Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 03 March 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०३ मार्च २०१७ सकाळी
६.५० मि.
****
·
राज्यात
गाव पुनर्वसनासाठी माळीण गाव आदर्श मानणार - मुख्यमंत्री
·
विनाअनुदानित
गॅस सिलिंडर साडे चौदा रुपयांनी स्वस्त तर अनुदानित सिलिंडर साडे पाच रूपयांनी महागले
·
वाळू
माफियांसोबत आर्थिक संबंध असल्याच्या आरोपावरून भोकरदनच्या तहसीलदार चित्रा रूपक निलंबित
·
हिंगोली- नांदेड
राष्ट्रीय महामार्गावर बस
आणि ट्रक अपघातात सहा प्रवासी ठार
आणि
·
भारतीय
खुल्या बॅटमिंटन स्पर्धेत पी व्ही सिंधुला विजेतेपद
****
राज्यात कोणत्याही गावाचं पुनर्वसन
करताना यापुढे माळीण या गावाचा आदर्श घेतला जाईल असं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी म्हटलं आहे. पुणे जिल्ह्यात डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या माळीण गावावर जुलै
२०१४ मध्ये मुसळधार पावसामुळे कडा कोसळल्यानं हे गाव गाडलं गेलं होतं. त्याचं, शेजारच्या
आमडे गावात पुनर्वसन करण्यात आलं. काल या प्रकल्पाचं लोकार्पण करताना मुख्यमंत्री बोलत
होते. मुख्यमंत्र्यांनी यावेळी प्रकल्पाच्या कोनशिलेचं अनावरण करून घरांची पाहणी केली.
दोन ग्रामस्थांना घराच्या चाव्या तसंच संसारोपयोगी वस्तू मुख्यमंत्र्यांच्या हस्ते
वितरित करण्यात आल्या. शासन आणि प्रशासन या दोन्ही यंत्रणांनी संवेदनशीलपणे एकत्रित
काम केल्यास, माळीणसारखं सुंदर पुनर्वसन होतं, असं मुख्यमंत्री म्हणाले. माळीण पाणी
योजनेसाठी १४ कोटी ७७ लाख रुपये निधीला प्रशासकीय मान्यता दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी
यावेळी सांगितलं.
दरम्यान, काल पुण्यात यशदा महाराष्ट्र
ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशनच्या ग्रामीण विकास फेलोशिपचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या
हस्ते झालं. देश महासत्ता बनवण्यासाठी खऱ्या अर्थानं परिवर्तन दूत बना, असा संदेश मुख्यमंत्र्यांनी
युवकांना दिला.
****
विनाअनुदानित गॅस सिलिंडर साडे चौदा
रुपयांनी स्वस्त झालं आहे तर घरगुती वापराच्या अनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात पाच रुपये
५७ पैशांनी वाढ झाली आहे. मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू झाले आहेत.
****
शेतकरी कर्जमाफीसाठी समाजात जागृती
होत असल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते
काल नाशिक इथं बोलत होते. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सुरु असलेल्या संघर्ष यात्रेच्या
समारोपाला आपण उपस्थित राहणार असल्याचं, पवार म्हणाले. आगामी सार्वत्रिक निवडणुकीत
शिवसेना आपल्यासोबत आल्यास स्वागत असेल, असंही त्यांनी सांगितलं.
****
शेतकरी कर्ज माफीसाठी काढण्यात आलेली
विरोधी पक्षांची संघर्षयात्रा काल लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात दाखल झाली. लातूर
जिल्ह्याच्या औसा तालुक्यात उजनी इथं झालेल्या सभेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
यांनी भाजप प्रणीत सरकार संवेदनशील नसल्याची टीका केली. तर विधान परिषदेतले विरोधी
पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारच्या धोरणावर टीका करत, विरोधकांच्या ठाम भूमिकेमुळेच
सरकारनं विम्याच्या रकमेतून कर्ज कपातीचा निर्णय मागे घेतल्याचं नमूद केलं.
त्यापूर्वी संघर्ष यात्रेनं लातूर जिल्ह्यात
औसा तालुक्यात येलोरी इथं गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या, द्राक्ष
उत्पादक शेतकरी गुंडप्पा निटुरे यांच्या नुकसानाची माहिती घेत, त्यांना तात्काळ एक
लाख रुपये मदत दिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. उस्मानाबाद इथं झालेल्या जाहीर
सभेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राणा जगजीतसिंह पाटील यांच्यासह मान्यवरांची भाषणं
झाली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, पतंगराव कदम, समाजवादी पक्षाचे
नेते आमदार अबू आजमी, यांच्यासह विरोधी पक्षांचे नेते यावेळी उपस्थित होते.
****
राष्ट्रीय पल्स
पोलिओ लसीकरण मोहीम काल देशभर राबवण्यात आली. यामध्ये देशभरातल्या पाच वर्षांपेक्षा
कमी वयाच्या बालकांना पोलिओ
लस देण्यात आली.
उस्मानाबाद इथं पोलिओ लसीकरण मोहीमेचा प्रारंभ जिल्हा परिषद
अध्यक्ष नेताजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला, तर नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर तालुक्यात मालेगाव इथं जिल्हा
परिषद अध्यक्षा शांताबाई पवार यांच्या हस्ते लसीकरणाला प्रारंभ झाला. आरोग्य विभागानं
योग्य नियोजन करून, अभियान यशस्वी करावं, असं आवाहन त्यांनी केलं. औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, लातूर
आणि बीड जिल्ह्यातही या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला.
****
हे बातमीपत्र
आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरुन प्रसारित केलं जात आहे, आमचं
हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
जालना जिल्ह्यात भोकरदनच्या तहसीलदार
रुपा चित्रक यांना विभागीय आयुक्त डॉ पुरुषोत्तम भापकर यांनी निलंबित केलं आहे. चित्रक
यांचे वाळु माफियांसोबत आर्थिक हितसंबंध असल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारीवरून जालना
जिल्हाधिकारी कार्यालयानं विभागीय आयुक्तांकडे अहवाल दाखल केला होता. त्यानुसार काल
ही कारवाई करण्यात आली.
****
पावसाचं पाणी
साठवणं काळाची गरज असल्याचं प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केलं आहे. औरंगाबाद जिल्ह्याच्या फुलंब्री तालुक्यात शिरोडी
इथं नाला खोलीकरण आणि रुंदीकरणाच्या कामाला काल बागडे
यांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. शेतकऱ्यांनी पावसाच्या पाण्याची बचत करण्याचे प्रयत्न केले तर पाणीटंचाई भासणार नाही, त्यादृष्टीनं
योग्य नियोजन करण्याचं आवाहन बागडे यांनी यावेळी केलं.
****
परभणी महापालिका निवडणुकीसाठी काल १२४
जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. महापालिकेच्या ६५ जागांसाठी आतापर्यंत १६२ उमेदवारी
अर्ज दाखल झाले आहेत. मात्र अद्याप एकाही पक्षानं उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही.
दरम्यान, लातूर महापालिकेसाठी काल १२२
अर्ज दाखल झाले. आतापर्यंत एकूण दोनशे सात अर्ज दाखल झाले असून, या दोन्ही महापालिकांसाठी
अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे.
****
लातूर जिल्ह्यात उदगीर कृषी उत्पन्न
बाजारसमितीच्या संचालक मंडळासाठी काल मतदान झालं. आज मतमोजणी होऊन दुपारपर्यंत निकाल
जाहीर होण्याची शक्यता आहे.
****
हिंगोली- नांदेड
राष्ट्रीय महामार्गावर माळेगाव फाट्याजवळ खाजगी बस आणि ट्रकची समोरा समोर धडक होऊन
झालेल्या अपघातात सहा प्रवासी ठार झाले. काल
सकाळी आठ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. यामध्ये पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर एका प्रवाशाचं रुग्णालयात
नेत असताना निधन झालं. या अपघातात १४ जण जखमी झाले असून त्यापैकी ८ जणांची प्रकृती
चिंताजनक असल्याचं सांगण्यात आलं आहे. या सर्वांवर कळमनुरी इथल्या ग्रामीण रुग्णालयात
उपचार सुरू आहेत.
****
औरंगाबाद शहरातल्या
बीड बायपास इथंही संग्रामनगरमध्ये एका ट्रकनं दुचाकीला धडक दिल्यानं झालेल्या अपघातात
तीन वर्षाची मुलगी जागीच ठार झाली. तर तिचे आई-वडील जखमी झाले.
दरम्यान, पैठण तालुक्यात वडवाळी इथं काल एका मुलीचा गोदावरी नदी
पात्रात बुडून मृत्यू झाला.
****
न्यायालयानं शेतकऱ्यांना संरक्षण देणं
आवश्यक असल्याचं मत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातले न्यायाधीश न्यायमूर्ती
टी व्ही नलावडे यांनी व्यक्त केलं आहे. काल परभणी जिल्ह्यात सोनपेठ दिवाणी न्यायालयाच्या
नूतन इमारतीचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. शेतकरी वर्गांची
जास्तीत जास्त प्रकरणे सामोपचारानं सोडवण्यावर भर द्यावा. ग्रामस्थांना विविध क्षेत्राशी
संबंधित कायदे तसंच हक्कांबाबत माहिती देण्यात यावी, असं आवाहनही न्यायमूर्ती नलावडे
यांनी यावेळी केलं.
****
भारतीय खुल्या बॅटमिंटन स्पर्धेत भारताच्या
पी व्ही सिंधुनं महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. काल झालेल्या अंतिम सामन्यात
सिंधूनं स्पेनच्या कॅरोलिना मरीनचा २१-१९, २१-१६ असा सरळ दोन सेट्समध्ये पराभव केला.
****
औरंगाबाद जिल्हा परीषदेतल्या विषय समित्यांच्या
सभापती पदांची आज निवडणूक होणार आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांसाठी काँग्रेस आणि
शिवसेना या दोन पक्षांनी युती करून जिल्हा परीषदेत सत्ता स्थापन केली आहे. दुपारी तीन
वाजता होणाऱ्या या निवडणुकीत समाजकल्याण आणि महिला तसंच बालकल्याण समितीच्या सभापतींबरोबर
अन्य दोन विषय समित्यांच्या सभापतींची निवड केली जाणार आहे.
लातूर जिल्हा परिषदेतही विषय समित्यांच्या
सभापदी पदांची निवडणूक आज होत आहे.
****
जालना जिल्ह्यात अंकुशनगर इथं समर्थ
सहकारी साखर कारखान्याच्या प्रांगणात माजी
खासदार अंकुशराव टोपे यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे
अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार यांच्या हस्ते आज सकाळी अकरा वाजेच्या
सुमारास या पुतळ्याचं अनावरण होणार आहे.
****
प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक अजेय झणकर
यांचं काल पुण्यात दीर्घ आजारानं निधन झालं, ते ५७ वर्षांचे होते. झणकर यांच्या सरकारनामा
आणि द्रोहपर्व या कादंबऱ्या तसंच त्यावर निघालेले चित्रपट प्रसिद्ध आहेत. या चित्रपट
तसंच कादंबऱ्यांसाठी झणकर यांना राज्य शासनासह विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं.
****
परभणी जिल्हा महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्यावतीनं
आत्महत्याग्रस्त ४७ शेतकरी कुटुंबीयांना काल आर्थिक मदत देण्यात आली. जिल्हाधिकारी
कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांचा सपत्निक
सत्कार करण्यात आला. प्रभारी जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे यांच्यासह महसूल अधिकारी कर्मचारी
यावेळी उपस्थित होते.
//****//****//
No comments:
Post a Comment