार्य करावं, सं आवाहन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. मुंबई इथं सहकार भारतीया संस्थेच्या दहाव्या अधिवेशनाचं उद्घाटन आज पाटील यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. सहकारी संस्था टिकवण्यासाठी तरुणांचा सहभाग वाढला पाहिजे, असं ते म्हणाले. शेतकऱ्यांचा उत्पादनखर्च कसा कमी करता येईल यादृष्टीनेही शासन प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

परभणी जिल्ह्याच्या मानवत तालुक्यात राजुरा इथं एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान, ३० जणांना अन्नातून विषबाधा झाली आहे. त्यांच्यावर मानवत आणि परभणी इथल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु असून, सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. कडक उन्हाळा आणि अस्वच्छता यामुळे हा प्रकार झाला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

****

उस्मानाबाद इथं आयोजित सत्याण्णवाव्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचा समारोप होत आहे. संमेलनात आज शेवटच्या दिवशी नाट्यकृतींच्या छायाचित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातले प्राध्यापक रावसाहेब देशमुख यांनी, १९५७ ते १९८२ या काळात गाजलेल्या २९ नाटकांची संपूर्ण माहिती मिळवून, हे प्रदर्शन भरवलं होतं. ऐतिहासिक, दुर्मिळ नाट्य ठेवा नवीन पिढीकडे संक्रमित व्हावा या उद्देशानं हे प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. नाट्यसंमेलनाचं खुलं अधिवेशन आणि समारोप समारंभ मुख्य रंगमंचावर आयोजित करण्यात आला आहे.

****

भारताच्या रोहन बोपण्णानं त्याचा ऊरुग्वेचा जोडीदार पाबलो क्वेवास याच्या साथीनं माँटे कार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. फ्रान्समध्ये झालेल्या या स्पर्धेत बोपण्णा पाबलो जोडीनं स्पेनच्या एफ लोपेझ आणि मार्क लोपेझ जोडीचा ६-३, ३-६, १०-४ असा पराभव केला.

****

No comments: