Sunday, 2 April 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 02.04.2017 1.00pm


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 02 April 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०२ एप्रिल २०१ दुपारी .००वा.

*****

अलाहाबाद उच्च न्यायालय हे ऐतिहासिक निकाल देणारं न्यायालय असल्याचं केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन सोहळ्यात ते आज बोलत होते. अलाहाबाद उच्च न्यायालयानं १९०१ मध्ये विधवांच्या अधिकारासंदर्भात पहिला निर्णय सुनावला, तसंच अयोध्या प्रकरणातही योग्य निर्णय दिल्याचं ते म्हणाले. या न्यायालयानं स्वातंत्र्याची ज्योत पेटवली, असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरन्यायाधीश जे एस खेहर, उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते.

****

लोकसहभाग हा लोकशाहीचा गाभा असून देशासमोर असणाऱ्या सगळ्या समस्या लोकसहभाग, नवसंशोधन आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं सोडवता येऊ शकतात असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. स्मार्ट इंडिया हॅकेथॉन मधील सहभागी व्यक्तींशी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे ते बोलत होते. भारत हा तरुणांचा देश असून तरुणाईच्या ऊर्जेनं देशासाठी चांगला काळ येईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. तंत्रज्ञान आणि नवसंशोधनाच्या प्रभावानं अनेक बदल घडत असून अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. त्यामुळे लोकांनी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले.

****

राष्ट्रीय वयोश्री योजनेमुळे ज्येष्ठ नागरिकांना आरामदायी आयुष्य जगणं शक्य होईल असं केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गेहलोत यांनी म्हटलं आहे. आंध्र प्रदेशातल्या नेल्लोर इथं या योजनेला प्रारंभ केल्यानंतर ते बोलत होते. या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालच्या ज्येष्ठ नागरिकांना वैद्यकीय साधनं आणि उपकरणं पुरवली जातील. या योजनेमुळे देशातल्या ज्येष्ठ व्यक्तींप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळाल्याचं गेहलोत म्हणाले. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सध्या प्रत्येक राज्यातून दोन जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. त्याअंतर्गत गरजू ज्येष्ठ नागरिकांना श्रवणयंत्र, कवळी, कुबड्या, चाकाची खुर्ची अशा वस्तू मोफत पुरवण्यात येणार आहेत.

****

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधीकरणाला दिलेल्या निधीचा पूर्ण वापर होत नसल्यासंदर्भात योग्य पावलं उचलण्याचे निर्देश एका संसदीय समितीनं केंद्रीय आरोग्य विभागाला दिले आहेत. अन्न सुरक्षा आणि प्रमाणीकरण हा विषय देशात दुर्लक्षिला गेला असून अन्न पदार्थांच्या चाचण्यांसाठी फिरत्या प्रयोगशाळांची गरज असल्याचं समितीनं म्हटलं आहे.

****

केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाच्या महत्वाकांक्षी राष्ट्रीय संस्थात्मक मानांकन आराखडा योजनेला देशातल्या उच्च शिक्षण संस्थांनी अपेक्षित प्रतिसाद दिला नसल्याचं पीटीआयनं म्हटलं आहे. या योजनेत देशातल्या सगळ्या उच्च शिक्षण संस्थांची अध्ययन, अध्यापन आणि संसाधनांच्या निकषांवर गुणवत्ता क्रमवारी तयार करण्याचा प्रस्ताव आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी सहभागी झालेल्या संस्थांची संख्या आठशेनं घटली आहे. यावर्षीची गुणवत्ता क्रमवारी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर उद्या जाहीर करणार आहेत.

****

बनावट नोटांना आळा घालण्यासाठी पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नोटांमधील सुरक्षा वैशिष्ट्यं दर तीन चार वर्षांनी बदलण्याची सरकारची योजना आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील निकषांच्या अनुषंगानं हे बदल केले जातील. विमुद्रीकरणानंतर गेल्या चार महिन्यातच नव्या नकली नोटांचे साठे आढळल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे. बहुतांश विकसीत देशांप्रमाणे मोठ्या नोटांची सुरक्षा वैशिष्ट्यं ठराविक काळानंतर बदलणं आपल्या देशासाठीही आवश्यक असल्याचं केंद्रीय गृहसचिव राजीव मेहर्षी यांनी म्हटलं आहे.

****

नवी दिल्ली इथं सुरु असलेल्या इंडिया सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिटंनपटू पी व्ही सिंधू महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात पोहोचली आहे. काल झालेल्या उपान्त्य सामन्यात तिनं दक्षिण कोरियाच्या सुंग जी ह्यून चा पराभव केला. सिंधूचा अंतिम सामना आज ऑलिम्पिक विजेती कॅरोलिना मरीन विरुद्ध होणार आहे.

****

औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय - घाटीचा बाह्यरुग्ण विभाग परवा चार तारखेला राम नवमीनिमित्त बंद राहणार आहे. घाटीच्या वैद्यकीय अधीक्षकांनी ही माहिती दिली आहे.

****

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना भारती विद्यापीठाच्या वतीनं डि लिट ही पदवी देण्यात येणार आहे. भारती विद्यापीठाच्या १८व्या दीक्षांत सोहळ्यात परवा चार तारखेला पवार यांना हा पदवी देण्यात येणार आहे. विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शिवाजीराव कदम यांनी पुणे इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली.
****

No comments: