Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date - 02 April 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०२ एप्रिल २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
जम्मू
काश्मीरमध्ये ‘चेनानी नाशरी’ या देशातल्या सगळ्यात मोठ्या बोगद्याचं लोकार्पण आज पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. जम्मू - श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर उभारलेल्या
या नऊ किलोमीटरच्या बोगद्यामुळे जम्मू ते श्रीनगर हे अंतर सुमारे ३० किलोमीटर पर्यंत
कमी झालं आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्यासह जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री
मेहबुबा मुफ्ती यावेळी उपस्थित होत्या.
****
न्याय व्यवस्थेला सहाय्यक ठरणाऱ्या तंत्रज्ञानासाठी संशोधन
करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या
शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी समारंभाच्या समारोप कार्यक्रमात ते आज बोलत होते. या शतकात
तंत्रज्ञान एक मोठी भूमिका बजावत असून न्याय व्यवस्थेतही त्याला मोठा वाव असल्याचं
ते म्हणाले. गेल्या तीन वर्षात सरकारनं बाराशेहून अधिक कालबाह्य कायदे रद्द केले असून
न्यायालयांवरील कामाचं ओझं तसंच प्रलंबित प्रकरणांची संख्या कमी करण्यासाठी सरकार प्रयत्न
करेल असं ते म्हणाले. न्यायव्यवस्थेच्या स्वायत्ततेबाबत सरकार कटीबध्द असल्याचं केंद्रीय
कायदामंत्री रविशंकर प्रसाद यावेळी म्हणाले. देशात न्यायाधीशांच्या जागा रिक्त असणं
हे प्रकरणं प्रलंबित राहण्याचं एक मोठं कारण असल्याचं सरन्यायाधीश जे.एस.खेहर यांनी
यावेळी नमूद केलं.
****
दुर्लक्षित पालकांना त्यांच्या मुलांनी द्यावयाच्या निर्वाह
भत्त्यासाठी सध्या असणारी मासिक दहा हजार रुपयांची मर्यादा काढून टाकण्याचा सरकारचा
विचार आहे. यासाठी कायद्यात सुधारणा केली जाणार असून त्यामुळे पालकांच्या गरजा आणि
पाल्यांची आर्थिक क्षमता यानुसार ही रक्कम ठरवता येऊ शकेल. सध्याची रक्कम वृध्दांच्या
गरजा आणि महागाईचा विचार करता पुरेशी नसल्याच्या तक्रारी अनेक ठिकाणच्या ज्येष्ठ नागरिक
संघटनांनी केल्यानं सरकारनं असा प्रस्ताव तयार केला आहे. वृध्दांना शुश्रुषा आणि अन्य
सेवा पुरवणाऱ्या संस्थांना गुणवत्तेनुसार मानांकन देणारी यंत्रणा उभारण्याचाही सरकारचा
विचार आहे.
****
कर्ज
वसुलीसाठी वारंवार मानसिक आणि शारीरिक छळ केल्यामुळे, आत्महत्या
केलेल्या कर्जदाराच्या मृत्यूला, असा
छळ करणारे सावकार जबाबदार असल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं दिला आहे. कर्जदाराच्या
आत्महत्येला हे सावकार कारणीभूत असल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे. एका सामान्य
माणसाचा कुटुंबियांसमोर वारंवार असा छळ झाल्यानं, त्यानं
आत्महत्येचा निर्णय घेतल्याची तक्रार योग्य असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे.
****
राष्ट्रीय
पल्स पोलिओ लसीकरण मोहीम आज देशभरात राबवण्यात आली. पाच वर्षांखालील बालकांना पोलिओ
लस देण्यात आली.
उस्मानाबाद
इथं पोलिओ लसीकरण मोहीमेचा प्रारंभ जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील यांच्या हस्ते
करण्यात आला. जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात एक हजार २२९ आणि शहरी भागात १६८ लसीकरण केद्रांची
व्यवस्था करण्यात आली होती.
****
दीर्घकाळ
थकीत वेतन प्रश्नावरुन आयडीबीआय बँक कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाला अखिल भारतीय
बँक कर्मचारी संघटनेनं पाठिंबा जाहीर केला आहे. येत्या १२ एप्रिलला प्रस्तावित असलेल्या
या संपात सुमारे १५ हजार बँक कर्मचारी सहभागी होतील, असा इशारा संघटनेचे सरचिटणीस सी
एच वेंकटाचलम यांनी दिला आहे. चेन्नई इथं ते वार्ताहर परिषदेत बोलत होते. या प्रकरणी
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी हस्तक्षेप करावा, असं पत्र कर्मचारी संघटनेनं
पाठवलं आहे. या वेतन सुधारणा नोव्हेंबर २०१२ पासून प्रलंबित असल्याचं ते म्हणाले.
****
हिंगोली-नांदेड
राष्ट्रीय महामार्गावर माळेगाव फाट्याजवळ खाजगी बस आणि ट्रकची समोरा समोर धडक होऊन
झालेल्या अपघातात ७ प्रवासी ठार झाले. आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.
यापैकी सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर एका प्रवाशाचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू
झाला. या अपघातात १४ जण जखमी झाले असून त्यांच्यावर कळमनुरी इथल्या ग्रामीण रुग्णालयात
उपचार सुरू आहेत. त्यापैकी ८ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात आलं आहे.
नांदेडहून हिंगोलीकडे येत असलेल्या ट्रकनं माळेगाव फाट्याजवळ उभ्या असलेल्या खासगी
बसला जोरदार धडक दिल्यानं हा अपघात झाला.
****
औरंगाबाद शहरातल्या बीड बायपास
इथं संग्रामनगरमध्ये एका ट्रकनं दुचाकीला धडक दिल्यानं झालेल्या अपघातात तीन वर्षाची
मुलगी जागीच ठार झाली. तर तिचे आई-वडील जखमी झाले आहेत. आज सकाळी अकरा वाजता हा अपघात
घडला.
****
पावसाचं
पाणी साठवणं काळाची गरज असल्याचं प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी केलं
आहे. औरंगाबाद जिल्ह्याच्या फुलंब्री तालुक्यातल्या शिरोडी इथं नाला खोलीकरण आणि रुंदीकरणाच्या
कामाला आज बागडे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. शेतकऱ्यांनी
पावसाच्या पाण्याची बचत करण्याचे प्रयत्न केले तर पाणी टंचाई कधीच भासणार नाही, असं
ते म्हणाले. त्यादृष्टीनं पाणी बचतीसाठी योग्य नियोजन करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी
केलं.
****
No comments:
Post a Comment