Friday, 21 April 2017


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 21 April 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २१ एप्रिल २०१ दुपारी .००वा.

*****

लातूर, परभणी आणि चंद्रपूर महापालिकेच्या मतमोजणीत परभणी आणि लातूरमध्ये प्रस्थापितांच्या विरोधात कौल दिसून येत आहे.

परभणी महापालिकेच्या मतमोजणीमध्ये आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार काँग्रेस पक्षाचे १२ उमेदवार विजयी झाले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी तीन, भाजपचे सहा तर एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाल आहे. आघाडी घेतलेल्या उमेदवारांमध्येही काँग्रेसच्या उमेदवारांची संख्या अधिक आहे.

लातूरमध्ये भारतीय जनता पक्षाचे ३३ उमेदवार आघाडीवर असून त्याखालोखाल २५ जागांवर काँग्रेसचे उमेदवार आहेत. परभणीत राष्ट्रवादी काँग्रेस तर लातूरमध्ये काँग्रेस पक्षाची सत्ता आहे. चंद्रपूरमध्ये मात्र सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे आतापर्यंत २७ उमेदवार विजयी झाले आहेत. काँग्रेस पक्षाला ११, तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे.

****

नागरी सेवेतल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सत्यनिष्ठा आणि प्रामाणिकपणे काम करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथं नागरी सेवा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते देशातल्या नाविन्यपूर्ण अशा विविध प्रकल्पांच्या पुस्तिकेचं विमोचन करण्यात आलं. नागरी सेवेतल्या अधिकाऱ्यांनी आपले अनुभव हे ओझं न मानता, त्याचा उपयोग लोक कल्याणासाठी करायला पाहिजे, असं सांगितलं. नागरी सेवेत एका वर्षात गुणात्मक परिवर्तन आणण्यासाठी समर्पितपणे काम करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.  

****

हैदराबादहून औरंगाबादला येणार्या पॅसेंजर रेल्वे गाडीचं इंजिन आणि तीन डबे मध्य रात्रीच्या सुमारास आंध्रप्रदेशात विकाराबादजवळ रुळावरुन घसरले. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून, काही प्रवासी किरकोळ जखमी झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

दरम्यान, या अपघातामुळे काही गाड्या रद्द तर काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. औरंगाबाद - हैदराबाद पॅसेंजर, नांदेड - बंगळुरु एक्सप्रेस, पुर्णा - हैदराबाद पॅसेंजर या गाड्या, तसंच परळीमार्गे जाणाऱ्या सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.    

****

सांगली जिल्ह्यात मिरज-पंढरपूर महामार्गावर आगळगाव फाट्याजवळ वाळूचा ट्रकवर मिनी ट्रॅव्हल्स बस जाऊन आदळल्यामुळे झालेल्या अपघातात सहा जण ठार तर १२ जण जखमी झाले. आज पहाटे चार वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. जखमींना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बसमधले सर्व प्रवासी कोल्हापूर वळीवडे गांधीनगरचे रहिवाशी आहेत. ेवदर्शन करून कोल्हापूरकडे जात असताना हा अपघात घडला.

****

उस्मानाबाद इथं आजपासून ९७ व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाला प्रारंभ होत आहे. जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या संमेलनाचं उद्घाटन सायंकाळी चार वाजता होणार आहे. या नाट्यसंमेलनात एकपात्री महोत्सव, विविध नाटकं, प्रकट मुलाखत, गोंधळ आणि स्थानिक लोककलांचं सादरीकरण होणार आहे.  

****

नवीन दोन हजार रुपयांची नोट स्पर्शाद्वारे ओळखणं कठीण असल्यामुळे दृष्टी दोष असणाऱ्या व्यक्तींना ती वापरणं अवघड जात असल्याचं राष्ट्रीय दृष्टीहीन संघटनेच्या सचिवांनी म्हटलं आहे. नवीन नोटांवर स्पर्श ज्ञानाच्या काही खुणा असाव्यात, अशी मागणी आपण केंद्र सरकारकडे केली होती, मात्र अद्याप त्याबाबत काही पावलं उचलल्याचं दिसून येत नसल्याचं त्यांनी मुंबईत वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.

****

अर्थ मंत्रालयाच्या संसदीय स्थायी समितीनं भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांना विमुद्रीकरणाच्या मुद्यावर स्पष्टीकरण देण्यासाठी येत्या २५ मे ला समितीसमोर हजर होण्यास सांगितलं आहे. या मुद्यावर अजून चर्चा पूर्ण झाली नसल्याचं समितीनं म्हटलं आहे. गौण कायद्याशी संबंधित टी सुब्बीरामी रेड्डी यांच्या अध्यक्षतेखलील संसदीय समितीनंही रिझर्व्ह बँकेकडे विमुद्रीकरणानंतर उद्भवलेल्या परिस्थितीचा अहवाल मागितला आहे. बंदी घातलेल्या नोटांची संख्या आणि अर्थव्यवस्थेत परत आलेल्या काळ्या पैशासंबंधीची माहितीही समितीनं विचारली आहे.  

****

सरकारनं बालकांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित माहितीचा प्रचार प्रसार थांबवण्यासाठी इंटरनेट कंपन्यांना ३१ जुलै पर्यंत मुदत दिली आहे. सर्वोच्च न्यायालयानं १२ जुलै २०१३ रोजी बाल लैंगिक शोषणाशी संबंधित काही माहिती देणाऱ्या ऑनलाईन संकेतस्थळांवर बंदी घालण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर सरकारनं स्थापन केलेल्या समितीच्या सूचनांनुसार या संकेतस्थळांना ही मुदत देण्यात आली आहे.

****

सामाजिक न्याय विभागामार्फत सन २०१६-१७ या आर्थिक  वर्षासाठी महात्मा  गांधी व्यसनमुक्ती सल्ला, उपचार आणि पुनर्वसन केंद्र योजनेंतर्गत, व्यसनमुक्ती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना अनुदान देण्यात येणार आहे. महसूल विभागातून प्रत्येकी दोन संस्थांना म्हणजेच राज्यातल्या १२ नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थांना प्रत्येकी ११ लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे.

//******//

No comments: