Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date - 04 April 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०४ एप्रिल २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
मुंबईच्या भाभा अणू संशोधन केंद्राच्या
शास्त्रज्ञांनी ‘रामपत्री’ या वनस्पतीपासून कँसरसाठी औषध तयार केलं आहे. या औषधामुळे
टयूमर नष्ट होतो आणि पेशी पुनरुज्जीवीत होण्यास मदत होते. हा पदार्थ देशाच्या पश्चिम
सागरी किनारपट्टीच्या प्रदेशात आढळतो. या शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनात हे औषध
कँसर कमी करण्यासाठी उपयुक्त असल्याचं निष्पन्न झालं आहे. हे केंद्र गेल्या अनेक वर्षांपासून
अशा प्रकारच्या औषध निर्मितीवर संशोधन करत असल्याचं केंद्राच्या जैव विज्ञान विभागाचे
प्रमुख एस चटोपाध्याय यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं.
****
जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात
पाकिस्ताननं आज पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत भारतीय चौक्यांवर गोळीबार केला.
राजौरीच्या भीमभेर गाली सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्यानं गोळीबार केला. भारतीय जवानांनीही
या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं. राजौरी-पूँछ जिल्ह्यात २४ तासात पाकिस्ताननं तिसऱ्यांदा
शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे.
****
देशात २०१६-१७ दरम्यान प्रत्यक्ष
आणि अप्रत्यक्ष कर वसुली १८ टक्क्यांनी वाढली आहे. अर्थ मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार
यावर्षात कराच्या रुपात १७ लाख १० हजार कोटी रुपये प्राप्त झाले आहेत.
****
अंमलबजावणी संचालनालयानं देशातल्या
खोट्या कंपन्यांच्या शोधासाठी १६ राज्यात शंभर ठिकाणी छापे घातले. गेल्या शनिवारपासून
ही कारवाई सुरु आहे. आतापर्यंत दोन हजारांपेक्षा अधिक खोट्या कंपन्यांचा तपास लागला
आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या सूचनेवरून सरकारनं नव्यानं बनवलेल्या विशेष कृती दलाच्या
पथकांनी या धाडी घातल्या.
****
उत्तर प्रदेश सरकारनं नक्कल चालणाऱ्या
परिक्षा केंद्रांच्या विरुद्ध प्राथमिक चौकशी अहवाल दाखल करण्याचा आणि परिक्षा केंद्राचा
दर्जा काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च तंत्र शिक्षण
विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना राज्यातल्या शैक्षणिक परिस्थितीची
माहिती दिली. यावर मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना हे निर्देश दिले.
****
ज्येष्ठ गायिका किशोरी अमोणकर यांना
राज्यपाल सी विद्यासागर राव आणि सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी श्रद्धांजली
अर्पण केली आहे.
भारतीय शास्त्रीय संगीत मोठ्या उंचीवर नेऊन ठेवण्यात
ज्या निवडक लोकांचं मोलाचं योगदान आहे त्यामध्ये किशोरी आमोणकर यांचं स्थान फार
महत्वाचं असल्याचं राज्यपालांनी म्हटलं आहे.
किशोरी आमोणकर यांच्या निधनाने हिंदुस्थानी शास्त्रीय
संगीतातील तपस्वी गायिका आपण गमविली असल्याच्या भावना तावडे यांनी व्यक्त केल्या.
किशोरी अमोणकर यांचं काल मुंबई इथं निधन झालं.
****
राज्यात आज सर्वात जास्त ४२ पूर्णांक पाच अंश सेल्सिअस
तापमान वर्धा इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात सर्वात जास्त तापमान नांदेड इथं ४२ अंश
सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. त्याखालोखाल परभणी ४० पूर्णांक आठ, उस्मानाबाद ४० पूर्णांक
पाच, बीड ३९ पूर्णांक दोन तर औरंगाबाद इथं ३८ पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमानाची
नोंद झाली.
****
राज्यात पालघर इथं कॅप्टन अमोल यादव यांच्या ट्रस्ट एअरक्राफ्ट
प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसोबत सहकार्यातून विमाननिर्मिती प्रकल्प उभारणार असल्याचं,
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मुंबई इथं यासंदर्भातल्या बैठकीत ते बोलत
होते. औद्योगिक विकास महामंडळाबरोबर संयुक्त भागीदारीतून हा प्रकल्प उभारण्यात यावा,
असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. १९ आसनी नागरी वाहतूक विमान निर्मितीचा प्रकल्प आहे.
यामुळे अंतर्गत विमान वाहतूक सुलभ होणार आहे.
****
औरंगाबाद शहरात रामजन्मोत्सव मोठ्या उत्साहात भक्तीभावानं
साजरा झाला. शहरात कुंभारवाडा, समर्थनगर, अयोध्यानगरी तसंच जसवंतपुरा भागातल्या राममंदिरात
दुपारी बारा वाजता रामजन्माचा सोहळा पार पडला. राम लक्ष्मण सीता तसंच हनुमंताच्या दर्शनासाठी
भाविकांनी यावेळी मोठी गर्दी केली होती. यानिमित्तानं राम कथा वाचनासह विविध धार्मिक
कार्यक्रम तसंच रक्तदान शिबीरासह विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं. जसवंतपुरा
भागातल्या राममंदिरातून सायंकाळी रथयात्रा काढण्यात येणार असल्याचं, मंदीर व्यवस्थापनाकडून
सांगण्यात आलं.
****
वाशिम इथले सामाजिक न्याय विभागातील जातपडताळणी उपायुक्त
शरद चव्हाण यांना २० हजार रुपये लाच घेताना काल रंगेहाथ अटक करण्यात आली. संगणक परिचालक
पदाची नोकरी लावून देण्याच्या आमिषानं त्यांनी लाच मागितली होती. चव्हाण याचा सहकारी
कंत्राटी संगणक चालक वैभव राठोड यालाही लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं अटक
केली आहे.
****
No comments:
Post a Comment