Tuesday, 4 April 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 04.04.2017 6.50am

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 04 April  2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०४ एप्रिल २०१७ सकाळी ६.५० मि.
****
·      ज्येष्ठ शास्त्रीय गायिका किशोरी आमोणकर यांचं निधन
·      भारतीय स्टेट बँकेच्या कर्ज व्याजदरात कपात नियोजित उस्मानाबाद इथल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या बोधचिन्हाचं अनावरण
·      औरंगाबाद, परभणी, लातूर, नांदेड आणि हिंगोली जिल्हा परीषदांच्या विषय समित्यांच्या सभापतींची निवड
आणि
·      परभणी महानगरपालिका निवडणुकीसाठी ९१० तर लातूर महानगरपालिकेसाठी ८५०जणांचे उमेदवारी अर्ज दाखल
****
ज्येष्ठ शास्त्रीय गायिका किशोरी आमोणकर यांचं काल मुंबईत राहत्या घरी निधन झालं, त्या ८५ वर्षांच्या होत्या. प्रामुख्यानं जयपूर अत्रौली घराण्याची गायकी जपलेल्या किशोरीताईंनी आपल्या आई मोगुबाई कुर्डीकर यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले. शास्त्रीय संगीतात ख्याल, ठुमरी आणि भजन गायकी हा त्यांचा आवडीचा प्रांत होता. त्यांनी गीत गाया पत्थरोंने या चित्रपटासाठी पार्श्वगायन तर दृष्टी या चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शन केलं होतं. देवकी पंडित, आरती अंकलीकर, रघुनंदन पणशीकर आदी उत्तम गायकांची पिढी घडवणाऱ्या गुरू म्हणून किशोरीताईंचं नाव आदरानं घेतलं जातं. स्वरार्थरमणी रागरससिद्धांत हा त्यांनी लिहिलेला ग्रंथ शास्त्रीय संगीताच्या अभ्यासासाठी महत्त्वाचा मानला जातो. संगीत क्षेत्रातल्या योगदानासाठी त्यांना पद्मभुषण, पद्मविभुषण, संगीत नाटक अकादमीसह विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं.
****
भारतीय स्टेट बँकेनं कर्जाच्या व्याजदरांत शून्य पूर्णांक १५ शतांश टक्के इतकी कपात केली आहे. बँकेचा प्रमाण व्याज दर आता नऊ पूर्णांक दहा शतांश टक्के एवढा असेल. व्याजदर कपातीमुळे गृहकर्ज तसंच वाहन कर्ज स्वस्त होणार आहे, यापूर्वी कर्ज घेतलेल्या कर्जदारांनाही या निर्णयाचा फायदा होणार असून, त्यांचे कर्जाचे हप्ते कमी होणार असल्याचं या बाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
भारतीय स्टेट बँकेने आपल्या किमान शिलकीच्या नियमातही बदल केला आहे. महानगरांतल्या खातेधारकांना आपल्या बचत खात्यात किमान पाच हजार रुपये, शहरी भागात तीन हजार रुपये, छोट्या शहरांमध्ये दोन हजार रुपये, तर ग्रामीण भागात एक हजार रुपये किमान शिल्लक बचत खात्यात ठेवावी लागणार आहे.
****
औरंगाबाद, परभणी,  लातूर आणि नांदेड जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापती पदांची निवड काल करण्यात आली.  यामध्ये औरंगाबाद जिल्हा परिषदेत काँग्रेस आणि शिवसेनेच्या वाट्याला प्रत्येकी दोन सभापती पदे आली आहेत. समाज कल्याण सभापतीपदी काँग्रेसचे धनराज बेडवाल, महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापती म्हणून शिवसेनेच्या कुसुम लोहकरे यांची तर अन्य विषय समित्यांच्या सभापतीपदी शिवसेनेचे विलास भुमरे आणि काँग्रेसच्या मीना शेळके यांची निवड झाली.
परभणी जिल्हा परीषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तीन तर भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला एक सभापती पद आलं. समाजकल्याण समिती सभापती पदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उर्मिला बनसोडे, महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापती पदी राधाबाई सुर्यवंशी, तर अन्य दोन समित्यांच्या सभापती पदी अशोक काकडे आणि भारतीय जनता पक्षाचे श्रीनिवास मुंडे यांची निवड झाली. या दोन सभापतींचं खातेवाटप लवकरच केलं जाणार आहे.
लातूर जिल्हा परिषदेत सर्व सभापतीपदांवर भारतीय जनता पक्षाचे सदस्य बिनविरोध निवडून आले. यात बांधकाम सभापतीपदी प्रकाश देशमुख, समाज कल्याण सभापतीपदी संजय दोरवे, कृषी आणि पशु संवर्धन सभापतीपदी बजरंग जाधव आणि महिला बाल कल्याण सभापतीपदी संगिता घुले यांची निवड झाली.
नांदेड जिल्हा परिषदेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला प्रत्येकी दोन सभापती पदं मिळाली, समाजकल्याण सभापतीपदी काँग्रेसच्या शिला निखाते, महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मधुमती कुंटुरकर, आणि अन्य दोन विषय समितीच्या सभापतीपदी काँग्रेसचे माधव मिसाळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तात्रेय रेड्डी यांची निवड करण्यात आली.
हिंगोली जिल्हा परिषदेत काँग्रेसला दोन सभापती पदं तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या वाट्याला प्रत्येकी एक सभापती पद आलं, यामध्ये समाजकल्याण सभापती पदी काँग्रेसच्या सुनंदा नाईक, महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापती पदी शिवसेनेच्या रेणुका जाधव, अन्य दोन विषय समितीच्या सभापती पदी काँग्रेसचे संजय देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रल्हाद राखांडे विजयी झाले.
पुणे, कोल्हापूर, अहमदनगर, रत्नागिरी जिल्हा परीषदेच्या सभापतींचीही काल निवड करण्यात आली.
औरंगाबाद महानगरपालिकेतही काल नऊ प्रभाग समित्यांच्या सभापतींची निवड झाली.
****
राज्य सरकारचं आपल्या अडचणींकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यातले शेतकरी एक जूनपासून संप पुकारण्याचं नियोजन करत असल्याचं अहमदनगर जिल्ह्यातले पुणतांबा इथले शेतकरी धनंजय धोरडे यांनी काल वृत्तसंस्थेशी बोलतांना सांगितलं.
कृषी मालाची विक्री थांबवणं तसंच नव्यानं पेरणी न करणं या बाबींचा या संपात समावेश असेल. पुणतांबा इथं झालेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय झाला असल्याचं धोरडे यांनी सांगितलं. या बैठकीला औरंगाबाद, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातले दोन हजार शेतकरी उपस्थित होते, अशी माहिती त्यांनी दिली.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरुन प्रसारित केलं जात आहे, आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
परभणी महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या काल अखेरच्या दिवशी ७५४ अर्ज दाखल झाले. महापालिकेच्या ६५ जागांसाठी एकूण ९१० उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याचं मनपा प्रशासनाकडून सांगण्यात आलं. महापालिकेत सर्वच पक्ष स्वबळावर निवडणूक लढवत असून, पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यानं, अनेकांनी बंडखोरी करत, अपक्ष म्हणून अर्ज दाखल केल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
लातूर महापालिकेसाठी काल अखेरच्या दिवशी ६४३ अर्ज दाखल झाले. महापालिकेच्या ७० जागांसाठी एकूण ८५० उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याचं मनपा प्रशासनाकडून सांगण्यात आलं. अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांनी महापालिकेच्या सहा निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात मोठी गर्दी केली होती.
****
९७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या बोधचिन्हाचं काल नाट्य परिषदेचे अध्यक्ष अभिनेते मोहन जोशी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. जोशी यांनी यावेळी नाट्य संमेलनाच्या तयारीचा आढावा घेतला. स्वागताध्यक्ष आमदार सुजितसिंह ठाकूर यावेळी उपस्थित होते. येत्या २१, २२ आणि २३ एप्रिल रोजी होणाऱ्या या नाट्यसंमेलनापूर्वी पाच दिवस नाट्यमहोत्सव होणार असल्याची माहिती संमेलनाचे कार्यवाह दीपक करंजीकर यांनी दिली. पाच गाजलेली व्यावसायिक नाटकं यात सादर होणार आहेत. नाट्यसंमेलनात नाट्यदिंडी, संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ रंगकर्मी जयंत सावरकर यांची प्रकट मुलाखत, विविध कलाकारांचं सादरीकरण, स्थानिक पाच ज्येष्ठ रंगकर्मींचा सत्कार, यासह विविध कार्यक्रम होणार आहेत.
****
लातूर जिल्ह्यातल्या उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस प्रणित लोकनेते चंद्रशेखर भोसले विकास पॅनलनं विजय मिळवला. या पॅनलचे १८ पैकी १७ उमेदवार विजयी झाले, तर एका जागेवर भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून आला.
****
पुण्याच्या वसंतदादा साखर संस्थेच्यावतीनं जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातल्या पाथरवाला इथं माजी खासदार अंकुशराव टोपे यांच्या स्मरणार्थ ऊस बेणे संशोधन आणि उत्पादन केंद्र उभारलं जाणार आहे. साखर संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार काल ही घोषणा केली. महाकाळा इथं उभारलेल्या अंकुशराव टोपे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आणि स्मारकाचं लोकार्पण काल पवार यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
****
नियमांपेक्षा अधिक वाळूचा उपसा करणाऱ्यांविरूद्ध गुन्हे दाखल करण्याच्या सूचना जालना जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिल्या आहेत. जिल्ह्यातल्या अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीच्यासंदर्भात काल अधिकाऱ्यांची त्यांनी बैठक घेतली, अवैध वाळू उपशामुळे सरकारच्या महसुलामध्ये घट होण्याबरोबरच पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. यामुळे वाळूचा अधिक उपसा करणारी वाहनं जप्त करावीत, त्यांच्या मालकावर गुन्हे दाखल करावेत, आवश्यकता वाटल्यास मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
****
बीड जिल्ह्यातल्या नारायण गडाच्या विकासासाठी सरकारनं २५ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी काल मुंबईत ही माहिती दिली. या विकास आराखड्यांतर्गत गडाच्या सुमारे चारशे एकर जागेवर भक्त निवास, वाहन तळ, पाणीपुरवठा, आदी प्रकल्प राबवले जाणार आहेत.
****
अमृत योजनेअंतर्गत जालना शहरासाठीच्या ७० कोटी रूपयांच्या भुयारी गटार योजनेला राज्यस्तरीय तांत्रिक समितीनं काल मंजुरी दिली. पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी ही माहिती दिली. जालना शहराचा सांडपाण्याचा प्रश्न यामुळे मार्गी लागणार असल्याचं ते म्हणाले.
****
रामनवमी उत्सव आज सर्वत्र साजरा होत आहे. आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास ठिकठिकाणच्या राम मंदिरांमध्ये राम जन्मोत्सव साजरा होईल. राम नवमीनिमित्त राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सर्वांना  शुभेच्छा दिल्या आहेत. जीवनमूल्यं जपणाऱ्या प्रभू रामाच्या जन्मोत्सवामुळे एकता आणि बंधुभाव अधिक दृढ होवो, असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
रामनवमीनिमित्त शासकीय सुट्टी असल्यामुळे आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालय घाटीचा बाह्यरूग्ण विभाग बंद राहणार आहे.
//******//



No comments: