Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date - 05 April 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०५ एप्रिल २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज राज्यसभेत वस्तू
आणि सेवा कर विधेयक मांडलं. यावरची चर्चा सुरू करताना, काँग्रेसच्या आनंद शर्मा यांनी,
या विधेयकात अजून काही सुधारणा आवश्यक असल्याचं नमूद करत, यासंबंधीचे नियम ठरवले जाण्याची
गरज असल्याचं मत व्यक्त केलं. आवश्यक वस्तू आणि सेवा पाच टक्के कराच्या भागात ठेवाव्यात,
अशी सूचनाही त्यांनी केली. काँग्रेस नेहमीच या विधेयकाच्या बाजूनं होती आणि या विधेयकाला
काँग्रेसचं समर्थन आहे, असं शर्मा यांनी नमूद केलं.
यानंतर भारतीय जनता पक्षाचे भूपेंद्र यादव, समाजवादी पक्षाचे
नरेश अग्रवाल, अण्णाद्रमुक पक्षाचे एस आर बालसुब्रम्हण्यम, तृणमूल काँग्रेसचे डेरेक
ओ ब्रायन, द्रमुकचे टी. एस.एलंगोवन यांनी या विधेयकाबद्दल आपले विचार मांडले. जीएसटीबद्दल
राज्यांच्या काही तक्रारी असतील तर केंद्र सरकार त्या किती दिवसांत सोडवणार याचा खुलासा
सरकारनं करावा, तसंच शेतकऱ्यांना या करातून सूट मिळणार का, याचाही खुलासा करावा अशी
मागणी करत, नरेश अग्रवाल यांनी या विधेयकाला समाजवादी पक्षाचा पाठिंबा असल्याचं यावेळी
सांगितलं.
जीएसटी लागू झाल्यानंतर जो कर जमा होईल त्याचा योग्य तो
हिस्सा स्थानिक स्वराज संस्थांपर्यंत योग्य रीतीनं न पोहोचवल्यास त्या संस्थांची आर्थिक
गणितं बिघडतील, अशी भीती काँग्रेसचे दिग्विजय सिंह यांनी व्यक्त केली. तसंच, ही प्रक्रिया
ऑनलाईन केल्यामुळे, जिथे वीज किंवा इंटरनेट उपलब्ध नाही, तिथे अडचण येईल, अशी काळजीही
त्यांनी व्यक्त केली.
****
उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूनंतर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचंही
कर्ज माफ करावं, यासाठी राज्य सरकारवर विरोधकांचा दबाव वाढला आहे. सरकारनं वाटल्यास
कर्ज काढावं पण शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे आमदार शंभुराजे देसाई
यांनी आज विधानसभेत केली.
या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी
विधानसभेत निवेदन केलं. उत्तर प्रदेशातल्या कर्जमाफीच्या मॉडेलचा अभ्यास करण्याचे आदेश
राज्याच्या वित्त सचिवांना दिले असल्याची, तसंच राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याची
ग्वाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली. विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय
अधिवेशन सुरु झाल्यापासून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी
पक्ष आणि जोगेंद्र कवाडे यांच्या पक्षासह सत्ताधारी शिवसेनेनंही महाराष्ट्रातल्या कर्जबाजारी
शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याची मागणी लावून धरली होती.
****
आफ्रिकन विद्यार्थ्यांसह देशातल्या सर्व परदेशी नागरिकांच्या
सुरक्षिततेसाठी सरकार प्रतिबद्ध असल्याचा पुनरुच्चार सरकारनं केला आहे. ग्रेटर नोएडा
इथं एका नायजेरियन व्यक्तीवर नुकत्याच झालेल्या हल्ल्यासंदर्भात आज लोकसभेत बोलताना
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी हे प्रतिपादन केलं. ही घटना दुर्दैवी आणि दु:खदायक
असल्याचं त्यांनी नमूद केलं. यासंदर्भात सहा लोकांना अटक करण्यात आल्याची माहितीही
स्वराज यांनी दिली.
गिलगिट आणि बाल्टिस्तान हा आपला पाचवा प्रांत असल्याचा
पाकिस्तानचा दावा भारतानं पूर्णपणे फेटाळून लावला असून, पाकिस्ताननं हा दावा केल्यादिवशीच
तो अमान्य असल्याचं सांगत, भारतानं या दाव्याबद्दल पाकिस्तानचा निषेध केला होता, अशी
माहितीही सुषमा स्वराज यांनी आज लोकसभेत शून्य प्रहरात दिली.
****
शिवसेनेचे उस्मानाबादचे खासदार रविंद्र गायकवाड यांच्यावर
विमानकंपन्यांनी घातलेल्या बंदीचा प्रश्न लवकर न सोडवल्यास संसदेत निदर्शनं करण्याचा
इशारा या पक्षानं आज लोकसभेत दिला. एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला कथितरीत्या मारहाण
केल्यानंतर सर्व विमानकंपन्यांनी गायकवाड यांना सेवा न देण्याचा निर्णय घेतला आहे.
विमान कंपन्या प्रवाशांशी उद्धटपणे वागत असून, त्यांनी घातलेल्या बंदीमुळे गायकवाड
यांच्या संवैधानिक हक्कांचं उल्लंघन झाल्याचं प्रतिपादन, शिवसेनेचे आनंदराव आडसूळ यांनी
केलं. याप्रकरणी लक्ष घालण्यात येईल, असं उत्तर लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी
दिलं.
****
गोव्यातले माजी काँग्रेस आमदार विश्वजीत राणे, उद्या भारतीय
जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. मागच्या महिन्यात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावरच्या
विश्वासदर्शक ठरावाविरुद्ध मतदान करण्याचा काँग्रेसचा व्हिप मोडल्यानंतर राणे यांनी
काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. कोणत्याही अटीशिवाय राणे उद्या भाजपामध्ये
प्रवेश करणार असल्याची माहिती भाजपाचे गोवा प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी पीटीआय
या वृत्तसंस्थेला आज दिली.
****
शासनाच्या सेवा निश्चित कालावधीत व पारदर्शकपणे मिळाल्या
पाहिजेत, यासाठी नागरिकांनी सेवा हक्क कायद्याचा जास्तीत जास्त वापर करावा, असं आवाहन
राज्याचे मुख्य सेवा हक्क आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांनी केलं आहे. मुंबईतल्या नरिमन
पॉईंट इथल्या निर्मल इमारतीतल्या राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त कार्यालयाचं उद्घाटन
आज त्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.
नागरिकांना मिळणाऱ्या सेवेमध्ये विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांवर
सेवा हक्क कायद्यांतर्गत कारवाई करण्याची तरतूद असून, शासनानं ऑनलाईन केलेल्या, पंचवीस
विभागांच्या तीनशे एकोणऐंशी सेवांचा नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असं आवाहनही
क्षत्रीय यांनी यावेळी केलं.
****
No comments:
Post a Comment