Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 24 April 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४ एप्रिल २०१७ दुपारी १.००वा.
*****
जम्मू
काश्मीरमध्ये सध्या उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती
यांनी आज नवी दिल्ली इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दगडफेकीच्या घटना,
तसंच विद्यार्थ्यांचं आंदोलन यासंदर्भात चर्चा झाली असून, आंदोलनकर्त्यांशी चर्चा करण्याचं
सुचवण्यात आल्याचं मुफ्ती यांनी बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.
राज्यात तरुणांना भडकावण्याचा प्रयत्न होत असून त्यासाठी कठोर पावलं उचलण्याची गरज
असल्याचं त्या म्हणाल्या. केंद्र सरकार राज्यातल्या परिस्थितीचा गंभीरपणे विचार करेल,
असं आश्वासन पंतप्रधानांनी यावेळी दिलं.
****
राष्ट्रीय
पंचायत राज दिवस आज साजरा होत आहे. १९९३ मध्ये आजच्या दिवशी संविधान संशोधन अधिनियम
१९९२ लागू करण्यात आलं होतं. यानिमित्तान लखनऊ इथं आयोजित विशेष कार्यक्रमात देशातल्या
२० उत्कृष्ट पंचायतींना पंतप्रधानांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.
****
भारतात
विमुद्रीकरणाचा परिणाम आता कमी झाला असल्याचं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं म्हटलं आहे.
मात्र व्यवहारात अधिक सहजता येण्यासाठी नव्या नोटा मोठ्या प्रमाणात बाजारात यायला पाहिजे,
असं मत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे आशियाई विभागाचे उपसंचालक केनेथ कांग यांनी व्यक्त
केलं आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत ७५ टक्के जुन्या नोटा बदलून नव्या नोटा चलनात आणल्या
आहेत. औद्योगिक उत्पादन आणि उत्पादन खरेदी व्यवस्थापक निर्देशांकाची स्थिती चांगली
राहिली असल्याचं ते म्हणाले.
****
दहशतवादाचा
सामना करण्यासाठी अफगाणिस्तानला पूर्ण सहकार्य करणार असल्याचं भारतानं म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घनी यांना पत्र लिहून,
अफगाणिस्तानात गेल्या शुक्रवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातल्या जखमींना मदत देण्याचं
आश्वासन दिलं. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाल बागले यांनी ट्विटरवरुन ही माहिती
दिली. या हल्ल्यात शंभराहून अधिक सैनिक मारले गेले. अफगाणिस्तानची जनता आणि सुरक्षा
बल, देशाची एकता, शांतता आणि सुरक्षेला कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करतील असा विश्वास
त्यांनी व्यक्त केला.
****
देशातल्या
विमान प्रवासाच्या दरावरील मर्यादेसंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात एक याचिका दाखल
करण्यात आली आहे. यावरील सुनावणी दरम्यान न्यायालयानं केंद्र सरकारला नोटीस बजवात उत्तर
देण्याचे आदेश दिले आहेत. विमान प्रवासाच्या दरावरील मर्यादेसंदर्भात नागरी विमान मंत्रालयानं
आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आदेश न्यायालयानं दिले आहेत. विमान प्रवासाच्या दराबाबत
नियम करणे नागरी विमान मंत्रालयाच्या अखत्यारित येत नाही, अशी बाजू केंद्र सरकारच्यावतीने
मांडण्यात आली. यावरील पुढील सुनावणी १५ सप्टेंबर रोजी होणार आहे.
****
रेल्वे
प्रवाशांसाठी रेल्वेची अद्ययावत माहिती देणारं ॲप जुनमध्ये सुरु करण्यात येणार आहे.
रेल्वेची वेळ, स्थानकांची माहिती, रद्द झालेल्या गाड्या आदी सविस्तर माहिती प्रवाशांना
या ॲपच्या माध्यमातून मिळणार आहे. या अॅपचं नाव ‘हिंदरेल’ ठेवण्यात येणार असल्याचं
याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
राज्यात
२०१० ते २०१७ या काळात २९१ बिबटे आणि ८४ वाघांचा मृत्यू झाल्याचं भारतीय वन्यजीव संरक्षण
सर्वेक्षणात नमूद करण्यात आलं आहे. यात शिकार केल्यामुळे १५९ वाघ आणि बिबट्यांचा मृत्यू
झाला. सध्या राज्यात २०२ वाघ आणि ९०५ बिबटे असल्याचं वन विभागानं सांगितलं. वन्यजीव
संरक्षण कायदा १९८६ अंतर्गत या प्राण्यांचं संरक्षण केलं जातं. देशात वाघ आणि बिबट्यांचा
जास्त मृत्यू होणार्या पहिल्या चार राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश असल्याचं याबाबतच्या
वृत्तात म्हटलं आहे.
****
केंद्र
आणि राज्यसरकारनं देशातल्या ओबीसींची नव्यानं जनगणना करून त्याची आकडेवारी घोषीत करावी,
अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेनं केली आहे. अहमदनगर इथं पार पडलेल्या
परिषदेच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत ही मागणी करण्यात आली. या मुख्य मागणीसह,
ओबीसी विद्यार्थ्यांची बंद झालेली शिष्यवृत्ती सुरु करून त्यांना ती लवकरात लवकर देण्यात
यावी, आदी मागण्यांसाठी परिषदेच्या वतीनं आंदोलन करण्याचा ठराव यावेळी संमत करण्यात
आला.
****
अहमदनगर
जिल्ह्यातल्या निळवंडे धरणाच्या कालव्यांसाठी लवकरात लवकर निधी उपलब्ध करुन द्यावा
या मागणीसाठी शेतकऱ्यांनी अहमदनगर इथं काल विराट मोर्चा काढला होता. निळवंडे कालवा
कृती समितीच्या वतीनं या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी आमदार बाबासाहेब
थोरात, माजी मंत्री मधुकरराव पिचड उपस्थित होते. संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी निधी
देण्याचं खोटं आश्वासन दिलं असून, तीन वर्षांपासून या कालव्यांच्या कामासाठी निधी मिळाला
नसल्याचं आमदार थोरात यावेळी म्हणाले.
//****//
No comments:
Post a Comment