Sunday, 30 April 2017


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 April 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३०  एप्रिल २०१ दुपारी .००वा.

****

तरुणांनी उन्हाळी सुटीत चाकोरीबाहेरच्या जीवनाचा अनुभव घ्यावा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मन की बात या आकाशवाणीवरील कार्यक्रम श्रृंखलेच्या ३१ व्या भागात ते आज बोलत होते. कौशल्य विकासाच्या युगात मानवी गुणांच्या विकासाकडे दुर्लक्ष करू नये, असं सांगतानाच पंतप्रधानांनी, तरुणांना उन्हाळी शिबीरांमध्ये सहभागी व्हावं, सेवाभावी संस्थांसोबत किमान १५ दिवस काम करावं, असं आवाहन केलं. 

तरुणांनी सुटीच्या काळात नवनवी कौशल्य आत्मसात करावीत, एखादी कला किंवा नवीन भाषा शिकावी, ज्या बाबत कुतुहल वाटतं, अशा गोष्टी जाणून घ्याव्यात. पर्यटनस्थळांना भेटी देऊन तिथली छायाचित्रं आपल्याला पाठवावीत, हॅश टॅग इनक्रेडिबल इंडियाचा वापर करून, आपले अनुभव सांगावेत, असंही पंतप्रधान म्हणाले.

रोखरहित व्यवहारांना चालना देण्यासाठी तरुणांनी अधिकाधिक नागरिकांना भीम ॲपची माहिती देऊन आर्थिक व्यवहारांसाठी हे ॲप वापरण्यासाठी त्यांना प्रेरित करावं. १४ ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या योजनेअंतर्गत एका व्यक्तीनं केलेल्या अशा तीन व्यवहारांसाठी तरुणांना प्रत्येकी दहा रुपये मिळतील, असं पंतप्रधानांनी सांगितलं.

सर्वांनी उन्हापासून बचावाचे उपाय करावेत, आपल्या छतावर अंगणात पक्षांसाठी पाणी ठेवावं, त्यासोबत अन्नाची नासाडी टाळण्याचं आवाहन करतानाच, पंतप्रधानांनी रोटी बँकेसारख्या उपक्रमांचं कौतुक केलं.

उच्च पदस्थ पदाधिकाऱ्यांनी लाल दिवा फक्त वाहनावरूनच नव्हे तर डोक्यातूनही काढून टाकावा, असं सांगतानाच, आता प्रत्येक व्यक्ती महत्त्वाची असल्याचं ते म्हणाले.

एक मे हा दिवस कामगार दिन म्हणून पाळला जातो. कामगारांच्या कल्याणासाठी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान अविस्मरणीय असल्याचं नमूद करत, पंतप्रधानांनी भगवान गौतम बुद्ध, महात्मा बसवेश्वर, रामानुजाचार्य यांच्या कार्याचं स्मरण केलं.

उद्या साजरा होत असलेल्या महाराष्ट्र दिनाच्या पंतप्रधानांनी महाराष्ट्रवासियांना शुभेच्छा दिल्या.

****

औरंगाबाद इथं महाराष्ट्र दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण विभागीय आयुक्त कार्यालयात पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते सकाळी आठ वाजता होणार आहे. मराठवाड्यात सर्व जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी संबंधित पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण केलं जाणार आहे.

****

महिला बचत गटांना शून्य टक्के दराने विनाअट कर्ज देण्याचा प्रस्ताव राज्यशासनाच्या विचाराधीन असल्याचं, महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. त्या काल चंद्रपूर जिल्ह्यात पोंभूर्णा इथं बोलत होत्या. महिला बचत गटांना वेगवेगळया योजनांमधून भरीव पाठबळ दिले जाईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते, महिला बचत गटांना कुक्कुटपालन, दुग्धोत्पादन, आदी व्यवसायांसाठी आवश्यक तेवढी मदत केली जाईल, असं मुनगंटीवार म्हणाले.

****

आजपासून नंदुरबार इथं सातपुडा महाआरोग्य शिबीराचं आयोजन करण्यात आलं असून राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते या शिबीराचं उद्घाटन झालं. या शिबीरात रुग्णांची मोफत तपासणी, त्यांना औषधोपचार आणि आवश्यक शस्त्रक्रिया अशा आरोग्य सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. आज सकाळी ११ वाजेपर्यंत या शिबीरात सुमारे दीड लाख रुग्णांनी नाव नोंदणी केली असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. राज्यातलं अश्या प्रकारचं हे विसावं महाआरोग्य तपासणी शिबीर आहे.

****

औरंगाबाद इथं महापालिकेची सर्व रुग्णालयं-आरोग्य केंद्रं आज रविवारच्या दिवशीही सुरु असणार आहेत. उद्या एक मे रोजी महाराष्ट्र दिनाची शासकीय सुटी असल्यानं रुग्णांच्या सोयीसाठी हा बदल केला गेला आहे. दरम्यान, औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय - घाटी रुग्णालयाचा बाह्य रुग्ण विभाग उद्या बंद राहणार आहे.

****

राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाच परळी इथलं विभागीय कार्यालय अन्यत्र स्थलांतरित करण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून कार्यरत असलेल्या या कार्यालयांतर्गत बीड, लातूर, उस्मानाबाद आणि अहमदनगर या चार जिल्ह्यातल्या कापूस खरेदी केंद्राच नियंत्रण केलं जातं.

****

वस्तु आणि सेवा कर जी एस टी अंतर्गत आपल्या व्यवसायाची नोंदणी करायचा आजचा शेवटचा दिवस आहे. एस टी-३ या विवरणपत्राच्या माध्यमातून आयकर भरून व्यावसायिक या सुविधांचा लाभ घेऊ शकतात. जी एस टी नोंदणी करण्यासाठी आलेल्या तांत्रिक अडचणींमुळे केंद्रसरकारनं ३१ मार्च ही नोंदणीची मुदत महिनाभरासाठी वाढवली होती. या कर प्रणालीच्या नियमांनुसार www.aces.gov.in  या संकेतस्थळावरुन आपला कर व्यापाऱ्यांना ऑनलाईन भरता येणार आहे. आपली अघोषित संपत्ती प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत जाहीर करण्याची मुदत ही आज संपत आहे.

//*******//

No comments:

Text-آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 14 اگست 2025‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 14 August-2025 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبری...