आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
२४ एप्रिल २०१७ सकाळी १०.०० वाजता
****
बीडजवळ मांजरसुंबा इथं क्रुजर गाडी आणि ट्रकची धडक होऊन झालेल्या
अपघातात चार जण जागीच ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. आज पहाटे चार वाजेच्या सुमारास
हा अपघात झाला. मृत चौघे जण बुलढाणा जिल्ह्यातल्या मोहताळ इथले रहिवासी असून, ते पंढरपूरला
जात होते. यात दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. जखमींवर बीडच्या शासकीय रूग्णालयात
उपचार सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
जिल्हा
परिषद शाळेच्या शिक्षक बदली धोरणाच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक
संघानं आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. औरंगाबाद इथं यासंदर्भात घेण्यात आलेल्या
वार्ताहर परिषदेत ही माहिती देण्यात आली. परवा २६ एप्रिल रोजी राज्यभरात यासाठी आक्रोश
मोर्चा कढला जाणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं.
****
बिहार
वस्तु आणि सेवा कर विधेयक पारित करण्यासाठी आज बिहार विधानसभेचं विशेष सत्र बोलवण्यात
आलं आहे. बिहार कर आकारणी सुधारणा विधेयक २०१७ ही यावेळी पारित करण्यात येणार आहे.
येत्या एक जुलै पासून संपूर्ण देशात वस्तु आणि सेवा कर लागू करायचा असल्यामुळे, प्रत्येक
राज्य सरकारांना आपापल्या विधिमंडळात तो पारित कराचा लागणार आहे.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली इथं भाजपशासित मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. १३ राज्यांचे
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आणि केंद्रीय मंत्री यावेळी उपस्थित होते. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी
आपापल्या राज्यात केलेल्या सामाजिक कल्याण योजनांच्या अंमलबजावणी संदर्भात माहिती दिली.
पंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी यावेळी उपस्थित
मुख्यमंत्र्यांना संबोधित केलं.
****
ग्रामीण
भागातल्या लोकांना दूरध्वनीच्या माध्यमातून तज्ञांचा सल्ला घेण्यासाठी केंद्र सरकार
टेलीमेडिसिन केंद्र स्थापना करणार आहे. केंद्रीय शहरी विकास मंत्री व्यंकय्या नायडू
यांनी काल चेन्नई इथं एका कार्यक्रमात ही माहिती दिली. वैद्यकीय सल्ल्यासाठी २४ तास
सुरु राहणारी डॉक्टर ऑन कॉल ही मदतवाहिनी केंद्र सरकार सुरु करणार असल्याचंही नायडू
यांनी सांगितलं.
//****//
No comments:
Post a Comment