आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
२७ एप्रिल २०१७ सकाळी १०.०० वाजता
****
जम्मू
काश्मीरमधल्या कुपवाडा इथं आज पहाटे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात तीन जवान शहीद
झाले, तर पाच जवान जखमी झाले. आहेत. लष्करानंही दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिलं
असून दोन दहशतवाद्यांना ठार केलं आहे. शहीद झालेल्या जवानांमध्ये एक मेजर, एक कनिष्ठ
अधिकारी आणि एका जवानाचा समावेश आहे. जखमींना श्रीनगरमधील रुग्णालयात दाखल करण्यात
आलं आहे. याठिकाणी अजूनही काही दहशतवादी लपले असल्याची शक्यता असून शोधमोहीम सुरु आहे.
****
सहकार
क्षेत्रासमोरील आव्हानांवर मात करण्यासाठी सहकार क्षेत्राला नवसंजीवनीची आवश्यकता असून,
सहकारी संस्थांचं व्यवस्थापन प्रशिक्षित व्यक्तींकडूनच व्हायला हवं, अशी अपेक्षा राज्यपाल
सी.विद्यासागर राव यांनी व्यक्त केली. सोलापूर इथं राज्य शासनाच्या सहकार, वस्त्रोद्योग
आणि पणन विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या, सहकार पुरस्कारांचं वितरण राज्यपालांच्या हस्ते
झालं, त्यावेळी ते बोलत होते. सहकार चळवळीनं राज्याच्या सर्वसमावेशक, सामाजिक आणि आर्थिक
उन्नतीमध्ये मोठं योगदान दिलं आहे, असं ते म्हणाले. राज्यातल्या सहकार क्षेत्रात उल्लेखनीय
काम करणाऱ्या संस्थांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
****
इंदूमिलची
जागा राज्य शासनाच्या नावावर झाली असून, त्यावरील पाडकामही पूर्ण झालं असल्याचं सामाजिक
न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी सांगितलं. इंदू मिल इथं डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांच्या स्मारकाच्या कामाची पहाणी केल्यानंतर ते बोलत होते. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या स्मारकासाठी ग्लोबल
निविदा येत्या दोन महिन्यात पूर्ण होणार असून, त्यानंतर स्मारकाच्या प्रत्यक्ष कामाला
सुरूवात होईल, असं ते म्हणाले.
****
राज्यातल्या
जलयुक्त शिवार अभियानातंर्गत करण्यात आलेल्या कामांमुळे शेती आणि पिण्यासाठी पाणी उपलब्ध
होत आहे. हा प्रकल्प इतरही राज्यांनी राबवावा, अशा सूचना केंद्र शासनामार्फत देण्यात
आल्या असल्याचं, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितलं. मंडणगड इथं लोकनेते
गोपीनाथ मुंडे कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयाचं उद्घाटन मुंडे यांच्या हस्ते झालं,
त्यावेळी त्या बोलत होत्या.
//*******//
No comments:
Post a Comment