Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date - 1 April 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १ एप्रिल २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
राज्याचा अर्थसंकल्प सादर होताना गोंधळ घालणाऱ्या विरोधी
पक्षातल्या १९ पैकी ९ आमदारांचं निलंबन मागे घेण्यात आलं आहे. विधिमंडळ कामकाज मंत्री
गिरीष बापट यांनी आज विधानसभेत ही घोषणा केली. यात अवधूत तटकरे, अमित झनक, वैभव पिचड,
डी. पी. सावंत, संग्राम थोपटे, नरहरी झिरवळ, दिपक चव्हाण, दत्तात्रय भरणे, अब्दुल सत्तार
या आमदारांचा समावेश आहे. अर्थसंकल्प सादर होताना शेतकरी कर्जमाफीची मागणी करत सतत
व्यत्यय आणल्यामुळे आणि अर्थसंकल्पाची प्रत जाळल्यामुळे या आमदारांचं निलंबन करण्यात
आलं होतं.
****
सरकार उद्योगपतींना कर्जमाफी देते, मात्र शेतकऱ्यांना
नाही, असा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी निघालेली
संघर्ष यात्रा आज औरंगाबाद इथं पोहोचली, त्यावेळी झालेल्या सभेत ते बोलत होते. काँग्रेस,
राष्ट्रवादी काँग्रेससह सर्व विरोधी पक्ष या यात्रेत सहभागी झाले आहेत. शेतकऱ्यांचं
संपूर्ण कर्ज माफ करुन सातबारा कोरा झाला पाहिजे, शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे,
यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.
****
महामार्गावर २२० मीटर अंतरावरची दारुची दुकानं बंद करण्यासंदर्भात
सरकार न्यायालयाच्या आदेशाचं पालन करेल, असं उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
यांनी सांगितलं. विधानभवन परिसरात ते आज वार्ताहरांशी बोलत होते. न्यायालयाच्या आदेशाचा
परिणाम १५ हजारांपेक्षा अधिक दुकानांच्या परवान्यांवर होणार आहे.
****
स्टेट बँकेच्या पाच बँका आणि भारतीय महिला बँकेच्या भारतीय
स्टेट बँकेत विलिनीकरणाची प्रक्रिया आजपासून सुरु झाली. यामुळे भारतीय स्टेट बँक जगातल्या
५० मोठ्या बॅंकांपैकी एक झाली आहे. भारतीय स्टेट बँकेच्या अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य
यांनी विलीन झालेल्या बॅंकांचं आणि भागधारकांचं स्वागत केलं असून, तीन महिन्यांत ही
प्रक्रिया पूर्ण होईल, असं सांगितलं.
****
कोपर्डी इथल्या बलात्कार प्रकरणातील आरोपीवर आज एका संघटनेच्या
चार कार्यकर्त्यांनी कोयत्यानं वार करत जीवघेणा हल्ला केला. अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात
आज याप्रकरणी सुनावणी दरम्यान हे आरोपी आले असता, हा हल्ला झाला. हल्लेखोरांना अटक
करण्यात आली असून, यावेळी एक पोलिस जखमी झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
यंत्रमाग क्षेत्राला चालना मिळण्यासाठी अनुदानात ३० टक्क्यांनी
वाढ केली असल्याचं केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी सांगितलं. त्या आज भिवंडी इथं यंत्रमाग उद्योगासाठी आखलेल्या पॉवरटेक्स
इंडिया या देशव्यापी योजनेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होत्या. सूतबँकेची निर्मिती करण्यासाठी दोन कोटी रुपयांचं अर्थसहाय्य
तसंच सामान्य सुविधा केंद्र सुरु करणार असल्याचं त्या म्हणाल्या. राज्यातल्या यंत्रमागाला
वीज दरातील सवलत वाढविण्यासाठी योजना आखली असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.
****
सरकारी कर्मचारी, अधिकाऱ्यांना अधिक संरक्षण देण्यासाठीच्या विधेयकाला आज विधानसभेत
सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी विरोध केला. या विधेयकावर रात्री उशिरापर्यंत चर्चा
केली जाईल, असं विधिमंडळ कामकाज मंत्री गिरीष बापट यांनी म्हटल्यावर त्याला विरोध करत
सदस्यांनी गोंधळ घातला.
****
राज्यात दोन वर्षांत राबवलेली जलयुक्त शिवार योजना केवळ दिखाऊपणा असून, ठेकेदारांच्या
सोयीसाठी या योजनेतील कामं होत आहेत, असा आरोप विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी
आज विधान परिषदेत केला. यासंदर्भात नियम २६० अंतर्गत सत्ताधारी पक्षानं मांडलेल्या
प्रस्तावावरील चर्चेदरम्यान ते बोलत होते. जलयुक्त शिवार योजनेची कामं करताना फक्त
नदी खोलीकरण, रुंदीकरण यावरच भर देण्यात आला. याबाबत अनेक तज्ज्ञांनी शंका व्यक्त केल्याचं
ते म्हणाले.
****
उस्मानाबादचे खासदार रविंद्र गायकवाड यांच्यावर एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला
मारहाण केल्याप्रकरणी विमान कंपन्यांनी घातलेली बंदी मागे घ्यावी, या मागणीसाठी आज
शिवसेनेच्या वतीनं मुरुम रोडवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. सरकारनं, एअर इंडिया
कंपनीसह इतर खासगी विमान कंपन्यांनी याबाबत निर्णय घेतला नाही, तर अजून तीव्र आंदोलन
करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
****
अंमलबजावणी संचालनालयानं ३०० खोट्या कंपन्यांच्या शोधासाठी
मुंबई, दिल्ली, अहमदाबादसह देशभरात १०० ठिकाणी छापे घातले. खोट्या कंपन्यांच्या विरोधातील
मोहिमेत एकाच वेळी १६ राज्यांत करण्यात आलेली ही मोठी कारवाई असल्याचं अधिकाऱ्यांनी
पीटीआयला सांगितलं.
****
उद्या देशभरात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेत
आपल्या घरातल्या पाच वर्षाखालील बालकांना नजीकच्या आरोग्य केंद्रात पोलिओची लस द्यावी,
असं आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे.
****
No comments:
Post a Comment